स्त्री,एक छोटासा शब्द मात्र तिची व्याप्ती किती मोठी,हे सारे जग ओळखते.जिथे स्त्रिया नाही ती जागा, तो प्रदेश भकास, ओकाबोका वाटतो. तिच्या असण्याने एक आगळीच झळाळी येते जीवनाला किंवा त्या स्थानाला.नुसता विचार जरी केला तरी कळतं.ज्या घरात स्त्री,केवळ थोड्यावेळच गैरहजर असली तरी त्या गृहाची काय दशा होते हे दैनंदिन जीवनात सारेच अनुभवतात. कार्य, कर्तव्य,वृद्धीसमृद्धी, दयामाया, ममता, दक्षता, ताल, ढाल, रसरंग, गंध, छंद ह्या आणि अश्या अनेक वैशिष्टांची परिपूर्णता म्हणजेच स्त्री.
या जगातील सर्वात गुढ असे कोडे म्हणजे स्त्री होय. हे कोडे उलगडणे पुरुषच काय देवांनाही सुटणे महाकठीणच.अशा अद्भुत सौंदर्य,शक्ती आणि गुणांचे भांडार असलेल्या ह्या स्त्रियांची रचना आणि निर्मिती खरोखरच कुणी केली असावी?असं मानलं जातं की देवाने स्त्रीला खुप सवडीने बनवलेय.हिंदू पौराणिक ग्रंथामध्ये याचा उल्लेख आढळतो.
मनुस्मृतीमधील श्लोकात असे म्हटले आहे की ब्रम्हदेवाने आपल्या शरीराचे दोन भाग केले आणि एक भाग नर आणि दुसरा भाग नारी बनविला.मात्र स्त्रीची निर्मिती करतांना त्यांना फारच कष्ट पडले.वेळही खर्ची पडला.ब्रम्हदेवांनी सर्व स्रुष्टी केवळ एका दिवसात बनवली देखील मात्र जेव्हा त्यांनी स्त्रीची रचना करायला घेतली, तेव्हा त्यांना एका आठवड्यांपेक्षाही जास्त वेळ लागला.तरीही त्यांची रचना कुठेतरी अपूर्ण होती.शेवटी वाट बघून थकलेल्या दूतांच्या सहनशीलतेचा बांध तुटला. अंती त्यांनी ब्रम्हदेवांना प्रश्न केलाच कि तुम्ही ह्या संपुर्ण स्रुष्टी तसेच असीमित ब्रम्हांडाची निर्मिती, पापणी लवतो न लवतो,अगदी तेवढ्यात केली.मात्र स्त्रीची रचना निर्मित करतांना एवढा का अवधी लागला?
त्यावर ब्रम्हदेव नम्रपणे उत्तरले की स्त्री म्हणजे माझी आतापर्यंतची सर्वात अनोखी आगळीवेगळी रचना आहे.ही अतिशय अद्भुतरम्य आहे.ही रचना महाविकट प्रसंगात ही घट्ट पाय रोवून ठामपणे उभी राहणारी आहे.कुठलीही परिस्थिती असू देत,ती सर्वांना आनंदी ठेवू शकणारी आणि केवळ आपल्या बाळांनाच नव्हे तर संपूर्ण कुटुंबियांना एकाच वेळी तिच्यातील उपजत अशा अपार प्रेम,माया,जिव्हाळ्याने जपणारी आहे.ती संकटांवर मात करणारी ढाल आहे.ती शक्तीचे स्त्रोत आहे.ती कोमल हळवी असली तरीही एकाचवेळी अनेक कार्य, कर्तव्य उत्तमरीत्या झेलून पार पाडणारी आहे.तिच्या मनातील अपरंपार दयाळू भावनेने,ती मोठे आघात सहज थोपवून लावू शकणारी आहे.तिच्या मऊ हातांमध्ये खोल जखमा भरण्याची ताकद आहे.ती थकली तरी कायमचं उमेद आणि उत्साहाने सर्व जबाबदाऱ्या पेलण्याची हिंमत ठेवते.आजाऱ्यांची सेवासुश्रुषा करणारी तर ती आहेच,परंतू स्वतः आजारी असली तरी स्वतःची काळजी योग्य पद्धतीने घेणारी देखील आहे आणि तिच्या आजाराला कुरवाळत न बसता,धाडसाने लढणारी आहे.ती नवनिर्मितीचे उगमस्थान आहे.ती चौसष्ट कलांना धारण करणारी आहे.तिचे हातात सावरुन घेण्याची क्षमता आहे.
एवढे ऐकून देवदूत विस्मयचकित झाले आणि कुतूहलापोटी विचारुन बसले की देवा इतके सर्व ती या दोन हातांनी करणे कसे काय शक्य आहे?त्यावर भगवंत बोलले की बाळांनो विसरू नका,ही माझी आजवरच्या बनवलेल्या रचनांपैकी सर्वात अनोखी,सर्वश्रेष्ठ रचना आहे.हिच्या करीता काहीच असंभव असणार नाही.
हे ऐकताच देवदूतांची उत्सुकता आणखीनच वाढली.त्यांनी जवळ जाऊन त्या रचनेला हात लावून पाहिला.मात्र हात लावून पाहिले तेव्हा ती त्यांना अत्यंत नाजूक वाटली.ते ब्रम्हदेवांना म्हणाले,ही रचना तर फारच कोमल,सुकुमार आहे.यावर भगवंत उत्तरले,ती केवळ दिसावयासच नाजूक आहे,नव्हेतर मी तिच्यात प्रचंड धैर्य,साहसासवेच, सोशिकता आणि क्षमाशीलता ओतप्रोत भरलेली आहे.तिचे ह्रदय अथांग सागर,आभाळ ही कवेत घेणारे असेल.ती सोज्वळतेची मुर्ती असेल.हे ऐकून देवदूत तिचे अनुपम रुप न्याहळण्यात गढून गेले आणि एकटक तिच्याकडे बघतांना भान हरपून बसले. निरखून पाहिले तेव्हा त्यांना तिचा गाल ओला आहे असे आढळले.तिच्या डोळ्यांमधून पाणी का वाहतय?हे देवदूतांनी कुतुहल म्हणून विचारले असता ब्रम्हदेवांनी गुढ उकलले.हे नयनातून वाहणारे पाणी,स्त्रीची सर्वात मोठी ताकद म्हणजेच अश्रू असतील.त्यात दगडांनाही पाझर फोडण्याची शक्ती असेल.याशिवाय हेच अश्रू तिला तिच्या प्रेमाची साक्ष देतांना,दुःखांवर फुंकर घालतांना,एकांतवास दूर करण्यासाठी सहाय्यक माध्यमही ठरतील.सुखदुःख दोन्हीचे प्रदर्शन करण्यास तिला हे अश्रूच कामी पडतील.
हे कथन ऐकून जिज्ञासूंनी ब्रम्हदेवांना आणखी खोलात जाऊन विचारले की काय आपण ह्या स्त्रियांना विचारशक्ती पण प्रदान करणार आहात का?यावर देव म्हणाले की होय ही रचना अगदी सारासार विचारही करु शकेन आणि विचारांती निर्णय घेऊन तोडगाही काढू शकेल.ती प्रत्येक संकटांचा सामना नेटाने करु शकणारी असेल.ती प्रामाणिक आणि न्यायप्रिय असेल.ती अन्नपूर्णा,सरस्वती,महालक्ष्मी,महाकाली,भवानी,चंडिका आणि वेळप्रसंगी अष्टभुजाधारी दुर्गाही असेल.
हे सर्व स्त्री रचनेचे वर्णन ऐकून देवदूत थक्क झाले.'भगवंत आपली अतिशय विलक्षण आश्चर्यकारक आणि संपूर्ण आहे.त्यावर देव उत्तरले की नाही ही संपूर्ण नाही. यात एक त्रुटी आहे.इतके गुणधर्म असुनही ती स्वतः तिच्या महत्तेस अनभिज्ञ राहिल.या जगातील प्रत्येक पुरुष हा कुठल्या नं कुठल्या रुपात स्त्रियांचा आश्रित आहे.आई,बहिण,पत्नी, मुलगी असे तिचे अनेक रुप आहेत.जो पुरुष स्त्रियांचा आदरसन्मान करतो, तो सदैव सुखी राहिल. साक्षात भगवान शिवशंकर महाकाली शक्ती शिवाय अपूर्ण आहेत.मग आपल्या सामान्य मानवाची काय गत....
वेदांमध्येसुद्धा स्त्रीचे महात्म्य सांगणाऱ्या अनेक ऋचा आहेत.वेदांमध्ये स्त्रीला अत्यंत महत्वपूर्ण,भारदस्त आणि उच्च स्थान प्रदान करण्यात आले आहे.स्त्रियांचे शिक्षण,दिक्षा,शील,गुण,कर्तव्य,अधिकार आणि सामाजिक भूमिकांचे जे सुरेख वर्णन वेदांमध्ये आढळते,ते अन्य कुठल्या ग्रंथात नाही.वेद स्त्रीला घराची स्वामिनी म्हणतात. तसेच देशाची शासक,पृथ्वीची सम्राज्ञी सुद्धा बनण्याचे संपूर्ण अधिकार देतात.वेदांनुसार स्त्री यज्ञीय म्हणजे यज्ञासमान पुजनीय आहे.वेदांमध्ये स्त्रीला ज्ञान,सुख-समृद्धी देणारी,विशेष तेजस्वी, देवी,विदूषी,इंद्राणी,उषा-जी सर्वांना जागृत करते इत्यादी अनेक आदरयुक्त नावे दिलेली आहेत.तिथे तिच्या वर कसलेच प्रतिबंध नाहीत.तिला सदैव विजयीनी म्हटले गेलेय.ती सहयोगीनी आणि प्रोत्साहन देणारी आहे.वैदिक काळात स्त्रिया अध्ययन आणि अध्यापना सोबतच,युद्धभूमीवर ही जात असत.जसे राणी कैकयी महाराज दशरथांसोबत रणांगणात त्यांच्या रथाचे सारथ्य करण्यास गेली होती.कन्येला आपला पती स्वतः निवडण्याचा अधिकार देऊन वेदांनी,पुरुषांपेक्षा स्त्रियांना एक पाऊल पुढेच ठेवलेय.अनेक ऋषिका वेदमंत्रांच्या द्रष्टा आहेत.अपाला,घोषा,सरस्वती, सर्पराज्ञी,सूर्या, सावित्री, अदिती-दाक्षायणी,लोपामुद्रा,विश्ववारा,आत्रेयी इत्यादी.मात्र ज्यांनी वेदांचे साधे दर्शनही केलेले नाही,अश्या काही पाठीचा कणा विरहित,बुद्धिवादी लोक, वेदांमध्ये स्त्रियांचा अवमान केला गेल्याचे फुटके ढोल पिटतात.
यजुर्वेद,अथर्ववेद,ऋग्वेद,सामवेदात स्त्री पुरुष समानता दाखविणारे अनेक मंत्र आहेत.
यजुर्वेदानुसार-सूक्त २०.९मधे स्त्रीपुरुष दोघांनाही शासक म्हणून निवड करण्याचा समसमान अधिकार आहे.
सूक्त १७.४५ स्त्रियांची पण सेना असावी आणि त्यांना युद्धात सहभागी होण्यास प्रोत्साहन दिले जावे.तसेच शासकांच्या स्त्रियांनी दुसऱ्यांना राजनितीची शिक्षा द्यावी व न्यायदानही करण्याची कुवत तिच्यात असावी.
अथर्ववेदातील -स्त्रीकर्मे : या वर्गातील मंत्र मुख्यतः स्त्रीजीवनाशी निगडित झालेले आहेत.
ब्रम्हचर्य सूक्ताच्या ११.५.१८या मंत्रामध्ये कन्यांकरीता ब्रम्हचर्य आणि विद्याध्ययनाच्या नंतरच विवाह करण्यास सांगितले आहे.या मंत्रात मुलांप्रमाणेच मुलींच्या शिक्षणाला समान महत्त्व दिले आहे.त्याचबरोबर मातापित्यांनी आपल्या मुलीला पतिगृही जातांना हुंड्यामधे ज्ञान,बुद्धिमत्ता आणि विद्येचे उपहार द्यावेत.जेव्हा मुली इतर सांसारिक वस्तू सोडून तिच्यातील बुद्धिमत्तेने चैतन्याची दिव्यदृष्टी मिळवेल आणि आकाश,भूमी व पाताळातूनही सोनं काढण्याची क्षमता प्राप्त करेल,तेव्हाच तिने सुयोग्य पतीसोबत विवाहबद्ध व्हावे.सासरी तिने विद्वत्ता व शुभगुणांनी घरास नावलौकिक मिळवून द्यावा.तसेच जन्मदात्री,संततीचे पालनपोषण करणारी, सन्माननीय, विचारशील,प्रसन्नचित्त स्त्री संपत्तीची रक्षा आणि वृद्धी करते आणि घरात सुखशांती आणते.ती योग्य उपदेश देणारी मार्गदर्शक असते.ती कार्यकुशल व कला पारंगत असतेच.
मंत्र १४.१.६४ नुसार -
'हे स्त्री तु आमच्या घराच्या प्रत्येक दिशेला ब्रम्ह म्हणजेच वैदिक ज्ञानाने पवित्र कर.' असे म्हटले आहे.
'हे वधू! तू कल्याणकारी,धनधान्य प्रदायिनी आणि सुखदायिनी आहेस, ऐश्वर्य नौकेत चढून,तुझ्या पतीला संसार सागराच्या पैलतीरावर नेऊन यशसंपदा मिळवून दे.'
मंत्र २.३६.३ मधे वधू पतीगृहाची राणी असावी आणि तिथे तिच्यातील सद्गगुणांनी प्रकाशमान व्हावे.
मंत्र ११.१.१७ नुसार ह्या स्त्रिया स्वभावाने शुद्ध, चारित्र्यवान व आचरणाने पवित्र,पुजनीय, सेवा योग्य, आणि यज्ञीय असतात,त्या प्रजा,पशु,प्रेम,सुख आणि अन्न देणाऱ्या असतात.
मंत्र १२.२.३१ मधे स्त्रिया दुःखाने कधीच रडता कामा नये,त्यांना सदैव निरोगी ठेवायला हवे आणि रत्न आभूषणे इत्यादी घालावयास स्वतंत्र आहेत.त्या कल्याणकारी,विराट,ऐश्वर्यसंपन्न, पुरुषार्थिनी असतात.त्यांनी सभा समितींमध्ये जाऊन आपले विचार प्रकट करायला हवे.
अशा अथर्ववेदातील अनेक सूक्तांमध्ये स्त्रिया किती श्रेष्ठ आहेत आणि त्याच्या महानतेचे महत्तेचे वर्णन विषद केले आहे.
ऋग्वेदातही अनेक सूक्तांमध्ये
स्त्रियांच्या महत्तेचे,गुणवत्तेचे मंत्र उध्रुत केलेले आहेत.
१०.१.५९
एक गृहिणी प्रातःकाळी उठताच ती उद्गारते," ह्या सुर्योदयासोबतच माझे सौभाग्यही उजळले आहे.मी माझ्या घराची आणि समाजाची ध्वजा आहे,त्याचे मस्तक आहे,मी भारदस्त व्यख्यात्री आहे,माझे पुत्र शत्रुंवर विजय मिळवणारे आहेत.माझी पुत्री संसारात तेजस्वी आहे.मी स्वतः शत्रुंना पराजित करणारी आहे. माझे पती असीम यशवंत आहेत.मी जे त्याग केले, त्याने इंद्रदेव विजयी झाले.माझ्या शत्रुंचा मी निःशेष केला आहे.आता सुर्य मध्यापर्यंत आला आणि माझा भाग्योदय झालाय.मी प्रतिक आहे,मी शिर आहे,मी सर्वात प्रमुख आहे म्हणून माझ्या इच्छेनुसार माझ्या पतीने आचरण करावे.माझा कुणीच प्रतिस्पर्धी नाही. मी आणि माझ्या पतीच्या प्रेमाला व्यापक प्रसिद्धी मिळाली आहे.ओ प्रबुद्ध!मी ते अर्ध्य अर्पण केलय,जे सर्वात उदाहरणीय आहे.मी स्वतःला आता शत्रुविरहीत तसेच प्रतिस्पर्धी मुक्त करुन घेतले आहे आणि आता मी त्यांचा विध्वंस करुन विजेती होऊन यथेच्छ शासन चालवू शकणारी आहे.या मंत्रातील ऋषिका आणि देवता दोन्ही ही शची आहेत.शचीच इंद्राणी व सम्राज्ञी आहे.तिचे अपत्य सुद्धा तिने राज्याला समर्पित केले आहेत.
ऋग्वेद १.१६४.४१ मधील मंत्रामध्ये स्त्रीचे वर्णन करतांना-'अशी ही स्त्री जिचे मन पारदर्शक स्पटिकासमान परीशुद्ध,जळाप्रमाणे नितळ आहे,तिने एक,दोन अथवा चारही वेद-आयुर्वेद, धनुर्वेद,गांधर्ववेद,अर्थवेद इत्यादींच्या सोबतच वेदांगे जसे शिक्षा,ज्योतिष,व्याकरण आणि छंद यांचे शिक्षण प्राप्त करावे आणि हे वैविध्यपूर्ण ज्ञान इतरांनाही वाटावे.अशी स्त्री अविद्याधी दोषांना बाहेर काढून या जगताला सुखदायिनी ठरते.
ऋग्वेद१०.८५.४६
स्त्रीला परिवार आणि पत्नी च्या महत्वपूर्ण भूमिकेत चित्रीत केले आहे.त्याचप्रमाणे वेद स्त्रियांना सामाजिक, प्रशासकीय आणि राष्ट्राची सम्राज्ञी म्हणूनही वर्णित करतात.ऋग्वेदातील अनेक सूक्तातून उषेला देवीरुपात वर्णन केलेले आहे.उषा ही एक आदर्श स्त्री आहे असे मानले गेलेय.
अश्या अनेक सूक्तांमध्ये स्त्रियांनी काय करावयास हवे त्यांची क्षमता,त्यांची गुणवत्ता त्या काय करु शकतात.ह्याचे विस्तृत वर्णन आहे.
मग जर वेद पुराणानुसार स्त्री इतकी सक्षम,सामर्थ्यवान आहे, तर मग आधुनिक काळातील स्त्रियांनी स्वतः ला कमी लेखून कसे चालेल.एकटी स्त्री ही तिच्यातील जिद्द चिकाटी,चिवटपणा,सातत्य, बुद्धीचातुर्य,दक्षता,कार्यकुशलता,कार्यक्षमता आणि स्त्रियांमधील महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे 6th sense च्या जोरावर इच्छित मनकल्पित सारे असाध्य साध्य करुच शकते.Nothing is impossible हे ब्रीदवाक्य सदा ध्यानी मनी ठेऊन वाटचाल करत रहावी.मग व्यसनी, व्यभिचारी,संशयी,भांडखोर नवऱ्याला किंवा अन्य आडव्या येणाऱ्या नर रुपी राक्षसांना सरळ मार्गावर आणणेही फारसे कठीण वाटणार नाही तुला. एका मुलाला जन्म देऊन,त्याचे पालनपोषण करून,त्याला एका पुरुषात रुपांतरीत करणारी एक आई म्हणजेच स्त्रीच...यावरून तु किती बलवान,सामर्थ्यवान आहेस हे विसरु नकोस.गर्व बाळग गं राणी स्वतःचा.तु निर्मिती करणारी आहेस. तळहाताच्या मळाप्रमाणे तु वाकड्यात शिरणाऱ्या कुठल्याही भेकड पुरुषास वठणीवर आणून ठेवण्याची ताकद ठेवतेस.गरज आहे तुझ्यातील ती शक्ती ओळखण्याची.....
"कोमल है कमज़ोर नहीं
शक्ति का नाम ही नारी हैं
जग को जीवन देने वाली
मौत भी तुझसे हारी हैं
कोमल है कमज़ोर नहीं
कमजोर नहीं,बलशाली है"
💁🏻♀️अनुराधा हवालदार.
नागपूर.