नागपूर: महाराष्ट्रात पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, तर त्याआधी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यादृष्टीने राजकीय लढाईत प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. नेत्यापासून ते कार्यकर्त्यापर्यंत ते महाराष्ट्र विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये व्यस्त आहेत. दरम्यान, महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री (CMO) म्हणून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांची लावलेली पोस्टर्स चर्चेचा विषय बनली आहेत.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. अशात भावी मुख्यमंत्री कोण असणार यावरही चर्चा होत आहे. मुख्यमंत्री पदाच्या या चर्चेत आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं नाव देखील दाखल झालं आहे. महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असा मजकूर लिहिलेले पोस्टर्स समोर आले आहेत.
उद्या (5 जून) काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा वाढदिवस असून नागपुरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना परिसरात हे बॅनर (Banner) लावले आहेत. दक्षिण नागपूर शहरात अनेक ठिकाणी नाना पटोलेंचा भावी मुख्यमंत्री उल्लेख असलेलं बॅनर लावण्यात आलं आहे.
पोस्टरवर माननीय आमदार नाना पटोले भावी मुख्यमंत्री, शेतकरी पुत्र, कामकरी लोकांचे कैवारी, असा उल्लेख करण्यात आला आहे. नागपूरात गिरीश पांडव हे काँग्रेसचे इच्छुक उमेदवार आहेत. त्यामुळे त्यांनी नाना पटोले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असे बॅनर लावलेत.
महाराष्ट्रातील निवडणुकीपूर्वी ठिकठिकाणी 'भावी मुख्यमंत्री' असलेले पोस्टर्स लागले आहेत. 'भावी आमदार, नगरसेवक, सरपंच' अशा भावी नेत्यांची संख्याही सोशल मीडियावर दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचीही नावे भावी मुख्यमंत्री म्हणून मांडली जाऊ शकतात आणि आता काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या नावाचाही त्यात समावेश करण्यात आला आहे.
नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले आपल्या भावी मुख्यमंत्रिपदाच्या बॅनरवर म्हणाले, "अशी पोस्टर्स कोणीही लावू नयेत. मला माझा वाढदिवस सामाजिक कार्य करून साजरा करायचा आहे."
काँग्रेसने कंबर कसली!
दरम्यान, काँग्रेसने महाराष्ट्रातील लोकसभेच्या 41 जागांचा आढावा घेतला आहे, तर चंद्रपूरच्या जागेसह मुंबईतील सहा मतदारसंघांचा स्वतंत्रपणे आढावा घेतला जाणार आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, महाविकास आघाडीच्या (एमव्हीए) बैठकीत जागावाटपावर चर्चा होणार आहे. पटोले म्हणाले की, 2024 ची लोकसभा निवडणूक भाजपचा पराभव करण्यासाठी काँग्रेस उत्साहाने आणि निर्धाराने लढण्यास सज्ज आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत.