लेख
..........................
विश्वाचा मुळ घटक गाव :
ग्रामगीता त्यासाठी
----------------------
लेखक - बंडोपंत बोढेकर गडचिरोली.
ईश्वरे व्यापिले हे विश्व !
म्हणोनि जगचि आम्हा देव ! विश्वाचा मुळ घटक गाव ! ग्रामगीता त्यासाठी !!
गाव म्हणजे दगड , विटांनी बांधलेल्या घरांचा समुह नव्हे तर गावात राहणारी जनता , त्यांचा एकमेकांशी होणारा सुखसंवाद , तेथील ग्रामसंस्कृती होय .त्यातून ग्रामाच्या उत्थानासाठी योग्य ती पावले सामुदायिक पध्दतीने उचलली गेली पाहिजेत , ही ग्रामगीता ग्रंथाची अपेक्षा आहे. त्यामुळेच वं. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांनी ग्रामस्वराज्य प्रयोगाचे महत्त्वाची सूत्रे ग्रामगीता ग्रंथात सांगून ठेवली आहे. आणि ही सूत्रे अंगीकार करण्यासाठी वाचक कसा असावा याबाबत ते लिहितात ,
" परि ऐसी नसावी भावना ! अर्थहिन करीता पारायणा !
ना कळे तरी पुण्यराशी नाना ! जमा होतील आमुच्या !!
धर्म ग्रंथातील शब्दांच्या मागे येणारा अर्थ न समजता केवळ अंधानुकरण करणे यामुळे कुठलाही लाभ होणे नाही . ती नुसती बडबड समजावी.
ज्यांनी आयुष्यभर नुसत्या पोथ्या वाचल्यात आणि त्यांच्याकडून कधीही समाजोपयोगी काही प्रेरणा मिळत नसेल , तर त्यांच्या जीवनाचा अर्थ काय ? . पारायणाची मानसिकता बाळगणारे तथाकथीत ‘पंडीताकडून ग्रामसुधारणेचे खरेच कार्य घडणार आहे काय ? यामुळे समुदायासाठी पुण्यकार्य घडेल काय ? . वं. महाराजांच्या मते हे सारे अज्ञान आहे.
वाचकांनी अज्ञानाच्या अंधारात पडून न राहता आपले ज्ञानचक्षु उघडून नव्या दृष्टीसह ग्रामगीतेचे वाचन करणे आवश्यक आहे , त्याशिवाय शब्दाचा मुळ अर्थ कळणे कठीण आहे.
" प्रथम हीच महत्वाची खुण !
ग्रंथवाचनाचे कळावे ज्ञान !
आपुले वाचन आपणा समजून ! बोध व्हावा उत्तम !!
अर्थहीन ग्रंथपारायण केल्याने पुण्य पदरी जमा होईल ही चुकीची भावना वाचकांनी मेंदुतून दुर करुन ग्रंथातील शब्दांचा नीट अर्थ समजून घ्यावा आणि त्या शब्दांचा अर्थ इतरांनाही समजावून द्यावा . प्रसंगी बोलीभाषेचा उपयोग करुन साध्या शब्दात आपल्या मित्रमंडळींना पटेल अशा स्वरुपात समजावून देण्याचा यथाशक्ति प्रयत्न करावा. ग्रामगीतेच्या अध्याय क्र. ३१ मध्ये उल्लेख आलेला आहे तो असा,
" पावडीमाजी पाय ठेविता ! दावा म्हणे ब्रम्हसत्ता !
त्या जयत्पाल राजसि तारीले तत्वता ! शेवटी ग्रंथचि बोधुनी !!".
मराठीचा आद्यकवी मुकुंदराज यांनी" विवेकसिंधू " या ग्रंथाची रचना शके १११० मध्ये अंभोरा ( ता.कुही जि.नागपूर ) या श्रीक्षेत्री केली. हा ग्रंथ प्रादेशिक व प्राकृत भाषेत आहे. ओवीबध्द असलेला हा ग्रंथ पुर्णत: आध्यात्मिक असून त्यात अनेक बोलीशब्द आलेले आहे. या संदर्भातील आख्यायिका अशी आहे की,त्याच काळात बैतुल जवळ खेडला येथे राजा जयत्पाळ राजा राज्य करीत होता. तो चिकीत्सक होता , तेव्हा त्यांनी अनेक विद्वानांना ब्रम्ह दाखविण्याची आज्ञा केली. परंतु त्यांना ब्रम्ह कुणीही दाखवू शकले नाही . शेवटी आद्यकवी मुकुंदराजांनी विवेकसिंधू च्या माध्यमातून ब्रम्हज्ञानाची माहिती देऊन शंका समाधान केले. एकदंरीत ग्रंथाद्वारे मुकुंदराजानी राजा जयत्पाळांचा उद्धार केला , असा उल्लेख ग्रामगीता ग्रंथात दिसून येतो .
" वाचतानाचि बोध होतो !अंगी स्फुरणभाव उठतो !
कर्म करावयासि वळतो ! जीव जैसा अंतरी !!"
वाचतांना अर्थ कळणे सर्वाधिक महत्वाचे आहे . त्या आधारेच आपल्या चिंतनाची दिशा ही ठरविल्या जाऊ शकते. माझ्या मते आज ज्या वेगाने वाचन संस्कृती ही वाचन विकृती होत आहे, त्या मागेअर्थ न कळणे हेच मुख्य कारण आहे.
" काहे को हरदमबाचत पोथी , क्या सीखा पोथी मॉही !
काम क्रोध मे फॅसा दिवाने, तनउमरी सारी खोई !
चंचल मन तो निसदिन भटके , स्थीर जरा कीन्हा नाही ! ,
कर्मकांड में उमर गुजारी , पत्थर हो बैठा ताही !"
वं. राष्ट्रसंत तुकडोजी महारांजाच्या मते , जर वाचकाला तो जे जे वाचतो आहे याचे ज्ञान होत नसेल तर एकूण वाचनाचा प्रभाव हा जवळजवळ शुन्य आहे. ग्रंथातील शब्दांमध्ये दडलेली विचारशक्ती ही वाचंकांच्या एकूण कौशल्यावर अवलंबून असते. आणि म्हणुन प्रत्येक शब्द वाचतांना त्याचा अर्थ समोरच्या श्रोत्यापर्यत तेवढ्याच सक्षमतेने पोहचेल याची दक्षता घेणे अत्यंत आवश्यक आहे. समग्र समाजाच्या बौध्दीक वास्तविकतेची जाण ठेवुन ग्रंथाचे वाचन आवश्यक आहे. त्याशिवाय वाचक आणि श्रोता याचा संवाद होणे कठीण आहे.
" त्या सर्वातूनि शोधुन घ्यावे ! जे तात्वीक बोध ग्रंथस्वभावे
कर्मठतेच्या भरी न भरावे , अथवा शुष्क पांडित्याच्या " !!
हेच ओळखुन वं. महाराजांनी प्रत्येक वाचकांची कर्तव्य आणि कार्ययोजना स्पष्ट सांगीतलेल्या आहेत . विशेष म्हणजे सामाजिक अध्यात्मच्या संदर्भात तर या दृष्टीने खुपच काळजी घेण्याची गरज आहे.
समाजातील एक तथ्य असेही आहे की शेकडो वाचक हे केवळ गरज म्हणुन ग्रंथाचे वाचन करतात . त्यांच्या त्या वाचनाला तसा कुठलाही नैतीक आधार नसतो . केवळ एक परंपरा म्हणून ग्रंथाचे वाचन योग्य नव्हे . या संदर्भात वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिहीतात -
" वाचक असावा आचारशील !, तरीच श्रोत्यावरि परिणाम करील !"
जी व्यक्ती आचारशुन्य आहे आणि केवळ विचार सांगतो आहे. त्याच्या संदर्भात समाजात चांगल्या भावना निर्माण होणे अशक्य आहे. ग्रंथ वाचन म्हणजे मौखीक कसरत करणारे, अशा प्रकारच्या जाणिवांना आत्मसात करणारे आणि घरात मात्र त्याच विचारांच्या उलट वागणारे महाभाग हे जनतेचे शत्रुच होत.
वं. राष्ट्रसंत आचारशिलतेचे महत्व स्पष्ट करतांना या अध्यायात पुढील उदाहरणे देऊन समजवितात की , धन संग्रह करणारा धनवान असेल आणि धनाचे दान न करणारा असेल तर तो उदारदाता कसा ? तहानेने व्याकुळ झालेल्यांना साधे पाणी न देणाऱ्या स्त्रीला दानशुर म्हणता येईल काय ? . सार्वजनीक कार्यक्रमात पान, तंबाखू खाऊन येणे आणि व्यसने सोडा असा उपदेश केल्यास तेथील श्रोते हसणार नाही काय ? .
भोजनाप्रसंगी शांतीपाठ म्हणणे आणि भोजन वाढण्यास उशिर झाला म्हणुन पंडीताने बायकोला मारणे , तो खरा पंडीत असेल काय ? म्हणून वाचक , उपदेशक हा आचारशिल असावा अशी अपेक्षा वं. राष्ट्रसंत करतात .
"ऐसे न व्हावे आता तरी . असोत वाचक वक्ते , शिक्षक भारी !
आहे सर्वावारीच जबाबदारी ! आधी आत्मशुध्दीची !!"
अर्थहिन वाचाळपणा आणि जीवनात आचारशिलता न पाळणारे हे सत्याचे पाईक होणे शक्य नाही.
वाचक हा जागृत असावा . ग्रंथ वाचतांना कुठे थांबावे , कुठे जोर देऊन वाचावे आणि गंभीर वातावरण उभे करावे याचे ज्ञान वाचकांस असायला हवे. जेणेकरुन विषय समजावून देण्यासाठी योग्य वातावरण निर्माण होईल .मूल्यात्मक समाज निर्मितीसाठी आणि प्रत्येकाला जीवनाचा ऐहिक आनंद उपभोगण्यासाठी ग्रामगीतामय व्यवस्था गावोगावी होणे काळाची गरज आहे.
सर्वास असावा संतोष !
दुःख न व्हावे प्राणी मात्रास ! याचा सक्रिय कराया अभ्यास ! धर्म निती बोलली !! .
याकरिता श्रीगुरूदेव सेवा मंडळाच्या निष्ठावान सेवकांची अत्यंत आवश्यकता आहे. ........
बंडोपंत बोढेकर, गडचिरोली ९९७५३२१६८२