Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, फेब्रुवारी १३, २०२१

खाजगी नमुने तपासणीला प्रोत्साहन देण्यासाठी पाणीपुरवठा विभागातर्फे माफक दरात पाणी तपासणी सुविधा - पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

खाजगी नमुने तपासणीला प्रोत्साहन देण्यासाठी
पाणीपुरवठा विभागातर्फे माफक दरात पाणी तपासणी सुविधा - पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई, दि.१३ : जल जीवन मिशन या महत्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत पाणी गुणवत्ता, सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमांमध्ये ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हे शासनाचे उद्दिष्ट आहे. राज्यातील ग्रामीण जनतेला पुरविण्यात येणाऱ्या पाण्याच्या दर्जाबाबत विश्‍वास वृद्धिंगत करण्यासाठी व जनजागृतीसाठी सार्वजनिक पाणी तपासणी मोहीमेव्यतिरिक्त खाजगी नमुने तपासणीला प्रोत्साहन देण्यासाठी माफक दरात पाणी तपासणी सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने घेतला आहे अशी माहिती, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार पाणी तपासणीच्या दरामध्ये सुधारणा करणे अपेक्षित होते. प्रयोगशाळेत खाजगी पाणी नमुने तपासणीसाठी विहित केलेले दर ८०० रुपये ऐवजी ६०० रुपये प्रमाणे निर्धारित करण्यात आले आहेत. प्रयोगशाळेमध्ये खाजगी पाणी नमुने तपासणीचा खर्च, त्याकरिता लागणारा वेळ यामुळे खाजगी पाणी नमुने तपासण्यासाठी सामान्य नागरिकांचा जास्त प्रतिसाद मिळत नव्हता. राज्यातील ग्रामीण जनतेला खाजगी पाणी नमुने फिल्ड टेस्ट किट्सच्या मदतीने तपासणी करून देण्यासाठी रासायनिक व जैविक घटकांसाठी प्रत्येकी ५ रुपये इतक्या माफक दरात राज्यातील सर्व विभागीय, जिल्हा व उपविभागीय प्रयोगशाळामध्ये सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.

रासायनिक तपासणीमध्ये धातू, विरघळणारे क्षार, नाइट्रेट, फ्लोराइड, लोह यांची तपासणी करण्यात येणार असून त्यासाठी प्रति नमुना ५ रुपये शुल्क राहील तर जैविक दृष्ट्या पाणी पिण्यास योग्य असल्याची प्राथमिक तपासणी करण्यासाठी ५ रुपये प्रति नमुना शुल्क राहील. याप्रमाणे फिल्ड टेस्ट किट्सद्वारे प्रयोगशाळेत तपासणी करण्यासाठी १० रुपये इतका दर आकारण्यात येणार आहे.

        फिल्ड टेस्ट किट्सद्वारे तपासणीसाठीचे हे दर शासकीय, सहकारी, खाजगी संस्था, शैक्षणिक संस्था, संशोधक, विद्यार्थी व ग्रामीण भागातील व्यक्ती यांच्यासाठी लागू राहतील. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या अधिनस्त प्रत्येक प्रयोगशाळांमध्ये खाजगी पाणी नमुने तपासण्यासाठी पाणी नमुना व अर्ज जमा केल्यास पाणी नमुन्यांची प्राथमिक फिल्ड टेस्ट किटच्या द्वारे करण्यात येईल. प्राथमिक दृष्ट्या दूषित आढळून आलेल्या पाणी नमुन्यांची सखोल तपासणी प्रयोगशाळेमध्ये विहित शुल्क आकारून करण्यात येईल अशी माहितीही पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.