Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, जुलै २७, २०२२

नमस्ते_लंडन...पुन्हा भारतात परत येऊन रचनात्मक काम उभे करायचे आहे!

 #नमस्ते_लंडन...



मला ब्रिटिश सरकारची नामांकित चेव्हेनिंग शिष्यवृत्ती २९ जूनला जाहीर झाली. लंडन येथे पदव्यूत्तर उच्च शिक्षण घेण्यासाठी लागणारा ४५ लाखांचा संपूर्ण आवश्यक खर्च ब्रिटीश सरकारच्या जागतिक प्रतिष्ठेच्या या शिष्यवृत्तीतून होईल. सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करतांना मिळालेलं हे यश केवळ माझे एकट्याचे नव्हे, तर दुर्बल घटकातील सर्वसामान्य माणसांना आपलं वाटणं, याने निश्चितच भारावलो आहे. मागील महिनाभरापासून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अभिनंदन-सन्मान करणा-या सर्व मान्यवर, मित्रमंडळींचे आभार आणि धन्यवाद मानण्याऐवजी मी त्यांच्या कायम ॠणात राहू इच्छितो.


आदिवासी बहुल चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यात असलेलं लखमापूर हे माझं गाव. शेती-माती-चळवळीची घरची पार्श्वभूमी. पहिली ते चौथी पर्यंतचे माझे प्राथमिक शिक्षण गावातीलच जिल्हा परिषद शाळेत झाले. नंतर ५ वी ते १० वी पर्यंतचे शिक्षण गावापासून ३ कि.मी अंतरावर असलेल्या गडचांदूर येथील महात्मा गांधी विद्यालयात झाले. माझे कुटुंब शेतकरी चळवळीत असल्यामूळे लहानपणापासून आंदोलने व बैठकांत सहभागी व्हायचो.


माजी आमदार तथा शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे माजी अध्यक्ष ॲड.वामनराव चटप माझे मोठेबाबा. यांना बालवयापासून अनुभवत होतो. त्यांचे चळवळीचे संस्कार हळूहळू रुजत गेले. शेतकरी-कष्टक-यांची वेदना आपली वाटत होती. पाचवीत असताना वर्धा येथे युगात्मा शरद जोशी यांच्या नेतृत्वात शेतमालाला योग्य भाव मिळावा म्हणून रेल रोको आंदोलनात व त्यांनतरही विविध आंदोलनात सहभाग नोंदवला. त्यातून सामाजिक जाणीवा जागृत होत गेल्या. शालेय जीवनात वक्तृत्व-वादविवाद स्पर्धेत सहभागी होवून आपली भूमीका मांडतांना नेहमी अव्वल स्थानी असायचो. पुढे सकारात्मक सामाजिक बदलांसाठी काम केले पाहिजे, असे सातत्याने वाटायचे. विज्ञान शाखेत अकरावी व बारावीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विधी शाखेत प्रवेश घेण्याचे ठरविले. पुण्यातील नामांकित आयएलएस विधी महाविद्यालय येथे प्रवेश मिळाला. कायद्याचे शिक्षण घेत असताना समाजाभिमुख वकिली करणारे विधीज्ञ असीम सरोदे यांच्यासोबत पुण्यात कामास सुरुवात केली. समाजात दुर्लक्षित समजल्या जाणाऱ्या घटकांच्या समस्या अभ्यासणे व त्यावर याचिका दाखल करणे, आदी रचनात्मक कामे करण्यात समाधान मिळत असे. मुंबईतील अरबी समुद्रात होणाऱ्या प्रदूषणाबाबत आम्ही दाखल केलेल्या याचिकेमुळे जलशुद्धीकरणाचे काम सुरू झाले.


मंत्रालयात एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर त्याबाबत मानवाधिकार आयोगात दाखल केलेल्या तक्रारीनंतर निवृत्त न्यायमूर्तीची चौकशी समिती नेमली गेली. लोकसभेत मांडण्यात आलेल्या कृषी न्यायाधिकरण कायद्याचा मसुदा तयार करणाऱ्या समितीत काम करता आले. दरम्यान माजी मंत्री जयंत पाटील यांच्या समवेत विधी सहाय्यक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. विधिमंडळाच्या अधिवेशन काळात सभागृहाचे कामकाज जवळून बघता आले. तारांकित प्रश्न, अतारांकीत प्रश्न, स्थगन प्रस्ताव, लक्षवेधी आदी विधानसभा कामकाजात सहाय्य करताना राज्यातील अनेक प्रश्नांची जाणीव व धोरणात्मक बाबींचा अभ्यास करता आला.


अगदी बालवयापासून संवेदनशील मित्रमंडळी माझ्या परिसरात मला अक्षर साहित्य कला प्रतिष्ठान व डॉ.गिरीधर काळे सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून मिळाली. सातत्याने सामाजिक-साहित्यिक- सांस्कृतिक-राजकिय-वैचारिक उपक्रमातील सहभागामूळे माझ्यातील प्रेरणेचा झरा वाहता ठेवता आला. दरम्यान 'लढण्याची वेळ आलीय' हा कवितासंग्रह तसेच 'कृषी कायदे : चिकित्सा व न्यायाधिकरण' ही पुस्तके लिहिली. सामाजिक प्रश्नांवर सतत चिंतन करुन समाजात लेखनातून भूमिका मांडण्याचे माझे काम चिरंतन सुरू राहील.


साधारण २०१८ ला कोरो इंडिया या संस्थेने मी व माझ्यासोबत कायद्याचे शिक्षण घेणारे माझे मित्र वैष्णव व बोधी यांना समता फेलोशिप जाहीर केली. या फेलोशिपच्या माध्यमातून 'संविधानिक नैतिकता' हा सात दिवसीय ऑनलाइन कोर्स युवकांसाठी तयार करण्यात आला. तसेच संविधान विषयक जनजागृती घडवून आणण्यासाठी दोन ते तीन हजार युवकांशी प्रत्यक्ष संवाद साधला. आम्ही तिघे पद्मश्री डॉ.अभय बंग यांनी सामाजिक बदल घडवू पाहणाऱ्या युवकांसाठी सुरू केलेल्या 'निर्माण' शिबिरात देखील सहभागी झालो.
आपल्या शिक्षणाचा उपयोग समाजातील दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी झाला पाहिजे असे नेहमी वाटायचे. बोधी, वैष्णव सह आम्ही तिघांनी २०१९ ला 'पाथ' या सामाजिक संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून भामरागड तालुक्यातील पूरग्रस्तांना लोकसहभागातून लाखो रुपयांची मदत पोहचवली, कोरपना तालुक्यात जाणीव माणुसकीची अभियान राबवून कुपोषित बालकांना पोषण आहार किट्स व आरोग्य कार्ड वितरण केले, कोरोना काळात जिवती, गोंडपिपरी, राजुरा व कोरपना तालुक्यातील कोलाम कुटुंबीयांना अन्नधान्य किट्स दिल्या. पाथ संस्थेचा संस्थापक म्हणून राज्यातील शेतकरी, कामगार, आदिवासी व यांसारख्या दुर्बल घटकांच्या मूलभूत न्याय हक्क विषयक प्रश्नांबाबत संशोधन करणे, दुर्बल घटकांचे प्रश्न मानवाधिकार आयोग, विधीमंडळ व न्यायालयांपर्यंत पोहोचविणे, युवकांमध्ये संविधान विषयक जनजागृती घडवून आणणे अशा स्वरूपाचे काम करण्याचे ठरवून त्यात सातत्याने योगदान देता येत आहे. कायद्याचे शिक्षण प्रथम श्रेणीत पूर्ण झाल्यानंतर पुणे, मुंबई अथवा दिल्लीतील नामांकित वकिलांसोबत काम करण्याची मला संधी होती.


मात्र माझ्या शिक्षणाचा उपयोग समाजातील दुर्बल घटकांसाठी व्हावा म्हणून अतिदुर्गम नक्षलग्रस्त चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात कामाची सुरुवात करण्याचे ठरवले. त्या भागातील कोलाम व माडिया या आदिम आदिवासी समुदायांचे प्रश्न मानवाधिकार आयोग व उच्च न्यायालयात मांडले व यापुढेही मांडत राहील. दुर्गम भागात प्रत्यक्ष भेटी देऊन कोलाम व माडिया समुदायाच्या न्याय- हक्कांसंदर्भातील सर्व्हेक्षण केले. त्याबाबतचा एक अहवाल पाथ फाउंडेशनने इटली येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय समर स्कूलमध्ये नुकताच प्रकाशित केला. स्थानिक प्रश्नांना जागतिक करण्याचा आमचा मानस आहे. याकाळात कायद्याचे पदव्युत्तर शिक्षण घेतले पाहिजे असे वाटू लागले. दुर्बल घटकांच्या न्याय-हक्क संदर्भात समाजाभिमुख वकिली व शोषीतांसाठी रचनात्मक काम करताना उच्चशिक्षण फायदेशीर ठरेल असा अभ्यासक्रम शोधण्यास सुरवात केली. युनायटेड किंगडम या देशातील काही विद्यापीठातील अभ्यासक्रम मला आवडले. त्यासाठी मी अर्ज दाखल केले. तिथे शिक्षण घेण्यासाठी जवळपास ४० लाखांपर्यंतचा वार्षिक खर्च असतो, असे समजले. इतका खर्च करणे अवाक्याबाहेर असल्याने शिष्यवृत्ती बाबत शोधाशोध सुरू केली.


माझा विधी महाविद्यालयीन मित्र सोहेल भट याला 'चेव्हनिंग' नावाची जगप्रतिष्ठित ब्रिटिश सरकारची शिष्यवृत्ती उच्चशिक्षणासाठी मिळाली, ही माहिती मला होती. त्याबाबत अधिक माहिती मिळवण्यास सुरुवात केली. माझा पुण्यातील मित्र प्रवीण निकम याला देखील ही शिष्यवृत्ती मिळाली होती. ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे शिक्षण घेत असल्याचे काही मित्रांकडून कळले. साधारण दोन ते तीन वर्षानंतर मी प्रवीणशी संपर्क साधला. त्याच्याशी पहिल्यांदा बोलल्यानंतर त्यांनी मला शिष्यवृत्ती मिळू शकते, असा आत्मविश्वास दिला. त्यानंतर चेव्हेनिंग शिष्यवृत्तीला अर्ज करताना वेळोवेळी त्यांनी मार्गदर्शन केले. त्यासाठी माझ्याकडून तयारी करुन घेतली. या शिष्यवृत्तीच्या मुलाखतीसाठी निवड झाल्यानंतर मी मुलाखतीच्या एक महिन्याआधी माझा मोबाईल बंद केला. दिवसाचे दहा ते बारा तास शिष्यवृत्तीच्या मुलाखतीसाठी तयारी केली. त्यावेळी प्रविणने माझे अनेकदा सरावासाठी मुलाखती घेतल्या. त्याच्या नितीकुशलतेची प्रचंड मदत झाली.


दरम्यानच्या काळात चेव्हेनिंग शिष्यवृत्ती प्राप्त मित्र राजू केंद्रे याच्याशी बोललो. सोहेलचे मार्गदर्शन मिळाले. माझी चेव्हेनिंगची मुलाखत चांगली झाल्याने समाधान वाटले. "ज्यांना का जगायचे हे माहिती असते त्यांना कसे जगायचे हा प्रश्न उरत नाही" असे लेखक व्हिक्टर फ्रँकलने म्हटले आहे. मला माझ्या जीवनाचे सार्थक शेतकरी, कामगार, आदिवासी व दुर्बल घटकांना सक्षम करण्यासाठी जगायचे असून त्यासाठी आवश्यक त्यागाची तयारी आहे. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी महनीय व्यक्तींनी विदेशात सर्वोत्तम शिक्षण घेतले आणि त्या शिक्षणाचा उपयोग देशाच्या प्रगतीसाठी केल्याचे आदर्श डोळ्यासमोर आहे. आयुष्यात आव्हाने हीचं संधी घेऊन येतात. कामातील सातत्यता, स्वत:वरचा विश्वास आणि प्रामाणिक काम करण्याची प्रबळ इच्छा हे यशात महत्वाचे पैलू वाटतात. पुढील वर्षभर मी लंडन येथील विद्यापीठात कायद्याचे पदव्यूत्तर शिक्षण घेणार आहे. 'ह्यूमन राईट्स काॅन्फ्लीक्ट्स ॲण्ड जस्टीस' हा अभ्यासक्रम लंडनमधील 'सोएस' या विद्यापिठात उच्चशिक्षणासाठी निवड होणे आणि जगातील १६० देशातून नेतृत्वक्षमता असणाऱ्या निवडक अभ्यासकांना देण्यात येणारी ब्रिटिश सरकारची चेव्हेनिंग शिष्यवृत्ती मिळणे, हे आनंददायी आहे.


पुढील कामाची दिशा ठरवण्यासाठी हा प्रवास केवळ माझ्यासाठी नव्हे तर दुर्बल घटकांसाठी दिशादर्शक राहील.
हा प्रवास मागे वळून पाहताना निश्चितच सोपा वाटत नाही. आतापर्यंत आपण जपलेली सकारात्मक उर्जा, केलेले काम हेच मोठे पाठबळ असल्याचे जाणवते. मागील ८-१० वर्षात जमेल तसे समाजाभिमुख काम करतांना घरच्यांनी कधीही थांबवले नाही. सतत प्रोत्साहन दिले. आई-बाबा, भाऊ, आजी, काकाजी- काकू, मामा, आत्या, रत्नाकर काका, अविदादा व सहकाऱ्यांच्या प्रेमाला-विश्वासाला कधीही तडा जावू द्यायचा नाही, हे कायम वाटायचे. आता तो आनंद कुटुंबात व आप्तस्नेहींत दिसतो आहे. माझं हे यश शेतकरी चळवळीतील सहकाऱ्यांना, कुटुंबीयांना व सर्व मित्रमंडळींना आपले वाटावे, यातून मी समृद्धी अनुभवतो आहे.
माझे लंडन येथील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुन्हा भारतात परत येऊन शेतकरी, आदिवासी व दुर्बल घटकांसाठी रचनात्मक काम उभे करायचे आहे. शेतकरी चळवळ, पाथ फाउंडेशन आदींच्या माध्यमातून हे काम पुढे नेण्याचा मानस आहे. तळागाळातील सामाजिक प्रश्नांवर कुठल्याही कामात माझे सहकार्य, सहभाग निश्चित राहील. आपणा सर्वांचे प्रेम, मार्गदर्शन मला पुढील प्रवासासाठी मोलाचे ठरेल. आपल्या देशात येणारा काळ हा शेतकरी पुत्रांचा असेल हा आशावाद व्यक्त करतो.
- ॲड.दीपक चटप
deepakforindia@yahoo.com
9130163163
लंडन, युनायटेड किंगडम

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.