भंडारा/ मनोज चिचघरे
ऐन खेळण्या-बाळगण्याच्या वयात मेंदुच्या आजाराने ग्रसीत झालेल्या एका १२ वर्षीय मुलाला जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. ललित निश्चल येनुरकर रा. राजगुरु वॉर्ड भंडारा असे या मुलाचे नाव आहे. घरची स्थिती हलाखीची असून ललीतच्या पुढील उपचारार्थ दानशुरांची गरज आहे.
ललित हा भंडारा येथील महर्षी विद्या मंदिर शाळेचा विद्यार्थी आहे. ५ फेब्रुवारी रोजी त्याला अचानक चक्कर आली. त्याला एका खाजगी डॉक्टरांना दाखविल्यानंतर त्याला तातडीने नागपूरला घेऊन जाण्याचा सल्ला देण्यात आला. नागपुरातील एका खासगी बाल रुग्णालयात दाखल करण्यात आले.
काही दिवसात बर होईल, या आशेने डॉक्टरानी उपचाराला सुरुवात केली. परंतु हसता-बोलता ललीत दोन दिवसातच कोमात गेला. ११ फेब्रुवारीपर्यंत ललितच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याचे बघून त्याच्या वडिलाने ललितची रुग्णालयातून सुट्टी करुन घेतली. तोपर्यंत येनुरकर यांचे ४ ते ५ लक्ष रुपये खर्च झाले. मित्र, नातेवाईक आणि शाळा व विद्यार्थ्यांनी केलेल्या मदतीमुळे ललितवर उपचार होऊ शकले. ललितला उपचारासाठी धंतोली येथीलच एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनुसार, ललितला ‘व्हायरल अॅनसेफॅलायटीस’ हा आजार झाला आहे. ललितवर दीड महिना उपचार होण्याची शक्यता असून चार लक्ष रुपये खर्च अपेक्षीत आहे. येनुरकर कुटुंबीयांकडे सदर खर्चाचा भार पेलण्यासाठी पैसा नाही. ललीतचे वडील हे ड्रायव्हर असून ते कर्जाच्या खाईत लोटले आहे. ललितचे प्राण वाचविण्यासाठी येनुरकर दाम्पत्यांचा संघर्ष सुरु आहे. येनुरकर कुटुंबियाला गरज आहे ती समाजातील दानशूर व्यक्तींची. निश्चल देवाजी येनुरकर यांना मदत करु इच्छुकांनी त्यांच्या भंडारा येथील इको बँक शाखा येथील खाता क्र. २०९३०११००५१७९५ येथे आर्थिक मदत करता येईल. बँकेचा एफआयएसई कोड युसीबीए०००२०९३ असून एमआयसीआर कोड ४४१०२८१०२ असा आहे.