तहसिलमध्ये ई-ऑफिस राबविणारा वर्धा पहिला जिल्हा
तहसिलस्तरावर शासकीय फाईलींना वेग
विभागीय आयुक्तांकडून जिल्हाधिकाऱ्यांचे कौतुक
नागपूर, दि. 9 : शासकीय कामकाज अधिक स्मार्ट व गतिमान होण्यासोबतच सर्वसामान्य नागरिकांना जलद, पारदर्शक आणि कालमर्यादेत सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ई-ऑफिस प्रणाली राबविली जात आहे. या प्रणालीचा जिल्हा, उपविभाग व तालुकास्तरावर अवलंब करणारा वर्धा हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी या उपलब्धीसाठी वर्धा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले याचे आज कौतुक केले.
विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आज झालेल्या विभाग स्तरीय बैठकांमध्ये सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी उपस्थित होते. सर्व जिल्ह्यांमध्ये तालुकास्तरांवर ई -ऑफिस प्रणाली राबवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी आज दिले.
वर्धा जिल्हयात सुरुवातीस आर्वी उपविभागातील तहसिलमध्ये सुरु करण्यात आलेली ही प्रणाली आता जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयात कार्यान्वित झाली आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा स्मार्ट प्रशासनावर भर असल्याने अल्पावधितच सर्व तहसिल ई-ऑफिसने जोडली गेली.
सुरुवातीच्या काळात केवळ मंत्रालय व राज्यस्तरीय कार्यालयांमध्ये या प्रणालीचा अवलंब केला जात होता. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालये ई-ऑफिसने जोडली गेली. सर्वस्तरावरील शासकीय कामकाज या प्रणालीद्वारे करण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी येथे रुजू झाल्यानंतर तीनही उपविभागीय कार्यालयांमध्ये ही प्रणाली कार्यान्वित केली. तालुकास्तरावर सुरुवातीस आर्वी विभागातील तीन तालुक्यांमध्ये राबविल्यानंतर आता सर्व तहसिलमध्ये ही प्रणाली कार्यान्वित झाली आहे.
तालुकास्तरावर ही गतीमान प्रणाली राबविण्यासाठी तालुकास्तरीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. तांत्रिक सहाय्य महाआयटीच्यावतीने उपलब्ध करून देण्यात आले. नागरिकांची कामे गतीने व्हावी, त्यांचा त्रास आणि पैसा वाचावा यासाठी ही प्रणाली अत्यंत उपयोगी ठरली आहे. शासकीय विभागांच्या फाईल्स प्रत्यक्ष या टेबलवरुन त्या टेबलवर फिरतात. ई-ऑफिसच्या पेपरलेस कामकाजामुळे फाईली ऑनलाईन सादर होतात आणि ऑनलाईनच पुढे जात असल्याने फाईलींचा निपटारा वेळेत होतो, शिवाय कामात पारदर्शकता, गतिमानता देखील येते. नागरिकांचे कार्यालयात येणारे अर्ज, विनंत्या, तक्रारी देखील ई-ऑफिसद्वारे सादर होत असल्याने त्यावर देखील कालमर्यादेत कारवाई होते.
विभागीय आयुक्तांकडून जिल्ह्याचे कौतूक
मार्च महिन्यात आर्वी उपविभागातून ई-ऑफिस प्रणाली राबविण्यास सुरुवात झाली. आर्वी तहसिलने या प्रणालीद्वारे सर्वप्रथम फाईल तयार करून राज्यात पहिला तालुका होण्याचा मान मिळविला. त्यानंतर कारंजा व आष्टीने ही प्रणाली राबविली. आता जिल्ह्यातील सर्वच तहसिलमध्ये ही प्रणाली कार्यान्वित झाली आहे. तालुकास्तरावर सर्व तहसिलमध्ये प्रणाली राबविणारा वर्धा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी जिल्ह्याच्या या कामाचे कौतुक केले आहे.
कामकाज गतिमान आणि पारदर्शकपणे होते - राहुल कर्डिले
शासकीय कामकाज गतिमान आणि पारदर्शक करण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यामुळे ई-ऑफिससारखी प्रणाली अमलात आणली आहे. सुरुवातीस आपण उपविभागीय कार्यालये ई-ऑफिस केली. त्यानंतर आर्वी विभागातील तीनही तालुक्यात ही प्रणाली कार्यान्वित केली. आता सर्वच तहसिल कार्यालये या प्रणालीने जोडल्या गेली आहे. ई-ऑफिसमुळे कामे गतीने होतात. शासकीय फाईलींचा निपटारा लवकर होतो. नागरिकांना कमी त्रासात, कमी वेळेत सेवा उपलब्ध होते, असे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले.