आरोग्य सुविधेवरून विधानसभेत आ. सुधीर मुनगंटीवार यांची नाराजी
चंद्रपुरातील मेडिकल कॉलेजमधील रिक्त पदांचा मुद्दा गाजला
आरोग्य विभागातील अनेक पदे आजही रिक्त आहेत. यासंदर्भात आपण शासनाला ३६ पत्रे पाठविली. चंद्रपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पदे, सोयी-सुविधांबाबत सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करीत आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत असल्याकडे विधिमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी लक्ष वेधत नाराजी व्यक्त केली. आरोग्य विभागातील ज्वलंत प्रश्नाबाबत ते सोमवार, दिनांक २७ डिसेंबर रोजी विधानसभेत बोलत होते.
चंद्रपूरसह राज्यभरातील शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा आहे. रुग्णवाहिकेत रुग्ण पडून राहतात. त्यांना अॅडमिट करून घेण्यात येत नाही, असा तीव्र संतापही त्यांनी व्यक्त केला.
एमपीएससीच्या माध्यमातून मोजकीच पदे भरण्यात येतात. उर्वरित पदे सरकार भरते. ही पदेही भरण्यात आलेली नाही. राज्यात सर्वांत वाईट परिस्थिती हाफकीनची आहे. हाफकीनचा औषधी खरेदी व यंत्र खरेदीचा अधिकार तूर्तास बदलावा अशी मागणी त्यांनी केली. औषधी खरेदीसाठी प्रत्येकवेळी मंत्रालयात फाईल पाठविण्याची गरज भासू नये, असे ते म्हणाले. एमपीएससी वगळता उर्वरित पदे तातडीने भरावी असेही ते म्हणाले.