जीतने वाले कोई अलग काम नहीं करते,
वह हर काम को अलग ढंग से करते हैं.
लगभग १८ वर्ष पूर्वीची गोष्ट. 2005 मध्ये मी सकाळमध्ये बातमीदार असताना सापाची एक बातमी करण्यासाठी मी बंडूभाऊंना भेटायला गेलो. सकाळचे माझे तत्कालीन वरिष्ठ, जिल्हा बातमीदर संजय तुमराम यांनी ही असाइन्मेंट दिली होती. साहेबांनी सांगितले की, सर्पमित्र बंडू यांनी पावसाच्या पुरात वाहून आलेल्या अनेक सापांना जीवदान दिले आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणात साप पकडले आहेत. त्याची बातमी करायची आहे. मी माझी सायकल घेऊन बंडू भाऊच्या ऑफिसमध्ये पोहोचलो. कोतवाली वॉर्डांत रामदेव बाबा मंदिराच्या शेजारील गल्लीमध्ये ऑफिस होते. भाऊसोबत ही पहिली भेट होती. यापूर्वी त्यांचे नाव ऐकले नव्हते. त्यांच्या ऑफिसमध्ये बघतो तर काय चॉकलेटच्या रिकाम्या डब्यांमध्ये साप ठेवले होते. ते बघून मी पूर्णतः घाबरलो. सापाचा नुसता फोटो बघितला तरी माझा थरकाप उडतो. अशास्थितीत मला साप ठेवलेल्या डब्या शेजारच्या खुर्चीवर बसायला सांगितले. त्यांनी पुरातून वाहून आलेल्या सापांची माहिती दिली. त्यानंतर ते सापांना निसर्ग मुक्त करण्यासाठी लोहारा जंगलाकडे निघून गेले.
दुसऱ्या दिवशी त्या सापांसंदर्भातील बातमी मी प्रकाशित केली. बातमी छान लिहिली म्हणून फोन करून त्यांनी आभार व्यक्त केले. पुढे गणेश फेस्टीव्हल, दिवाळी, होळी आणि विविध सणांचा संदर्भात पर्यावरणपूरक सण कसे साजरे करावे, या संदर्भातील त्यांनी माहिती दिली. त्या आधारावर मी बातम्या तयार केल्या. बातमीच्या निमित्ताने माझ्या भेटी वाढत होत्या. त्यातूनच माझ्यामध्ये देखील सामाजिक कार्य आणि निसर्गाबद्दलची ओढ निर्माण झाली. नंतरच्या काळात जुनोना तलाव, जुनोना जंगल, लोहारा, ताडोबा आदी ठिकाणी जंगल भ्रमंतीसाठी सोबत नेले. तेव्हापासूनच मी इको-प्रो संस्थेचा सदस्य झालो.
लोहारा येथे अदानीची कोळसा खाण (Adani Coal Mine) प्रस्तावित होती. ही खाण होऊ नये यासाठी बंडू भाऊंचे आंदोलन सुरू झाले होते. या उपोषणदरम्यानच्या सर्व उपक्रमांच्या बातम्या तयार करणे आणि फोटो काढण्याची जबाबदारी माझ्यावर आली. या उपोषणाच्या दरम्यान मी बंडूभाऊंच्या पूर्वआयुष्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करीत होतो. इको प्रोची स्थापना कशी झाली आणि तो पर्यावरण क्षेत्रामध्ये कसा आला, याबद्दल जाणून घेताना "नागोबा ते वाघोबा" (Nagoba to Waghoba) हा लेख लिहिला होता.
विठ्ठल मंदिर वॉर्ड मध्ये राहणारा बंडू सीताराम धोतरे (Bandu Sitaram Dhotre) हा तरुण सैन्यात जाण्यासाठी उराशी स्वप्न बाळगून होता. त्यासाठी त्याने शालेय जीवनात राष्ट्रीय छात्र सेनेत सहभाग घेतला. पण, काही कारणांनी सेनेत जाता आले नाही. ही सल मनात कायम होती. परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात साप निघायचे. अस्वच्छता आणि झाडाझुडपामुळे सापांचे होते तो वाढत होते. एखादवेळी साप घरात आला किंवा तो दिसला की लोक घाबरून त्याला मारायचे. ही बाब त्याला व्यतीत करीत होती. सापांचे संरक्षण झाले पाहिजे या उद्देशाने बंडूने साप पकडण्याची कला अवगत केली आणि पुढे सर्पमित्र झाला. अशातच तरुणांची ओळख होऊ लागली. साप पकडत असल्याचे बघून अनेक जण आपणही ते शिकावे म्हणून जुळू लागले होते. यातूनच एक युवकांचा गट एकत्रित आला आणि ती इको-प्रो नावाच्या संस्थेचा जन्म झाला.
सीमेवर जाता नाही आले, याचे शल्य नेहमीच बंडूच्या मनात होते. पण देशसेवा करायची असेल तर ती सोबतच देशात राहूनही करता येऊ शकते आणि परिवर्तन घडविता येऊ शकते, याचा विचार करून सैनिक दल उभे केले. सर्पमित्र म्हणून काम करत असतानाच सापांना वाचविण्यासाठी लोकांमध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम हे त्यांनी केले.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प (Tadoba Andhari Tiger Reserve) आणि सभोवतालच्या परिसरात वाढत्या वाघांच्या संख्येमुळे मानव वन्यजीव संघर्ष वाढला होता. बंडू धोतरे यांनी या संघर्षाचे निराकरण करण्यासाठी काम केले. त्यांनी अनेक रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सहभाग घेतला आहे. तसेच, त्यांनी वन्यजीवांबद्दल जनजागृतीसाठीही काम केले आहे. चंद्रपूर शहरातील प्रदूषण रोखण्यासाठीही काम केले. त्यांनी शहरातील विविध ठिकाणी आंदोलने केली आहेत. तसेच, लोहारा येथे प्रस्तावित अदानी कोळसाखान विरोधात मोठे आंदोलन केले.
बंडू धोतरे यांनी आपले आरोग्य आपल्या हाती या मोहिमेअंतर्गत निसर्गमय आरोग्य आणि जीवन समृद्ध करण्यासाठी जनजागृती केली आहे. त्यांनी चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक गोंडकालीन किल्ला स्वच्छता अभियान राबवले. या अभियानाचे कौतुक देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनीही मन की बात मध्ये केले होते.
बंडूभाऊकडून अनेक चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्यात. आदर्श नागरिक, चांगले आरोग्य, सामाजिक कार्य या गोष्टी त्याच्या विविध उपक्रमातून आणि मार्गदर्शन मिळत होत्या. विशेषता संकटांना घाबरून जाऊ नये, त्यावर कशी मात करायची हे अनेक प्रत्यक्ष घटनांमधून शिकायला मिळाले. मग ते रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान वाघाचा हल्ला असो की साप पकडताना प्रसंगावधान. यातही एक विशेष आठवण म्हणजे आम्ही चार मित्र हेमलकसा येथे डॉ. प्रकाश आमटे (Dr. Prakash amte) यांना भेटायला गेलो होतो. परत येताना आम्हाला पुराने वेढले. सकाळी नऊ वाजेपासून तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आम्हाला कारमध्येच बसून राहावे लागले. सोबत खाण्यापिण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती. अशावेळी घाबरून न जाता येणाऱ्या संकटावर मात कशी करायची याची शिकवण या घटनेतून मिळाली. पुराने वेढा घातला असताना पिण्यासाठी पाणी नव्हते. अशावेळी बिसलरीच्या रिकाम्या बॉटलमध्ये पावसाचे पाणी जमा करून ते प्यावे लागले होते. शिवाय पूर कमी न झाल्यामुळे पुलावरून आम्हाला दोरखंडाच्या सहाय्याने काढण्यात आले. या प्रसंगात देखील बंडूभाऊंनी मनातील भीती दूर करून संकटातून मार्ग कसा काढावा हे शिकवले. इतकेच नव्हेतर गोंडकालीन उंच भिंतीवर चढणे असेल किंवा त्यावरून चालणे, यातून देखील मनाची भीती दूर केली.
जीतने वाले कोई अलग काम नहीं करते,
वह हर काम को अलग ढंग से करते हैं.
मोटिवेशनल स्पीकर शिव खेड़ा यांचे हे वाक्य बंडूभाऊ नेहमीच स्मरणात ठेवून तरुणांना त्या दृष्टीने काम करण्यासाठी प्रेरित करीत असतो.
बंडू धोतरे हे एक माझ्यासह तरुणासाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांनी पर्यावरण आणि सामाजिक कार्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यांच्या कार्यामुळे चंद्रपूर शहर आणि परिसरात पर्यावरण आणि सामाजिक परिस्थिती सुधारण्यास मदत झाली आहे. या कार्याची दखल घेऊन देशातील नामांकित राष्ट्रीय युवा पुरस्काराने सन्मानित बंडू भाऊचा राज्यातील विविध सामाजिक संस्थांकडून पुरस्कार आणि सत्कार झाला. आज पुरस्कारांचे स्मृतिचिन्ह लावण्यासाठी जागा अपुरी पडत आहे. समाजाच्या भल्यासाठी त्याच्या अनेक उपक्रमात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या मी सहयोग देण्याचा प्रयत्न करीत असतो.
9 सप्टेंबर रोजी आज वाढदिवसानिमित्त मित्र, मार्गदर्शक आणि तरुणांचा प्रेरणास्थान पर्यावरणप्रेमी बंडू भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...
- देवनाथ गंडाटे