- खासदार क्रीडा महोत्सवाचे जल्लोषात उद्घाटन
- भारतरत्न सचिन तेंडुलकर ठरले विशेष आकर्षण
- 40 हजार युवा खेळाडूंनी नोंदविला सहभाग
- रंगारंग कार्यक्रमात भारतीय क्रीडा संस्कृतीचे दर्शन
नागपूर दि. 12 खासदार क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून नागपुरला नवी ओळख मिळाली आहे. मध्य भारतातील सर्वात मोठ्या क्रीडा महोत्सवामध्ये खेळ भावनेने आपला सहभाग नोंदविताना सर्वोकृष्ट कामगिरी करुन देशात नागपूरचा नावलौकिक वाढवा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
यशवंत स्टेडियम येथे दुसऱ्या खासदार क्रीडा महोत्सवाचे उदघाटन भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी खेळाडूंना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री बोलत होते. व्यासपीठावर मुख्य अतिथी म्हणून नागपूरचे खासदार व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदाताई जिचकार उपस्थित होत्या.
खासदार क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून शहरात खेळाचे वातावरण निर्माण झाले असून, खेळाडूंनाही प्रोत्साहन मिळत आहे. या महोत्सवामध्ये सहभागी झालेल्या विविध क्रीडा प्रकारातील खेळाडूंचे अभिनंदन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी आयोजित क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून युवा खेळाडुंना प्रेरणा मिळते. स्वामी विवेकानंद यांनी युवकानी मंदिरात जाण्याऐवजी मैदानावर जावून फुटबॉल खेळा, असा संदेश दिला. ज्याप्रमाणे कालीमातेला कोमेजलेली फुले चालत नाहीत, त्याचप्रमाणे मातृभूमीची सेवा करण्यासाठी ताजीतवाने मुले हवी आहेत. स्वामी विवेकानंदांचा संदेश अंगिकारुन मातृभूमीची सेवा करा, असा हितोपदेशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युवा खेळाडूंना यावेळी दिला.
नितीन गडकरी
खासदार क्रीडा महोत्सव हा सातत्याने सुरु राहावा, यासाठी स्वतंत्र ट्रस्ट निर्माण व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करताना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, नागपूरमध्ये गुणवंत खेळाडू आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. या उद्देशाने महोत्सवाची सुरुवात झाली आहे. 15 दिवस 25 खेळ आणि 40 हजार खेळाडू हे या क्रीडा महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे.
शहराच्या सर्वांगिण विकासासोबतच खेळालाही महत्त्व दिले आहे. त्यासाठी विविध भागातील खेळाच्या मैदानांचा विकास करण्यासाठी 60 कोटी रुपये खर्चाची योजनास राबविली जात आहे. नागपूर येथूनही सचिन तेंडुलकरसारखे खेळाडू निर्माण व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त करताना दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत इलेक्ट्रीक बससुध्दा उपलब्ध करुन दिलेली आहे. या बसचा वापर दिव्यांग खेळाडूंनी करावा, असे आवाहन त्यांनी केले.
स्वामी विवेकानंद आणि जिजाऊंच्या स्वप्नातील देशभक्त आणि शक्तिशाली नागरिक घडविण्याची संधी नागपूरकरांना खासदार क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून मिळाली आहे. त्यामुळे नागपुरात 350 क्रीडांगणे निर्माण करण्यावर भर असून, त्या ठिकाणी जिल्ह्यातील खेळाडू घडतील. असे नितीन गडकरी यांनी सांगितले.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर
नागपूरकरांना आयुष्यात तंदुरुस्त राहण्याचा कानमंत्र देताना भारतरत्न, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी आयुष्याच्या मैदानावर रिटेक नसतात. त्यामुळे दररोज कोणत्या ना कोणत्या प्रकारचे व्यायाम करा. स्वत:ला नेहमी तंदुरुस्त आणि सदृढ ठेवण्याचे आवाहन केले. यशाची कायमस्वरुपी हमी देता येत नाही. त्यामुळे तुमच्या मनाविरुध्द निर्णय आले तरी मन स्थिर ठेवा. प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात चढ –उतार येत राहतात. खेळताना कधी जखमी व्हाल, पंचाचे निर्णय खेळाडूवृत्तीने मान्य करण्याचा सल्ला देताना सचिन तेंडुलकर यांनी उपस्थित खेळाडूंना तुम्ही कोणाचे तरी हिरो असता, हे कायम लक्षात ठेवण्याचा महत्त्वपूर्ण कानमंत्र दिला. आपला देश खेळावर प्रेम करणारा असून तो खेळ खेळणाऱ्या देशामध्ये रुपांतरीत व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
घरातील एक व्यक्ती आजारी पडली म्हणजे त्या कुटुंबातील प्रत्येकाला त्याचा त्रास होतो, हे कायम लक्षात ठेवण्याचा सल्ला देत आरोग्य संवर्धनाचा सल्ला देत त्यांनी तरुण आणि निरोगी तंदुरुस्त भारताचे स्वप्न पाहण्यास सांगितले. त्यांचा यंग, हेल्दी आणि फिट इंडिया ठेवण्याचा संदेश पुढे पाठविण्यासाठी ॲबेसेडर होण्यास तरुण खेळाडूंना आवाहन केले.
प्रारंभी खासदार क्रीडा महोत्सव संयोजनसमितीचे प्रमुख संदीप जोशी यांनी स्वागत करुन क्रीडा महोत्सवाच्या आयोजनासंदर्भात माहिती दिली. यावेळी क्रीडा महोत्सवासाठी विशेष तयार करण्यात आलेलया चषकाचे अणावरण भारतरत्न सचिन तेंडुलकर तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार सुधाकर कोहळे,डॉ. मिलिंद माने, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, माजी खासदार अजय संचेती, दत्ताजी मेघे, दिपराज पार्डीकर, विरेंद्र कुकरेजा, अटल बहादूर सिंग आदी व्यासपीठावर उपस्थित होते. सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते रणजी विजेत्या खेळाडूचा गौरव करण्यात आला.