Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, जून २०, २०१८

चंद्रपुरात आरक्षित ई तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्यांचा भांडाफोड

चंद्रपूर/प्रतिनिधी:
मध्य रेल्वे, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या आरएसएफ पथकाने सोमवारी रात्री रेल्वे तिकीटचा अवैध व्यवसाय करणाऱ्या घुग्घुस येथील दोन केंद्रावर एकाच वेळी धाडी टाकल्या. या केंद्रातून रेल्वे ई तिकीटांसह अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोन आरोपींना रेल्वे अधिनियम १४३ कलमान्वये अटक केली आहे. रेल्वे सुरक्षा दलाच्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील रेल्वे तिकीटांचा काळाबाजार चव्हाट्यावर आला आहे. घुग्घुसचे ठाणेदार सत्यजित आमले यांच्यासह रेल्वे एसएफच्या नागपूर पथकाने सोमवारी रात्री येथील इस्माईल बुक डेपो आणि अशोक मदान किराणा येथे एकाच वेळी धाडी टाकल्या. तपासणी केली असता तिकीट दरापेक्षा अधिक पैसे वसूल केले जात असल्याचे दिसून आले.

या धाडसत्रात आरोपी मोहम्मद हनिफ शेख याच्या दुकानातून अवैधरित्या बनविलेले ४९ ई-तिकीट, संगणकात ११ बनावट आयडी, एक संगणक, एक पेन ड्राईव्ह, एक मोबाईल व पाच हजार रुपये नगदी असा एकूण एक लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर अशोक थाराराम मदान यांच्या दुकानातून ४८ ई-तिकीट, बनावट दोन आयडी, एक संगणक, एक डोंगल, एक प्रिंटर, एक मोबाईल, असा एक लाख ४० हजार २२४ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. दोनही धाडीत एकूण दोन लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर कारवाई रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांच्या मार्गदर्शनखाली मध्य रेल्वे सुरक्षा बल मोतीबागचे निरीक्षक गणेश गरकल, चंद्रपूर रेल्वे सुरक्षा बलाचे निरिक्षक शैलेंद्र सिंग ठाकूर यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

काळाबाजार फोफावला.

मागील अनेक वर्षांपासून रेल्वे तिकीटांचा काळाबाजार फोफावला आहे. मात्र याबाबत प्रवासी ओरड करीत असले तरी याबाबत अधिकृत तक्रार केली जात नव्हती. चंद्रपुरातील अनेक ठिकाणी तिकीट आरक्षण व विक्रीचे मोठे रॅकेट सक्रिय असण्याचीही शक्यता आहे. मात्र याबाबत आता रेल्वे सुरक्षा दलानेच लक्ष घालणे सुरू केल्याने अशा अवैध व्यावसायिकांचे धाब दणाणले आहे.
चंद्रपुरातही धाडी.
चंद्रपूर येथील प्रशांत आकोटकर, श्रीराम गिफ्ट सेंटर अँड जनरल स्टोअर्स श्रीराम वॉर्ड चंद्रपूर, रंजित गजानन सवाईतुल, श्री ई- सुविधा सेंटर, सिध्दार्थ नगर ताडोबा रोड दुर्गापूर यांच्यावरही अवैधरित्या रेल्वे तिकीट विकण्याच्या प्रकरणात रेल्वे सुरक्षा पथकाने कारवाई केली.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.