Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, सप्टेंबर ०१, २०२२

आधारकार्ड मतदान कार्डशी जोडू या ! Adhar Card Voter list

चला ! लोकशाही बळकट करु या !


लोकशाही ही जगातील स्रावाधिक लोकाभिमुख शासन प्रणाली मानली जाते. या प्रणालीत समाजातील सर्व वर्ग आणि विचारधारांना प्रशासनात प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते. लोकशाहीत मतदार हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. यासाठी मतदार यादी अद्ययावत असणे आवश्यक आहे. मतदार यादी निर्दोष असावी यासाठी भारत निवडणूक आयोग सतत दक्षता घेत असतो. या प्रक्रियेत निवडणूक आयोगाने ‘मतदार यादी आधारकार्डशी जोडण्या’चा उपक्रम हाती घेतला आहे. या मोहिमेतले पहिले शिबिर 11 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे.

सर्वात आधी मतदार यादीत मतदाराचे फक्त नाव असायचे. नंतरच्या काळात त्यात मतदारांचे छायाचित्रही जोडण्यात आले. यामुळे मतदारांची निश्चित ओळख पटण्याला ठोस पुरावा मिळाला. घर बदलणे, नोकरी-धंद्यानिमित्त दुसऱ्या गावात स्थानांतरित होणे या स्थितीत बहुसंख्य लोकं याबाबत मतदारयादीत नोंद करत नाहीत यामुळे, मतदारयादी दुरुस्ती मोहीमेत या मतदारांची नावे मतदारयादीतून गाळली जातात व स्थानांतरित मतदारांची मतदारयादीत नोंद न होण्याची शक्यता असते. हा गोंधळ टाळण्यासाठी गरजेनुसार ‘मतदारयादी दुरस्ती मोहीम’ राबवली जाते.

दरम्यान, नोंद प्रक्रियेत अचूक यादी तयार करण्यात आधारकार्डचे महत्त्व लक्षात आले. यामुळे कोणतीही यादी अचूक तर होतेच, शिवाय या यादीत गैरप्रकार होण्याचा धोकाही फार कमी होतो. हे सर्व लक्षात घेऊन 1 ऑगस्ट 2022 पासून मतदारयादी आधारकार्डशी जोडण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे. हा उपक्रम 31 मार्च 2023 पर्यंत सुरू राहणार आहे.

‘मतदार यादी आधारकार्डशी जोडणे’ हे या मोहिमेचे धोरणात्मक नाव आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश्य मतदाराची अचूक ओळख निश्चित करणे, नोंदींचे प्रमाणीकरण करणे, एका मतदाराचे नाव एकापेक्षा जास्त वेळा किंवा एकापेक्षा जास्त मतदारयादीत असेल तर ते दुरुस्त करणे, ज्या मतदारांची नावे मतदारयादीत नसतील त्यांची नावे या यादीत नोंदणे असा आहे. त्यामुळे, ज्या लोकांजवळ आधार कार्ड नाही त्यांना दिलेल्या पर्यायी ओळखपत्रांच्या आधारे त्यांची नावे मतदारयादीत नोंदता येतील किंवा त्यात दुरुस्ती करता येईल.

आजही काही लोकांजवळ आधारकार्ड नाही, ते नमुना क्रमांक 6 ब मध्ये नमूद केलेल्या 11 पर्यायी कागदपत्रांपैकी एक (पॅनकार्ड, फोटोसह किसान पासबुक, पासपोर्ट, इपिककार्ड, मनरेगा जॉबकार्ड, आरोग्य स्मार्टकार्ड, ड्रायव्हिंग लायसन, फोटोसह पेंशन कागदपत्र, केंद्र / राज्य शासन कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र, सामाजिक न्याय विभागातील ओळखपत्र इत्यादी) सादर करू शकतील.

आधार संकलनाची पद्धत

लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950 मधील कलम 23 मधील तरतुदीनुसार मतदार यादीतील विद्यमान मतदारांना त्यांचा आधार क्रमांक भरण्यासाठी नोंदणी नियम 1960 मधील नियम 26 ब मध्ये नमुना अर्ज क्रमांक 6 ब तयार करण्यात आला आहे, तो भारत निवडणूक आयोगाच्या आणि मुख्य निवडणूक आयोगाच्या संकेत स्थळावर उपलब्ध असेल. तसेच ऑनलाईन आधार क्रमांक भरण्यासाठी अर्ज क्रमांक 6 ब ERO Net, GARUDA, NVSP, VHA यावर उपलब्ध असेल. अर्ज क्रमांक 6 ब च्या छापील प्रती देखील उपलब्ध आहेत.

सुविधा पोर्टलची मदत

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी ‘सुविधा पोर्टल’ ऍपच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. आधार क्रमांक ऑनलाईन दोन पद्धतीने भरता येईल –

१) स्व – प्रमाणीकरण – भारत निवडणूक आयोगाने विकसित केलेल्या पोर्टल / ऍपच्याद्वारे मतदार ऑनलाईन अर्ज क्रमांक 6 ब भरून आधार क्रमांक नोंदवू शकतो आणि UIDAI कडे नमूद असलेल्या मोबाईल क्रमांकवर प्राप्त OTP ने आधारचे प्रमाणीकरण करू शकतो.

(२) स्व – प्रमाणीकरणाशिवाय – मतदारस स्वप्रमाणीकरण करायचे नसल्यास किंवा वरीलप्रमाणे प्रमाणीकरण होत नसल्यास, स्वप्रमाणीकरणाशिवाय ऑनलाईन अर्ज क्रमांक ६ भरून त्यासोबत आवश्यक दस्तावेज सादर करता येतील.

सुरक्षा कशी आहे

आधार क्रमांक मतदार यादीसोबत जोडण्याबाबत काही लोकांना सुरक्षेबाबत शंका आहेत. पण, निवडणूक आयोगाने आधारच्या क्रमांकाच्या सुरक्षेबाबत आवश्यक खबरदारी घेतली आहे. मतदाराचा आधार क्रमांक संकलित करताना आणि हाताळताना Section 37 of (Targeted Delivery of Financial and Other Subsidies, Benefits and Services) Act, 2916 मधील तरतुदींचे पालन करणे आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीत, मतदाराच्या आधाराचा तपशील सार्वजनिक होता कामा नये. मतदाराची माहिती सार्वजनिक करणे आवश्यक असेल तर त्यातील आधारचा तपशील काढून टाकणे किंवा झाकणे आवश्यक आहे.

विविध माध्यमांद्वारे ERONET मध्ये डिजिटल केलेला 12 अंकी आधार क्रमांक कोणत्याही परिस्थितीत ERONET मध्ये संग्रहित केला जाणार नाही. UIDAI च्या संबंधित नियमानुसार सदर आधार क्रमांक भारत निवडणूक आयोगाद्वारे परवानाधारक आधार व्होल्टमध्ये संग्रहित करण्यात येईल.

मोहीम कशी आहे

या मोहिमेसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नागपूर यांनी ‘आपल्या आयुष्यात पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असतो. तसेच लोकशाहीला मजबूत करण्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे असते’ आणि लहान असताना भिजण्यात कही वेगळीच मजा होती; आता 18 वर्षे पूर्ण झालेत ... मतदान करून तर बघा, हा आनंद देखील तेवढाच वेगळा असेल’ अशी कल्पक घोषवाक्ये तयार केली आहेत.

कार्यक्रम कसा आहे

मतदारयादी आधारकार्डशी जोडण्याचे काम औपचारिकपणे 01.08.2022 रोजी सुरू झाले आहे. यासाठी सर्व राजकीय पक्ष, प्रसारमाध्यमे, एनजीओ, सीएसओ यांचे सहकार्य आपेक्षित आहे. यासाठी पहिले विशेष शिबिर 11 सप्टेंबर 2022 रोजी आयोजित करण्यात आले आहे. यानंतरही अशी शिबिरे आयोजित करण्यात येतील. यात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेट देतील. अशा प्रकारे मतदार यादीतील 100 टक्के मतदारांशी संपर्क करून मतदारयादी आधारकार्डशी जोडण्यात येईल.



सचिन काळे माहिती केंद्र, नागपूर




SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.