Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, जून १८, २०२१

सोमवारपासून जिल्हयात रात्री 8 पर्यंत दुकाने खुली ठेवण्याची परवानगी

जिल्हा प्रशासनाकडून आदेश जारी ; नागरिकांनी रस्त्यांवर गर्दी न करण्याचे आवाहन



 

नागपूर दि. 18: राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हयातील पॉझीटिव्हीटी रेट,ऑक्सिजन बेडची उपलब्धता व दैनंदिन रूग्णांची परिस्थिती लक्षात घेता सुधारीत सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. जिल्हा अद्यापही पहिल्या श्रेणीमध्ये समाविष्ट आहे. तथापि] आज 18 जूनला झालेल्या पुनर्विलोकन बैठकीमध्ये सोमवार दिनांक 21 जूनपासून नागपूर जिल्ह्यामध्ये सायंकाळी आठ वाजेपर्यंत अत्यावश्यक व आवश्यक सेवेतील दुकाने व आस्थापना सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी पाच वाजेपर्यंत सुरू असणारी दुकाने आता आठ वाजेपर्यंत सुरू असतील.

            जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आज या संदर्भातील सुधारित आदेश जाहीर केले आहेत. यापूर्वी 12 जूनला जारी केलेल्या आदेशामध्ये शिथीलता देत शहरातील अस्थापना आता आठ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आल्या आहे. मात्र शाळा, कॉलेजेस बंद ठेवण्यात आले आहे. तसेच लग्नातील गर्दी टाळण्याचे आवाहन असून या पूर्वीप्रमाणेच लग्नासाठी केवळ 100 लोकांच्या उपस्थितीला परवानगी दिली गेली आहे. राज्याच्या कोरोना टास्क फोर्सने मोठ्या संख्येने घराबाहेर पडण्याच्या नागरिकांच्या वृत्तीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. कोरोना संपला नसून नागरिकांनी आवश्यकतेनुसार घराबाहेर पडावे तसेच गर्दी करू नये व कोरोना प्रोटोकॉलचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.  

            नवे आदेश सोमवार 21 जून सकाळी 7 वाजतापासून तर 28 जूनच्या सकाळी 7 वाजेपर्यंत लागू राहतील.



सोमवार पासून असे असतील निर्बंध

1. अत्यावश्यक वस्तूंच्या दुकानाची, आस्थापनांची वेळ रात्री 8 वाजेपर्यंत राहील.

2. आवश्यक नसलेल्या वस्तूंच्या दुकानांची, आस्थापनांचीही वेळ रात्री 8 वाजेपर्यंत राहील.

3. शहरातील मॉल, चित्रपट गृह, मल्टिप्लेक्स नाट्यगृह, 50 टक्के क्षमतेमध्ये रात्री 8 वाजेपर्यंत सुरू ठेवता येईल.

4. उपाहारगृहे 50 टक्के क्षमतेत रात्री 11 पर्यंत सुरू ठेवता येतील.

5. लोकल ट्रेन, मेट्रो नियमित सुरू राहतील.

6. सार्वजनिक ठिकाण, पटांगण, वाकिंग, सायकलिंगसाठी सकाळी पाच ते नऊ व सायंकाळी पाच ते नऊ परवानगी आहे.

7.खाजगी कार्यालय नियमित वेळेत सुरू ठेवता येतील. तर शासकीय कार्यालयात शंभर टक्के उपस्थितीत नियमित शासकीय वेळेत सुरू ठेवता येईल.

8. सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये हॉलच्या पन्नास टक्के उपस्थितीला परवानगी. मात्र ही क्षमता 100 व्यक्ती पर्यंत मर्यादित.

9. लग्न समारंभ मंगल कार्यालयाच्या 50% उपस्थिती क्षमतेत करता येईल. मात्र ही पन्नास टक्के उपस्थिती कोणत्याही परिस्थितीत शंभर लोकांपेक्षा अधिक असता कामा नये.

10.अंत्यसंस्कार अधिकाधिक 50 लोकांना उपस्थित राहता येईल

11.बैठका, निवडणुका,स्थानिक प्रशासन व स्थायी समिती बैठक सहकारी मंडळ ऑनलाईन घेता येतील.

12.बांधकाम करण्यास परवानगी आहे.

13.कृषी, शेतीच्या सर्व कामांना रात्री ८ वाजेपर्यंत परवानगी आहे.

14. ई-कॉमर्स साहित्य व सेवा पुरवठा नियमित

15. जिम, सलून,सौंदर्य केंद्र, स्पा, वेलनेस केंद्र रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहतील.

16. सार्वजनिक वाहतूक, मालवाहतुकीला परवानगी असेल. मात्र बसमध्ये उभे राहून प्रवासास निर्बध.

17. आंतरजिल्हा प्रवास, खाजगी कार, टॅक्सी, बस, लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या सुरू असतील. मात्र ज्या जिल्हयात ई-पास आवश्यक असेल तिथे स्थानिक नियम पाळावे.

18. उत्पादन निर्यात करणाऱ्या कंपन्यांना माल निर्यात नियमित पणे सुरू असेल. जीवनावश्यक वस्तूंच्या निर्मितीमध्ये असणाऱ्या कारखान्यांसह अन्य सर्व कारखान्यांना उद्योगांना निर्मिती प्रकल्पांना नियमित परवानगी देण्यात आली आहे.

19. शाळा कॉलेजेस सर्व बंद असतील ; तथापि कार्यालयीन कामांसाठी ऑनलाईन क्लासेस प्रॅक्टिकल परीक्षांसाठी कार्यालय उघडे ठेवता येईल

20.सर्व धार्मिक स्थळे बंद असतील 

21. सर्व जलतरण तलाव बंद असतील

22. अम्युजमेंट पार्क रात्री ८ पर्यत उघडे असतील

23. बोटींगला नियमित परवानगी आहे.

24. वाचनालय वाचन कक्ष अभ्यास कक्ष रात्री आठ वाजेपर्यंत सुरू असतील 

25. आधार कार्ड सेंटर नियमितपणे सुरू असेल

26. कौशल्य विकास क्लासेस, टायपिंग इन्स्टिट्यूट, कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट व आरोग्यविषयक प्रशिक्षण संस्था  50 टक्के क्षमतेमध्ये किंवा वीस विद्यार्थ्यांपर्यंत नियमित सुरू ठेवता येतील 

27. शॉपिंग मॉल मधील रेस्टॉरंट आणि बार 50 टक्के क्षमतेमध्ये रात्री 11 पर्यंत

28. गोरेवाडा जंगल सफारी रात्री आठ पर्यंत सुरू असेल 

29.शासकीय, निमशासकीय प्रशिक्षण संस्था नियमितपणे सुरू असतील 

30. कोचिंग क्लासेस 50 टक्के क्षमतेत, मात्र 20 विद्यार्थ्यांपेक्षा अधिक विद्यार्थी क्लासमध्ये बसवता येणार नाही

31. खेळाची मैदाने, आउटडोअर व इनडोअर स्टेडियम सकाळी 5 ते 9 व सायकांळी 5 ते 9 सुरू असेल.

32. चित्रपट, सिरियल व व्यावसायिक चित्रीकरण (शूटींग) नियमितपणे करता येईल.

33. जिल्ह्यात अद्यापही जमाव बंदी कायम आहे. त्यामुळे निर्बंध कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा अधिक नागरिकांनी एकत्रित येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.





SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.