Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, नोव्हेंबर १६, २०२२

सूर्यकिरण, सारंग उपराजधानीत दाखल; नागपुरात १९ नोव्हेंबरला ‘एअर शो’

सूर्यकिरण, सारंग उपराजधानीत दाखल; नागपुरात १९ नोव्हेंबरला ‘एअर शो’




स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्ताने भारतीय हवाई दलातर्फे नागपुरात १९ नोव्हेंबरला एअर शो आयोजित करण्यात आला असून यानिमित्ताने नागपूरकरांना विमानाच्या हवाई कसरती बघण्याची संधी मिळणार आहे.पहिले सीडीएस बिपीन रावत यांचा डिसेंबर २०२१ मध्ये हेलिकॉप्टर अपघातात मृत्य झाल्याने मागील वर्षी एअर शो रद्द करण्यात आला होता. यावर्षी त्याचे नियोजन करण्यात आले आहे. मेंटनन्स कमांडच्या, वायुसेनानगरातील मुख्यालय परिसरात हा शो होत आहे.

कोव्हिडमुळे दोन वर्षांच्या अंतराने यंदा एअर शो होत आहे. वायुसेनानगरातील मेंटेनन्स कमांडच्या परेड मैदानावर शनिवार, १९ नोव्हेंबर रोजी निमंत्रितांना हवाई थरार अनुभवता येणार आहे. वायुदलाच्या अनुरक्षण कमानचे मुख्यालय नागपुरात आहे. शिवाय, सोनेगाव येथे एअरफोर्स स्टेशन असल्याने वायुदलासाठी हे शहर महत्त्वाचे आहे. हे लक्षात घेऊन मध्य भारतातील युवकांना वायुदलात करिअर करण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने ठराविक कालावधीनंतर एअर शो घेण्यात येतो.

मागील काही वर्षांचा विचार करता २०१३, २०१५ आणि २०१९मध्ये अशाप्रकारचा शो झाला होता. त्यानंतर यावर्षी हा शो होतोय. यामध्ये सूर्यकिरण एरोबॅटिक टीम, सारंग हेलिकॉप्टर, अॅवरो, आकाशगंगा, एअर वॉरिअर्स ड्रिल टीम, एनसीसी ग्लायडर्स आदींचा समावेश राहील. याप्रसंगी लढाऊ आणि मालवाहतूक करणाऱ्या विमानांची प्रात्यक्षिके होतील. तसेच एअरोमॉडेलिंग शो, वायुसेनेच्या बॅण्डचे सादरीकरण विशेष आकर्षण राहणार आहे. मागील वेळी झालेल्या एअर शोमध्ये सुखोईचा समावेश होता. यंदाच्या शोमध्ये सुखोईचा समावेश नाही. त्यामुळे भारतीय वायुसेनेचा कणा असलेल्या अत्याधुनिक अशा या लढाऊ विमानाच्या हवाई कसरतींना नागपूरकर मुकणार आहेत.

*सामान्यांच्या पदरी निराशा*

हवाई कसारती पाहण्याची संधी सामान्य नागरिक, शालेय विद्यार्थी यांना सहजासहजी मिळत नाही. परिणामत: अशा प्रकारचे शो सर्वसामान्यांसाठी खुले असायला हवेत, अशी अपेक्षा असते. यंदाचा वायुसेनानगरातील मेंटेनन्स कमांडच्या परेड मैदानावर होणारा एअर शो निमंत्रितांसाठी असल्याने चिमुकले, सामान्य नागरिकांची निराशा झाली आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.