Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, मे १७, २०११

एसटी धावतेय जोरात





सकाळ वृत्तसेवा



Monday, May 09, 2011 AT 12:00 AM (IST)



Tags: st, income, growth, maharashtra, chandrapur, north maharashtra







श्रीकांत पेशट्टीवार : सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर - अवैध वाहतुकीला शह देण्यासोबत प्रवाशांना आपल्याकडे वळते करण्यासाठी एसटी महामंडळाने राबविलेल्या विविध प्रयत्नांचे परिणाम आता दिसू लागले आहेत. काही वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या "प्रवासी वाढवा' अभियानाने महामंडळाच्या उत्पन्नात दुप्पट वाढ झाली आहे. यावर्षी तीन महिन्यांत चंद्रपूर विभागाला 28 कोटी 68 लाख 95 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. मागीलवर्षी हाच आकडा 24 कोटी 74 लाख 27 हजारांच्या घरात होता. दोन वर्षांत तीन कोटी 94 लाख 68 हजारांनी उत्पन्नात वाढ झाली आहे.

जिल्ह्यात अवैध वाहतूक जोरात सुरू आहे. भाव कमी आणि सेवा चांगली, यामुळे काही वर्षे जिल्ह्यात खासगी वाहतुकीचाच बोलबाला होता. याच कारणामुळे प्रवाशांनी एसटीला पाठ दाखविली होती. याचा परिणाम एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर झाला. उत्पन्नात मोठी घट झाली होती. प्रवाशांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी एसटी महामंडळाने 1999 च्या सुमारास "प्रवासी शतक' अभियान सुरू केले. महामंडळाला या अभियानाचे चांगले परिणाम काही वर्षांतच दिसू लागले होते. याच अभियानाच्या धरतीवर आता सुरू करण्यात आलेल्या प्रवासी वाढवा अभियानाला जिल्ह्यातही चांगला प्रतिसाद मिळत आहे. नागपूर विभागात चार जिल्हे येतात. यात नागपूर, भंडारा, वर्धा आणि चंद्रपूर विभागाचा समावेश आहे. चंद्रपूर विभागात सात डेपो आहेत, तर नागपुरात आठ, वर्धा सहा, भंडारा येथे सहा डेपो आहेत.



चंद्रपूर विभाग अव्वल

प्रवासी वाहतूक कमी असते, त्या काळात परिवहन महामंडळ प्रवासी वाढवा अभियान राबविते. साधारणतः जानेवारी ते मार्च महिन्यात हे अभियान राबविले जाते. या काळात विभागाला प्रवाशांचे "टार्गेट' असते. चंद्रपूर विभागाला जानेवारी महिन्याचे 54 लाख 55 हजारांचे उद्दिष्ट होते. या महिन्यात 57 लाख 19 हजार प्रवाशांनी जिल्ह्यातील विविध आगारातून प्रवास करून जिल्ह्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यास सहकार्य केले. फेब्रुवारी महिन्यात 47 लाख 45 हजारांचे उद्दिष्ट होते. तेही पूर्ण करण्यात चंद्रपूर विभागाला यश आले. या महिन्यात 50 लाख 69 हजार प्रवाशांनी बसला पसंती दिली. मार्च महिन्यात 51 लाख 90 हजारांचे उद्दिष्ट होते. तेही पूर्ण झाले. या महिन्यांत 54 लाख 20 हजार प्रवाशांनी सेवेचा लाभ घेतला.





बक्षीस योजना



या अभियानांतर्गत उद्दिष्टाची पूर्तता करणाऱ्या विभागाला महामंडळातर्फे बक्षिसे देण्यात येतात. दर महिन्यात समारंभ घेऊन बक्षिसे वितरित करण्यात येतात. 50, 25 आणि 15 हजार रुपये अशी बक्षिसे डेपोला देण्यात येत होती. आता या बक्षिसाच्या रकमेत वाढ झाली आहे. एक लाख, 75 हजार आणि 50 हजार, अशी ही बक्षिसे देण्यात येतात, तर विभागासाठी 50 हजार रुपयांचे बक्षीस आहे. चंद्रपूर विभागाने दोनदा बक्षीस प्राप्त केले आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वाहकासही बक्षीस दिले जाते.







तीन कोटी 94 लाखांची वाढ



प्रवासी वाढवा अभियानाने प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे उत्पन्नातही वाढ झाली. मागीलवर्षी यातून 24 कोटी 74 लाख 27 हजारांचे उत्पन्न मिळाले होते. यावर्षी हाच आकडा 28 कोटी 68 लाख 95 हजारांच्या घरात पोचला आहे. म्हणजे दोन वर्षांत तीन कोटी 94 लाख 68 हजारांनी उत्पन्न वाढले आहे.







प्रवासी वाढवा अभियानाचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. दिलेले उद्दिष्ट आम्ही प्रवाशांच्या सहकार्यातून पूर्ण करू शकलो आहे. यामुळे उत्पन्नही वाढले आहे.





राजीव घाटोळे

विभागीय नियंत्रक, चंद्रपूर विभाग.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.