शिरीष उगे (तालुका प्रतिनिधी)
भद्रावती :- कर्नाटका पॉवर कार्पोरेशन एकीकृत बरांज खुल्या कोळसा खाणीतील प्रकल्पग्रस्तांचा आपल्या हक्कासाठी गेल्या १५ वर्षापासून लढा सुरू असतांना अचानक वनविभागाने स्वतःची जागा या कंपनीला दिल्याच्या वृत्ताने मनोधर्य खचलेल्या बरांज येथील एका रहिवाश्याने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये कंपनी, प्रशासन,लोकप्रतिनिधी विरोधात रोष व्यक्त होत आहे.
६० वर्षीय प्रकल्पग्रस्त प्रकाश दाजीबा दैवलकर यांनी सतत १५ वर्षापासून आपल्या हक्कासाठी लढा दिला. एक दिवस आपणास न्याय मिळेल अशी त्यांना आशा होती. त्यातच दिनांक १५ नोव्हेंबरला एका वृत्तपत्रात कंपनीला आराजी ८४.४१ हे.आर वनजमीन हस्तांतरीत केल्याची जाहिरात आली. त्याच जाहिरातीने घात केला. प्रकाश दैवलकर यांचे मनोधर्य खचले आणि त्यांनी कंपनी, लोकप्रतिनिधी, प्रशासनाच्या या धोरणा विरोधात एक चिठ्ठी लिहून आपण विष प्राशन करून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले. त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलिसांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. कर्नाटका पॉवर कापॉरेशन एकीकृत बरांज खुली कोळसा खाण सन २००७ पासून कार्यान्वीत आहे. यात बरांज, चिचोर्डी, चेक बरांज, बोनथाळा, कढोली,बरांज तांडा, सोमनाळा ( रिठ ) ही ७ गावे समाविष्ट आहे. ज्याचे क्षेत्रफळ १३७९.५० हे.आर असून त्यात ६ कोल ब्लॉक आहे. बरांज कोल ब्लॉक मधून कोळसा काढणे झाले आता किलोनी कोल ब्लॉक मधून कोळसा काढणे सुरू आहे. हे कोल ब्लॉक बरांज या गावा लगत आहे. हा गाव पुनर्वसनात येतो. या गावाचे पुनर्वसन करा या करीता गावकऱ्यांनी गेल्या अनेक वर्षापासून लोकप्रतिनिधींना तसेच प्रशासनाला वेळोवेळी प्रत्यक्ष भेटून निवेदने दिली. आंदोलने केली परंतु आश्वासना व्यतिरिक्त काहीच हाती लागले नाही. दि.१५ नोव्हेंबरला आलेल्या जाहिरातीमुळे प्रकल्पग्रस्तांचे मनोधर्य खचले. त्याची परिणीती प्रकाश दैवलकर यांच्या आत्महत्येच्या प्रयत्नाने झाली. इतर प्रकल्पग्रस्ताचे मनोधर्य सुद्धा खचले आहे. आता आरपारची लढाई लढल्या शिवाय न्याय मिळणार नाही अशी त्यांची भावना आहे. दैवलकर यांनी आपल्या चिठ्ठीत कंपनी, प्रशासन, लोकप्रतिनिधी यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. आता त्यांचेवर विश्वास राहिला नाही अशी भावना त्यांनी या चिठ्ठीत व्यक्त केली आहे.