नागपूर/प्रतिनिधी: –
आजच्या डिजीटल युगात ग्राहकांचा कल ऑनलाईन सेवांकडे अधिक आहे, शिवाय, वीज वितरण सारख्या सेवा क्षेत्रातील कंपन्यांनी आपल्या कर्मचा-यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी मोबाइल गव्हर्नन्सचा वापर करणे काळाची गरज आहे. ग्राहकांच्या या अपेक्षा पुर्ण करून महावितरणला देशपातळीवर सर्वोच्च स्थान मिळवून देण्यासाठी महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी एम गव्हर्नन्स (मोबाईल सुशासन) आणि ईआरपी प्रणाली राबविण्याला सर्वोच्च प्राधान्य दिल्यानेच गेल्या तीन वर्षाच्या त्यांच्या कार्यकाळात महावितरणने यशाची अनेक शिखरं पादाक्रांत केली आहेत.
दळणवळण क्षेत्रातील अभियांत्रिकीचे सिक्षण आणि प्रशासनाचा दांडगा अनुभव असलेल्या श्री संजीव कुमार यांनी 21 डिसेंबर 2015 रोजी महावितरणच्या अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकपदाची सुत्रे स्विकारली होती, या तीन वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी ग्राहक हितासोबतच महावितरणचे हित जोपासण्यासाठी एकामागोमाग धाडसी निर्णय घेत संपुर्ण महावितरणचे कामकाज मोबाईलमय केल्याने कंपनीच्या वेळ, पैसा आणि मणुष्यबळाचा वापर कमी होऊन कार्यक्षमता वाढिस लागली आहे. त्यांच्या नेतृत्वात महावितरणच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने आपल्या सर्व ग्राहकसेवा अद्यावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मोबाईल ॲपवर उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच ग्राहकांपर्यंत या सेवा तत्परतेने पोहचण्यासाठी कर्मचा-यांनासुद्धा मोबाईल ॲप व डिजीटल टुल्स उपलब्ध करून दिले आहेत. महावितरणने सदैव ग्राहकसेवेचा आदर्श ठेवला असून संजीव कुमार यांनी राबविलेल्या एम गव्हर्नन्स आणि ईआरपी प्रणाली यांसारख्या सकारात्मक उपक्रमांचे अनुकरण इतरही कंपन्यांकडून होत आहे.
महावितरणने जून 2016 मध्ये ग्राहक आणि कर्मचा-यांसाठी मोबाईल ॲपची सुरुवात करून एम गव्हर्नन्स कडे वाटचाल सुरु केली. या ॲपला ग्राहकांकडून भरघोस प्रतिसाद मिळत असून तब्बल 1 कोटीपेक्षा अधिक ग्राहकांनी या ॲपचा प्रभावी वापर सुरु केला आहे. या ॲपच्या माध्यमातून महावितरण आपल्या ग्राहकांशी सक्रीयपणे दुहेरीसंवाद साधत आहे. या ॲपव्दारे वीज ग्राहक महावितरणच्या विविध सेवांचा लाभ घेत आपल्या तक्रारींचेही त्वरीत निराकरण करुन घेत आहेत. महावितरणचे सर्वच ग्राहक मोबाईल ॲपचा वापर करणार नाहीत ही वस्तुस्थिती लक्षात घेता त्या ग्राहकांनाही महावितरणच्या सेवांचा लाभ घेता यावा म्हणून महावितरणच्या विविध सेवांची माहीती ग्राहकांच्या मोबाईलवर एसएमएस च्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या आहेत. राज्यातील सुमारे 2 कोटी 54 लाख ग्राहकांपैकी 90 टक्के ग्राहकांनी आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे केली असून जुलै. ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्याला सरासरी 8 कोटींपेक्षा अधिक एसएमएसव्दारे ग्राहकांना वीज सेवांसंबंधीची माहिती दिल्या गेली आहे. महावितरणच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत देशपातळीवर इंडियन एक्सप्रेस इंटिलेजेंट पीएसयु अवार्ड - 2016, आयएसजीएफ़ बेस्ट युटिलीटी अवार्ड – 2017 (ईंडियन स्मार्ट ग्रीड फ़ोरम), आयसीसी (इंडियन चेंबर ऑफ़ कॉमर्स) इनोव्हेशन वीथ ईम्पॅक्ट अवार्ड -2017 स्कोच ग्रुप तर्फ़े स्कोच – ऑर्डर ऑफ़ मेरीट अवार्ड - 2017 यांसारख्या अनेक पुरस्कारांनी महावितरणला गौरविण्यात आले.
प्रत्येक संस्था किंवा व्यवसायाचा नावलौकीक तेथे कार्यरत कर्मचा-यांच्या कार्यक्षमतेवर ठरत असतो. आज महावितरण कर्मचा-यांच्या सांघिक प्रयत्नांमुळे देशपातळीवर महावितरण आघाडीची वीज वितरण कंपनी म्हणून ज्ञात आहे. या कर्मचा-यांच्या कामांत आणि वैयक्तिक आयुष्यात सुक, समाधान व आनंद असणे हे महावितरणच्या भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी क्रमप्राप्त आहे. ही बाब लक्षात घेत संजीव कुमार यांनी राज्यात सर्वदुर पसरलेल्या महावितरणच्या सुमारे 80 हजार कर्मचा-यांना अचूक व अद्ययावत माहिती त्वरीत उपलब्ध होण्यासोबतच ग्राहकांना स्मार्ट सेवा पुरविण्यासाठी महावितरणचा कर्मचारीही स्नार्टच हवा हे विचारात घेत श्री संजीव कुमार यांनी कर्मचा-यांना त्यांच्या कामासंदर्भात विविध माहिती व सुविधा मोबाईल ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यांच्या या प्रयत्नांमुळे वेळेची बचत होऊन निर्णयक्षमताही अधिक गतिमान झाली आहे. महावितरण कर्मचा-यांना त्यांची सेवा बजावतांना कार्यालयीन कामकाज सहज व्हावे यासाठी मोबाईल ॲपवर मानव संसाधन विभागाशी निगडित प्रशासकीय बाबीही उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
एम गव्हर्नन्सप्रमाणेच ईआरपी प्रणालीव्दारे राज्यात सर्वत्र विखुरलेल्या माहितीचे संनियत्रंण आणि सुव्यस्थापन करण्यासाठी संजीव कुमार हे पुर्वीपासुनच आग्रही होते आणि त्यास यशस्वीरित्या कार्यान्वित करीत त्या माध्यमातून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पगाराची बीले, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे ऑनलाईन गोपनीय अहवाल, ग्राहक तक्रारींची नोंद, वित्तीय व्यवहार व त्यावर नियंत्रण, प्रकल्प व्यवस्था, यंत्रसामग्री व्यवस्थापन, सयंत्र देखभाल व दुरुस्तीही सर्व कामे करण्यात येत आहेत. ग्राहकसेवा केंद्रित कार्यप्रणालीचा अवलंब करताना कामकाजात पारदर्शकता आणि गतीमानता आणण्यासाठी महावितरणच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत असून कंत्राटदारांचे देयक अदायगीसाठीही पारदर्शक प्रणालीचा अवलंब करण्यात येत आहे.
कंपनीचे विविध दैनंदिन आर्थिक व्यवहार इआरपी प्रणालीद्वारेच करण्यात येत आहे. त्यामुळे कंत्राटदाराला कामाचे कार्यादेशही या प्रणालीच्या माध्यमातूनच दिला जात असून आता कंत्राटदराच्या कार्यादेशात (वर्क ऑर्डर) मध्ये इआरपी प्रणालीतून निर्मित करण्यात आलेल्या पी.ओ. (पर्चेस ऑर्डर) क्रमांकाचा उल्लेख करणे अनिवार्य करण्यात आले आहे. हा क्रमांक नसलेल्या कामाच्या देयकाला मंजूरी देण्यात येत नसल्याने राज्यातील सर्व कंत्राटदारांची देयके मुंबई येथील मुख्यालयातील केंद्रीय प्रणालीव्दारे अदा करण्यात येत आहेत. यामुळे कंत्राटदारांना त्याचे देयक निश्चित कालमर्यादेत ऑनलाईन पद्धतीव्दारे मिळत आहे, याशिवाय कर्मचा-यांची अग्रीम उचल, वेतन आणि इतर देयकेही मुख्यालयातील केंद्रीय प्रणालीव्दारे इसीएस प्रणालिव्दारे कर्मचा-यांच्या बॅंक खात्यात वळती करण्यात येत आहेत. संजीव कुमार यांच्या नेतृत्वात महावितरणच्या विविध विकासात्मक कामांना अधिक गती लाभत संपुर्ण आर्थिक व्यवहार कॅशलेस, पेपरलेस आणि पारदर्शक असणारी महावितरण ही भारतातील पहिलीच वीज वितरण कंपनी ठरली आहे.