Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, जानेवारी २३, २०२३

स्वातंत्र्य लढ्यातील गुप्तहेर | azadi ka Amrit mahotsav special story

स्वातंत्र्यलढ्यातील गुप्तहेर




Story by Deonath Gandate 
चंद्रपूर (Chanda) शहरात गोंडकालीन राजवट होती. मराठ्यांनी चंद्रपूर काबीज केलं. मराठे आणि इंग्रज यांच्यात झाले युध्द झाले आणि 20 मे 1818 रोजी चंद्रपूर किल्लाच्या पठाणुपरा गेटवर इंग्रजांचा ‘युनीयन जॅक’ (

Union Jack

) फडकला. सव्वाशे वर्ष हे शहर ब्रिटिशांच्या ताब्यात होतं.



हजारो देशभक्तांच्या बलिदानाने आणि त्यागाने भारत देश परकीयांच्या पारतंत्र्यातून १५ ऑगस्ट १९४७ रोजी मुक्त झाला. आज स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानिमित्त अमृत महोत्सव (azadi ka Amrit mahotsav) साजरा होत आहे. यानिमित्ताने स्वातंत्र्य लढ्यातील योध्यांचे स्मरण होऊ लागले आहे. 

1945 च्या सुमारास भारताीयांमध्ये एक नवा उत्साह संचारला होता. त्यावेळी अनेकजण प्रत्यक्ष लढ्यात सहभागी होऊन तर काहीजण भूमिगत राहून देशाला गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी एकवटली होती. चंद्रपूर शहरातील विठ्ठल मंदिर वॉर्डातील श्री. विठ्ठल मंदिर व्यायामशाळेनं जणू लढवय्ये देशभक्त घडविले. याच व्यायामशाळेत श्री. बाबूराव बनकर Baburao Bankar ( जन्म १९३०) हे वयाच्या चौदाव्या वर्षीपासून जाऊ लागले होते. गडला मारुती मंदिराजवळ त्यांच घर होतं. घरची परिस्थिती अत्यन्त गरीब. पण घराण्याला पहेलवानीची वारसा लाभला होता. वडील बंधू सदाशिव, गणपती व विश्वनाथ उत्तम कुश्तीगीर. तेच बाळकडू बाबूराव यांना मिळाले. शरीर मुलायम. पण कसदार होते. दिसायला देखणा तरुण हनुमंताचा निःसीम उपासक. दर्शन घेतल्याशिवाय जेवन करायचे नाही, हा नित्यक्रम.



रक्ताने केली स्वाक्षरी अन घेतली स्वातंत्र्याची प्रतिज्ञा
भारताच्या स्वातंत्र्य संग्राम आंदोलनात 1942 मध्ये महात्मा गांधी यांनी भारत छोडोची हाक दिली. जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी लक्ष्मण कृष्णाजी चासेकर यांच्या नेतृत्वात स्वातंत्र संग्राम सैनिक काशिनाथजी घटे, स्वातंत्र्य संग्राम सैनिक सह. गो. कुचिनवार, गुरुवैर्य अमृतराव सिंगते नागपूरकर यांच्या मार्गदर्शनात पुरातन महाकाली मंदीराच्या गच्छीवर स्नेह सर्वधर्म मंडळाची 100 मुले जमली. स्वातंत्र्य लढ्याचा हा मार्ग खडतर होता. देशभक्तीने मंतरलेली ही मुलं एकत्र आली होती. गरीब, श्रीमंत, धर्म, पंथ, जाती हा भेदाभेद उरला नव्हता. "आम्ही देशाकरीता प्राण देण्यास तयार आहोत" असा प्रण सर्वानी केला. प्रत्येकाने रेजरच्या पानाने आपल्या हाताच्या बोटावर चिरा मारून रक्ताने कागदावर सह्या केल्या. तो कागद फुलाच्या हारामध्ये ओवून गुरुवर्य अमृतराव सिगते यांना घालून देश स्वातंत्र्याची प्रतिज्ञा घेतली. गुरुवैर्याच्या पायावर हात ठेवून व त्यांच्या देशभक्तीच्या प्रेरनेने सर्वजण स्वातंत्र मिळेपर्यंत ब्रिटीश पोलीसाशी लढत राहिले. अनेकदा पोलीसांच्या लाठ्या सुध्दा खाल्या. या कालावधीत चिमूरचा बाघ म्हणून जेष्ठ स्वातंत्र सेनानी दशरु लक्ष्मण काहीलकर यांनी 1942च्या भारत छोड़ो आंदोलनात सक्रीय भाग घेतला. त्यावेळी ब्रिटीशांनी अनेकांना पकडले. ब्रिटीशांनी दशरु लक्ष्मण काहीलकर यांना 20 वर्षाची जन्मठेप ठोठावली.


स्वातंत्र्य लढ्यात सहभागी
१९४५ मध्ये अनेक नेत्यांना अटक झाली तरी चळवळी थंडावली नव्हती. कठोर शिक्षा हसतमुखाने झेलणारे देशभक्त तेव्हा होते. या काळात या सर्वांच आदर्श घेऊन बाबुराव बनकर हे देखील स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले. जेष्ठ स्वातंत्र संग्राम सैनिकांचे आदेश व मार्गदर्शनाखाली भुमीगत राहून काम सुरु केले. ज्या स्वातंत्र संग्राम सैनीकांना पोलीसानी अटक केली, अशा सर्वाच्या घरी जावून निरोप देणे, सभेची तयारी करणे, बातमी देणे, स्वातंत्र संग्राम सैनिकांच्या सभेची तयारी करणे, गुप्त बातम्या शोधून काढणे, जे स्वातंत्र संग्राम सैनिक जेलमध्ये होते, त्यांच्या कुटूंबियाना मदत करणे, त्या कुटूंबाचे मनोधर्य टिकविणे, पत्रके वाटून समोरची दिशा ठरविणे, अशा प्रकारचे काम बाबुराव बनकर यांनी केले होते. 


भूमिगत संदेशवाहक 
बाबुराव गोविंदराव बनकर (Baburao Govindrav Bankar) हे यांना लहानपणापासूनच सामाजिक व देशसेवेने झपाटलेले होते. स्वातंत्र्य आंदोलनात सन १९४२ मध्ये त्यांनी भुमीगत राहून राष्ट्रभक्त सैनीकांये काम केले आहे. माहिती पत्रके वाटणे, गुप्त बैठकांची माहिती पोहचविणे, संदेश देणे आदी गुप्तहेराची कामे त्यांनी केली. यामुळे त्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होऊन त्यांना पुढील शिक्षणा पासून वंचीत व्हावे लागले. भूमिगत काम करीत असतानाही त्यांना इंग्रज पोलिसांनी अटक केली होती.  काही काळ ते जेलात होते. अखेर स्वातंत्र्याचे क्षण मखमली मुठीत घेऊन तो दिवस उगवला. १५ ऑगस्ट १९४७. स्वातंत्र्याचे स्वप्न साकार झाले. भारत स्वातंत्र झाल्यावर त्यांनी कुटुबांचा उदरनिर्वाह करण्यासाठी गोल बाजारात किराणा दुकान सुरु केला. त्यांना ५ मुले आणि ३ मुली अशी अपत्य आहेत. आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी बाबुराव बनकर यांनी वयाची ९३ वर्षे पूर्ण केली आहेत. ते विठ्ठल मंदिर वॉर्डातील शांतीभवन निवासस्थानी कुटुंबीयासमवेत राहतात. स्वातंत्रानंतर त्यांनी अनेक वर्षे समाजसेवेत घालवली. आपल्या समाजाच्या भवनासाठी त्यांनी जमीन दान देखील केली. 



स्वातंत्र्य सैनिकांनी देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी बलिदान दिले. त्याच्या त्यागामुळेच देश स्वतंत्र झाला. मात्र संघर्ष करणारे स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या वारसांना सरकारने आजपर्यंत फक्त आश्वासनाशिवाय दुसरे काहीच दिले नाही. आज स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव साजरे होत आहे, अशावेळी बलिदान आणि त्यागाचे विस्मरण न होता पुढील पिढीसाठी ते तेवत ठेवण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत, असे बनकर यांचे ज्येष्ठ पुत्र दिवाकर बनकर (Diwakar Bankar) म्हणाले. दिवाकर हे अखिल भारतीय स्वतंत्र्य संग्राम सैनिक पाल्य संघटनेचे उपाध्यक्ष देखील आहेत. 



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.