हा किल्ला विजापूरच्या जवळ असल्याने तो ताब्यात ठेवणे अवघड असल्यामुळे मिर्झा राजे जयसिंहाने दिलेरखानाला किल्ला उध्वस्त करण्याची आज्ञा केली होती. पुढील काळात मंगळवेढे पुन्हा आदिलशहाच्या ताब्यात गेले. इसवीसन १६८५ मध्ये औरंगजेब बादशाहाच्या बक्षीने उध्वस्त झालेला मंगळवेढा किल्ला ताब्यात घेतला.मोगलांनी विजापूरची आदिलशाही १६८६ साली नष्ट केली आणि मंगळवेढा मोगलांच्या ताब्यात आले.मंगळवेढे गावापासून जवळच माचणूर येथे सिद्धेश्वराचे प्राचीन मंदिर आणि माचणूर किल्ला भीमेच्या काठी आहे. याठिकाणी इसवीसन १६९५ ते १६९९ औरंगजेबाचा मुक्काम होता.त्यावेळी औरंगजेब मंगळवेढे येथील जुम्मा मशिदीत नमाज पढण्यासाठी येत असे.औरंगजेबाचा मृत्यू 1707 मध्ये झाला. त्यानंतर शाहूंच्या पश्चात, संस्थाने खालसा होईपर्यंत मंगळवेढा सांगलीच्या पटवर्धनांच्या ताब्यात होते.आताच्या स्थितीत उभी असलेली वास्तू म्हणजे किल्लेवजा गढी आहे.
त्याला चार सुस्थितील मातीचे बुरुज आहेत. सध्या किल्ल्यात उपविभागीय दंडाधिकारी यांचे कार्यालय आहे. किल्ल्याचा खंदक नष्ट झालेला आहे. किल्ल्यात एका कोपऱ्यात काही कोरलेल्या मूर्ती सप्त मातृकांची मुर्ती, गणपतीची मूर्ती पाहायला मिळतात.राजवाडे, धर्मस्थळे, तीर्थस्थळे यांचे भग्नावशेष मंगळवेढ्यात सर्वत्र विखुरलेले पाहण्यास मिळतात. त्यात कोरीव स्तंभ, भग्न मूर्ती, शिलालेख आहेत.
शिवरायांचा मुक्काम सोलापूर जिल्ह्यात झाल्याची दाखवणारी एकमेव नोंद मंगळवेढे येथेच आहे. शिवरायांचा मुक्काम तेथील भुईकोट किल्ल्यात 18 नोव्हेंबर 1665 या दिवशी होता.
मंगळवेढ्यातील भुईकोट किल्ला, काशी विश्वेश्वर मंदिर, महादेवाची विहीर, ज्योतिबा माळावरील मंदिरे, गैबीसाहेब दर्गा या इतिहासाच्या खुणा सांगणाऱ्या वास्तू.पुष्कर येथील ब्रम्हदेवाच्या मूर्ती नंतर किल्ल्यापाठीमागील महादेव विहिरीत आहेत. किल्ल्याच्या मागील बाजूस असलेले काशीविश्वेश्वराचे मंदिर आणि विहीर पाहण्यासारखी आहेत.यादवोत्तर काळात हे मंदीर मोडकळीस आले होते. पुढे मुसलमानी राजवटीत विजापूरच्या गादीवर आल्ली अदिलशाह असताना हिप्परगीचे श्री. बाहयानी धनाजी कुलकर्णी यांनी शके १४९४, इ.स. १५७२ साली मंदीराचा जिर्णोध्दार केला. याची हकीकत रंगशिळेच्या डावीकडील खांबावर पाच भागात कोरली आहे. मुळ लेख ६० ओळीचा आहे विहिरीची रचना सुंदर आहे.काही पायर्या उतरल्यावर ब्रह्मदेवाची दुर्मिळ मुर्ती पहावयास मिळते. विहिरीच्या मध्यभागी गावाच्या बाहेर पडणारे भुयार आहे असे गावकरी सांगतात.