Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, जून ०९, २०२३

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना | आवश्यक कागदपत्रे- gopinath munde shetkari apghat vima yojana



चंद्रपूर, दि. 6 : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना 19 एप्रिल 2023 पासून राज्यात राबविण्यात येत आहे. सदर योजना 19 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 व आवश्यकतेनुसार प्रथम 3 वर्ष राबविण्यात येणार आहे. शेती व्यवसाय करतांना होणारे अपघात तसेच अपघातामुळे येणारे अपंगत्व यासाठी अपघातग्रस्तांच्या वारसदाराला या योजनेअंतर्गत मदत दिली जाणार आहे.


gopinath munde shetkari apghat vima yojana. Prabhudeva GR & sheti yojana



राज्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व शेतकऱ्यांच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेला कोणताही एक सदस्य (आई,वडील शेतकऱ्यांची पत्नी/पती, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती) असे 10 ते 75 वर्ष वयोगटातील एकूण 2 जणांना विमाछत्र प्रदान करण्यासाठी सुधारित स्वरूपात मान्यता देण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत रस्ता/रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतुनाशके हाताळतांना अथवा अन्यकारणाने विषबाधा, विजेचा धक्का बसल्याने झालेला अपघात, वीज पडून मृत्यू, उंचावरून पडून झालेला अपघात, सर्प व विंचू दंश, नक्षलवाद्यांकडून झालेली हत्या, जनावरांनी खाल्ल्यामुळे/चावल्यामुळे जखमी/ मृत्यू, बाळंतपणातील मृत्यू, दंगल तसेच अन्य कोणताही अपघात होऊन मृत्यू झाल्यास वारसदारांना 2 लाख रुपये अनुदान मिळणार आहे. तसेच वरील अपघातात संबंधितांना अपंगत्व आल्यास अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय निकामी झाल्यास 2 लाख रुपये अनुदान मिळणार आहे. तसेच  अपघातामुळे एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास 1 लाख रुपये अनुदान मिळणार आहे.

अपघातात समाविष्ट नसलेल्या बाबी:

नैसर्गिक मृत्यू, विमा कालावधी पूर्वीचे अपंगत्व, आत्महत्येचा प्रयत्न, आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वतःला जखमी करून घेणे, गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात, अमली पदार्थाच्या अमलाखाली असताना झालेला अपघात, भ्रमिष्टपणा, शरीरांतर्गत रक्तस्त्राव, मोटार शर्यतीतील अपघात, युद्ध, सैन्यातील नोकरी, जवळच्या लाभधारकाकडून खून आदी.

शासनाच्या अन्य विभागाकडून लाभ घेतल्यास अपात्र :

सदर योजनेअंतर्गत लाभास पात्र असलेल्या शेतकऱ्यांने/शेतकऱ्याच्या कोणत्याही वारसदाराने शासनाच्या अन्य विभागांकडून अपघातग्रस्तांसाठी कार्यान्वित असलेल्या योजनेचा लाभ घेतला असल्यास सदर लाभार्थी या योजनेअंतर्गत लाभास पात्र ठरणार नाहीत.

अनुदानास पात्र प्राथम्य क्रमानुसार वारसदार :

अपघातग्रस्ताची पत्नी/ अपघातग्रस्त स्त्रीचा पती, अपघातग्रस्ताची अविवाहित मुलगी, आई, मुलगा, वडील, सून तसेच अन्य कायदेशीर वारसदारांना या योजनेचा लाभ घेता येतो.

आवश्यक कागदपत्रे:

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत लाभ प्राप्त होण्यासाठी प्रस्तावासोबत (क्लेम फॉर्म, भाग 1), सातबारा उतारा, मृत्यूचा दाखला, शेतकऱ्यांचे वारस म्हणून गावकामगार तलाठीकडील गाव नमुना नं. 6-क नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद, वारसदाराचे ओळखपत्र जसे आधार कार्ड, पॅनकार्ड, बँक पासबुक, निवडणूक ओळखपत्र आदी. तसेच अपघातग्रस्ताचा वयाचा दाखला जसे जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, शाळेच्या मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र, ग्रामपंचायतचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, पारपत्र, निवडणूक ओळखपत्र यापैकी कोणतेही एक कागदपत्र त्यासोबतच प्रथम माहिती अहवाल/ घटनास्थळ पंचनामा/पोलीस पाटील माहिती अहवाल, अपघाताच्या स्वरूपानुसार अंतिम प्रस्तावासोबत सादर करावयाचे कागदपत्र (प्रपत्र-अ).

योजना अंमलबजावणीची कार्यपद्धती :

अर्जदाराने आवश्यक कागदपत्रांसह सविस्तर प्रस्ताव विहित नमुन्यात क्लेम फॉर्म भाग 1 नुसार अपघात झाल्याच्या दिवसापासून 30 दिवसाच्या आत संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करणे बंधनकारक आहे. या योजनेमध्ये तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समिती तयार करण्यात येत असून तालुका कृषी अधिकारी हे सदस्य सचिव असणार आहे. तालुकास्तरीय समितीने मंजूर केलेल्या प्रस्तावांच्या अनुषंगाने पात्र लाभार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेला निधी कृषी आयुक्तालय स्तरावरून संबंधित जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्यामार्फत तालुका कृषी अधिकारी कार्यालयास बीडीएस प्रणालीद्वारे वितरित केला जाईल. तदनंतर तालुका कृषी अधिकारी यांच्यामार्फत संबंधित अपघातग्रस्त शेतकरी व वारसदारांच्या बँक खात्यात ईसीएसद्वारे निधी अदा करण्यात येईल, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकरराव तोटावार यांनी कळविले आहे.


gopinath munde shetkari apghat vima yojana. Prabhudeva GR & sheti yojana


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.