Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, मे १९, २०२३

जातीचे प्रमाणपत्र कसं काढायचं? अर्ज कुठे करायचा? वाचा ...jat pramanpatra

विशेष
जात वैधता प्रमाणपत्र –एक गरज

सध्या परीक्षेचा मौसम सुरू आहे. वर्ग दहावी व बारावीच्या परीक्षा संपल्या आहेत. त्याचबरोबर वेगवेगळया अभ्यासक्रमाच्या सामाईक परीक्षा सुद्धा सुरू आहे. जेईई, नीट सीईटी, परीक्षांपैकी काही परीक्षा संपल्या आहेत व निकाल यायला सुरुवात झालेली आहे.

निकाल लागल्यानंतर सर्व विद्यार्थी व पालकांची प्रवेशाकरीता कागदपत्रांची जुळवणी सुरु आहे. आरक्षणांतर्गत राखीव प्रवर्गात प्रवेश घ्यावयाचा असल्यास महत्वाचे प्रमाणपत्र म्हणजे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र होय. असे जात वैधता प्रमाणपत्र आपण प्राप्त केले नसेल तर प्रवेशाच्या वेळेपर्यत आपणाकडे वैधता प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. जात वैधता प्रमाणपत्र नसल्यास आपण आरक्षित प्रवर्गाचे असून सुध्दा आपल्या हक्कापासून वंचित राहू शकता. जात वैधता प्रमाणपत्र प्रक्रिया काय आहे हे आपण समजून घेऊया…



जात वैधता प्रमाणपत्राची गरज :-

जे विद्यार्थी १२ वी पास झाल्यानंतर व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेणार असेल अशा विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. बारावी विज्ञान शाखतील अभियांत्रिकी, वैद्यकीय, औषधोपचार, स्थापत्य, पशुवैद्यकिय,मत्स्य,विधी शाखा, बॅचलर ऑफ फाईन आर्ट अशा प्रकारे बारावीच्या आधारे ज्या व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावयाचा आहे त्याकरिता जात वैधता प्रमाणपत्राची गरज आहे.



जात प्रमाणपत्र कुठे काढावे :-

राखीव प्रवर्गात असणा-या बहुतांश विद्यार्थ्याकडे जातीचे प्रमाणपत्र वर्ग दहावी पूर्वीच काढलेले असते परंतु त्याने जातीचे प्रमाणपत्र काढण्यापूर्वी काही गोष्टीची माहिती घेऊनच जातीचे प्रमाणपत्र काढणे आवश्यक असते.

जातीचे प्रमाणपत्र हे अर्जदाराच्या वाडवडीलांचे कायमस्वरुपी वास्तव्य एका निश्चित तारखेस ज्या ठिकाणी होते त्याच ठिकाणी काढणे आवश्यक आहे. उदा.अनुसूचित जाती प्रवर्गातील अर्जदार असल्यास १० ऑगष्ट १९५० पूर्वी अर्जदाराचे वाडवडील ज्या ठिकाणी वास्तव्य होते त्याच ठिकाणी जातीचे प्रमाणपत्र काढणे आवश्यक आहे. अशाच प्रकारे इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गाकरीता १३ ऑक्टोबर १९६७, विमुक्त जाती व भटक्या जमाती साठी २१ नोव्हेबर १९६१ पूर्वी ज्या ठिकाणी वास्तव्य होते त्या ठिकाणी जातीचे प्रमाणपत्र काढणे आवश्यक आहे.

वरीलप्रमाणे अर्जदाराच्या वाडवडीलांचे वास्तव्य नसतांना सक्षम प्राधिका-याने (उपविभागीय अधिकारी) जातीचे प्रमाणपत्र दिल्यास ते जात प्रमाणपत्र जात पडताळणी समितीमार्फत अवैध ठरविले जाते. एखाद्या अर्जदाराने वाडवडील, शिक्षण, रोजगार निमित्त एखाद्या भागात मानीव दिनांकानंतर वास्तव्यास गेले असल्यास त्यांनी त्या ठिकाणी जातीचे प्रमाणपत्र काढू नये. त्यांचे मुळ वास्तव्याच्या ठिकाणी प्रमाणपत्र काढावे तेच प्रमाणपत्र ग्राह्य राहील.

जातीचे प्रमाणपत्र अचूक असावे :-

आपण जे जातीचे प्रमाणपत्र काढतो ते पुन्हा तपासून पहावे. स्वत:चे जातीचे प्रमाणपत्र शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जे स्पेलींग आहे अथवा वर्ग १० वी च्या बोर्ड प्रमाणपत्रावरील स्पेलींगप्रमाणेच स्पेलींग असावे. तसेच प्रमाणपत्रावर रेव्हेन्यू क्रमांक नमुद असावा, प्रमाणपत्र निर्गमित दिनांक, जातीचे स्पेलींग व जातीचा प्रवर्ग अचूक आहे हे अर्जदारानेच पाहून घ्यावे. वरील बाबी अर्जदाराच्या प्रमाणपत्रामध्ये चुकीच्या असल्यास ज्या कार्यालयाकडून जातीचे प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. त्या कार्यालयाकडून जातीचे प्रमाणपत्र दुरुस्ती करुन घ्यावे व त्याची पडताळणी करावी.





जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रिया ऑनलाईन आहे. जात प्रमाणपत्र पडताळणी करीता करावयाचा अर्ज www.barti.evalidity.maharashtra.gov.inया वेबसाईडवर अर्ज करावयाचा असतो. अर्ज करावयाचा असतो. अर्ज करतांना अर्जदाराला मुळ कागदपत्रे अपलोड करावयाची असतात. सर्वप्रथम अर्जदाराने मुळ जातीचे प्रमाणपत्र,अर्जदाराचा शाळा सोडल्याचा दाखला,वडीलांचा शाळेचा दाखला अथवा वडील अशिक्षित असल्यास शपथपत्र, आजोबा, पंजोबा, चुलत आजोबा शिक्षीत असल्यास त्यांचे प्राथमिक शाळेचे दाखले अथवा दाखल खारीत उतारा, महसुल विषयक पुरावे उपलब्ध असल्यास अधिकार अभिलेख पंजी,पी-१, पी-२, बंदोबस्त मिसळ, जुने खरेदी-विक्रीपत्र, मेंटेनन्स खासरा, जुनी कर आकारणी, इ.याव्यतिरिक्त असा कुठलाही पुरावा जो अर्जदाराच प्रवर्गानुसार मानीव दिनांकाच्या कालावधीतील असून ज्यावर वास्तव्याचे गाव व जात नमुद आहे असा पुरावा अपलोड करावा व प्रस्तावासोबत संलग्न करावा.

शपथपत्र :-

जात प्रमाणपत्र पडताळणीच्या प्रस्तावासोबत दोन शपथपत्र जोडणे आवश्यक आहे. शपथपत्र कुठल्याही रकमेच्या स्टॅम्पपेपरवर आवश्यक नाही. साध्या को-या कागदावर लिहिलेले व नोंदणीकृत असावे.नमुना १७ व नियम १४ अन्वये कागदपत्रे खरे असल्याबाबत शपथपत्र असते तसेच यामध्ये कागदपत्रे बनावट असल्यास शिक्षेस पात्र राहिल अशा आशयाचे शपथपत्र असते.तसेच यामध्ये कागदपत्रे बनावट असल्यास शिक्षेस पात्र राहिल अशा आशयाचे शपथपत्र असते.दुसरे शपथपत्र नमुना ३ नियम ४ नुसार कुटुंबाची वंशावळ असते. वंशावळी मध्ये कागदपत्रे संलग्न करतो त्या सर्वांचा वंशावळीमध्ये उल्लेख असावा.

सर्व मूळ कागदपत्रे व मूळ शपथपत्रे ऑनलाईन अपलोड करावी.यासोबत ज्या महाविद्यालयाा विद्यार्थी आहे त्या प्राचार्याच्या स्टॅम्प व स्वाक्षरीचे फॉर्म नं.१५ ए सुध्दा अपलोड करावे. सर्व कागदपत्रे अपलोड करुन ऑनलाईन भरलेल अर्जाची प्रिंट काढावी व त्यासोबत अपजलोड केलेली सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती सक्षम प्राधिका-याकडून साक्षांकित केलेली असावी. मूळ शपथपत्रासह अर्ज कार्यालयात जमा करावा.त्यावर समिती १५ ते ३० दिवसांच्या आत कार्यवाही करुन निर्ण्य देते.आक्षेप असल्यास ऑनलाईन त्रुटी कळविल्या जातात. त्या त्रुटीची पूर्तता करावी.

दक्षता :-

अर्ज भरतांना जात प्रमाणपत्रावरील माहिती अचुक भरावी.खरे कागदपत्रे अपलोड करावे व सलंग्न करावे.सबंध नसलेली कागदपत्रे जोडू नये.तसेच खोटे व बनावट कागदपत्रे सादर करु नये.

मानीव दिनांकाचे पुरावे नसल्यास दक्षता पथकामार्फत चौकशी करुन निर्णय दिला जातो.अशा प्रकारे खरा मागासवर्गीय अर्जदार योग्य कागदपत्रे असल्यास लाभापासून वंचित राहणार नाही याचा प्रयत्न समिती करते. तसेच खोटे व बनावट कागदपत्रे सलंग्न केल्यास शिक्षेची तरतुद सुध्दा आहे



श्री. सुरेंद्र पवार
उपायुक्त तथा सदस्य
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती,
नागपूर.







SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.