Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, सप्टेंबर १५, २०२३

सावरटोला येथे मारबत मिरवणूक प्रचंड उत्साहात. ढेकुण, मोंग्सा, खासी, खोकला, डेंगू, चिकनगुनिया, रोग-राई, ईडापीडा घेऊन जा---- गे----- मारबत!_





संजीव बडोले
नवेगावबांध दि१५ सप्टेंबर:
ढेकुण, मोंग्सा, खासी, खोकला, डेंगू, चिकनगुनिया, रोग-राई, ईडापीडा घेऊन जा---- गे----- मारबत!_ अशा घोषणा दे आज पहाटे सावरटोला गावातून प्रचंड उत्साहात,आनंदात आबाल वृद्धा पासून सर्व गावकरी महिला पुरुष सहभागी होऊन गावातून मारबतीची मिरवणूक काढण्यात आली. गावाबाहेरील सम्राट अशोक विद्यालया जवळील मारबत स्थळी दहन करून, गावात सुख,शांती, समृद्धी,वैभव व आरोग्यनांदो अशी कामना केली.
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सावरटोला या गावात बैलपोळ्याच्या दुसऱ्या व तान्हा पोळ्याच्या दिवशी मारबतीची मिरवणूक काढण्याची जुनी परंपरा आहे. आज पहाटेला मारबतीची मिरवणूक गावातून मुख्य मार्गावरून काढण्यात आली.
यामध्ये आबाल-वृद्धासह सर्व गावकरी मोठ्या आनंदाने उत्साहाने सहभागी झाले होते.
आजच्या दिवशी  ओळख असलेल्या औषधी जंगली वनस्पतीचे पूजन करून,आवश्यक तेवढा साठा वैद्यराज जंगलातून घेऊन येतात. वनस्पती जतन करून ठेवली जाते.
या निमित्ताने समाजातील वाईट चालीरीती आणि रोगराई दूर करण्याचे साकडे मारबतीला घालण्यात येते. या उत्‍सवात राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय मुद्यांसह स्थानिक समस्यांवरही भाष्य करणारे फलक आणि सूचक ओळींनी जनतेच्या मनातला प्रशासनाच्‍या विरोधात राग आणि संताप व्यक्त होतो.
. समाजातील अनिष्ट प्रथा नष्ट करण्याच्या उद्देशाने बैल पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मारबत मिरवणूक काढण्यात येते.मारबत म्हणजे वाईट परंपरा, अंधश्रद्धा जाळणे. चांगल्या परंपरा आणि विचारांचे स्वागत करणे.हा यामागचा एक उद्देश आहे.तान्ह्या पोळ्याच्या दिवशी लहान मुले गल्लीबोळांतून “घेऊन जा रे मारबत ,घेऊन जा रे मारबत” असे ओरडत फिरत असतात. काठ्या, बांबू, तरट ह्यापासून मोठे पुतळे बनवले जातात, त्यावर फाटके कपडे, चिंध्या गुंडाळतात व विविध रंगांनी रंगवतात. मारबतबरोबर जो बडग्या असतो त्याच्या गळ्यात मोडके झाडू, फाटके कपडे, फुटके डबे, टायरचे तुकडे ह्यांच्या माळा घालतात.या निमित्ताने समाजातील वाईट चालीरीती आणि रोगराई दूर करण्याचे साकडे मारबतीला घालण्यात येते.
मराठी शब्दकोशात मारबत-द—स्त्री. १ (व. ना) धिंड; मिरवणूक. २ पोळ्याच्या दुसऱ्या दिवशीं गांवांतील इडापिडा, रोगराई बाहेर नेऊन घालविण्या- साठीं सोंगें वगैरे काढून मिरवणूक काढतात ती; बरसातींत रोगराई उत्पन्न करणारी मारबत नांवाची देवता; हिच्या प्रीत्यर्थ वरील मिरवणूक काढतात .त्यावेळीं गांवाबाहेर जाळण्यांत येणारी बांबू व कागद यांची केलेली आक्राळविक्राळ, प्रचंड स्त्रीरूपी प्रतिमा. ॰खेदणें-(ना.) (एखाद्यास) हांकून लावणें; (एखाद्याची) हुर्यो उडविणें.
अशी व्याख्या व अर्थ दिला आहे.
काही का असेना,पण जीवनातील दुःख हारून,सुखाची आशा बाळगणे जगण्याला नवे बळ व ऊर्जा याची आशा करणे या मानवी स्वभावाची प्रचिती येते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.