Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, नोव्हेंबर ०५, २०१४

14 ते 19 नोव्हेंबर स्वच्छ भारत विशेष अभियान

जिल्हाधिकारी डॉ. दिपक म्हैसेकर

चंद्रपूर दि.05- केंद्र व राज्य सरकारने स्वच्छ भारत अभियान प्राधान्याने राबविण्याचा निर्णय घेतला असून त्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्हयात 14 ते 19 नोव्हेंबर दरम्यान स्वच्छ भारत विशेष अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. दिपक म्हैसेकर यांनी दिली. ते विविध विभागाच्या खाते प्रमुखांच्या बैठकीत बोलत होते. अप्पर जिल्हाधिकारी संजय धिवरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुधाकर कुळमेथे, उपजिल्हाधिकारी दामोधर नान्हे, पंकज चौबळ व विविध विभाग प्रमुख उपस्थित होते.

स्वच्छ भारत अभियानाची सुरवात जिल्हाधिकारी कार्यालयापासून सुरु करण्यात येणार आहे. शासनाच्या विविध कार्यालयाने आपले कार्यालय स्वच्छ ठेवणे, फाईल व इतर साहित्य व्यवस्थित लावणे, कार्यालयाचा परिसर स्वच्छ ठेवणे व कार्यालयाचे प्रसाधनगृह स्वच्छ ठेवणे हे या अभियानात अपेक्षित असल्याचे जिल्हाधिका-यांनी सांगितले. यासाठी राज्य शासनाने मार्गदर्शक तत्वे जारी केली असून त्यानुसार विभाग प्रमुखानी कार्यवाही करावी असे ते म्हणाले.

शासकिय कार्यालयाची स्वच्छता तपासण्यासाठी तपासणी पथके तयार करण्यात आली असून 10 ते 12 तारखे दरम्यान प्रत्येक शासकीय कार्यालयाची पहाणी करण्यात येणार आहे. त्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयाने तयार केलेली पथके पहाणी करतील. या पहाणीत ज्या कार्यालयात अस्वच्छता आढळून येईल. त्या कार्यालयाच्या प्रमुखांवर कारवाई करण्यात येईल असे जिल्हाधिका-यांनी सांगितले.

स्वच्छ भारत अभियानात स्वच्छतागृहाची दुरुस्ती करणे, महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची व्यवस्था करणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आदि बाबी अपेक्षित आहेत. या व्यवस्था निट झाल्या किंवा नाही हे पाहण्यासाठी आपण शासकीय कार्यालयांना आकस्मिक भेटी देणार असल्याचे जिल्हाधिका-यांनी यावेळी नमुद केले. स्वच्छ परिसर ही सुध्दा जबाबदारी विभाग प्रमुखाची असणार आहे. अधिकारी-कर्मचा-यांनी स्वच्छतेची सवय लावावी असे सांगतानाच कोणीही अस्वच्छता करु नये असे निर्देश त्यांनी दिले.

बसस्थानक व बसथांबे या ठिकाणी विशेष काळजी घेण्याच्या सूचना जिल्हाधिका-यांनी आगार प्रमुखांना दिल्या. महानगरपालिका व जिल्हा पोलीस अधिक्षक हे त्यांच्या स्तरावर स्वतंत्र बैठका घेवून स्वच्छतेसंबधी सुचना देणार असल्याचे जिल्हाधिका-यांनी नमुद केले.

पुढील पाच वर्षातील विकास कामाचे नियोजन काय आहे यासंबंधीचे व्हिजन डॉक्युमेंट प्रत्येक विभागाने तयार करावे अशा सुचना जिल्हाधिका-यांनी या बैठकीत दिल्या. कामाचे प्रस्ताव तयार करतांना प्राधान्यक्रम ठरवावा असेही त्यांनी सांगितले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.