Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, मार्च ०३, २०२३

भाजपाचा किल्ला उदध्वस्त BJP Kasba and Chinchwad -elections




काल पार पडलेल्या कसबा आणि चिंचवड या पोटनिवडणुकीत भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या कसबा मतदार संघात भाजपाचा पराभव झाला असून महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर हे 11000 मतांनी निवडून आले आहेत. 28 वर्ष ही जागा भाजपाकडे होती ती काँग्रेसने आपल्याकडे खेचून घेतली आहे. तर चिंचवड येथील निवडणुकीत भाजपाच्या अश्विनी जगताप या 34000 पेक्षा जास्त मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यांनी राष्ट्रवादीचे बाबा काटे यांचा पराभव केला व जागा राखली पूर्वी या दोन्ही जागा भाजपाच्या ताब्यात होत्या परंतु कसब्यातील आमदार मुक्ता टिळक व चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे या दोन्ही ठिकाणी पोट निवडणूक झाली.
            एक जागा भाजपाला व एक महाविकास आघाडीला मिळाल्याचे जरी चित्र असले तरी एक जागा गमावणे हा भाजपाला मोठा धक्काच आहे बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ठिकाणी पक्ष पराभूत होतो हे चिंताजनक असून येणाऱ्या 2024 ची निवडणूक भाजपाला सोपी नसेल हे दाखवून देणारा हा पराभव आहे .
                                      चिंचवडला स्वर्गीय जगताप यांच्या पत्नीला तिकीट देण्यात आले होते परंतु भाजपाने कसबा येथे टिळकांच्या परिवारात तिकीट न देता दुसरा उमेदवार दिला होता येथेच पराभवाची नांदी झाली होती ,परंतु पक्ष नेतृत्व व पक्षातील काही नेत्यांची अट्टाहासी भूमिका या पराभवाला जबाबदार ठरली आहे .
               चिंचवड येथे ही ,निवडणूक सोपी नव्हती परंतु एकेकाळी शिवसेनेचे असणारे राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी सादर करून ही निवडणूक तिरंगी केली .यामुळे मत विभागणी होऊन राष्ट्रवादीचे नाना काटे यांचा पराभव झाला तर कसबा येथे सरळ निवडणूक होती . भाजपाने या निवडणुकीत कसब्याची सीट प्रतिष्ठेची केली होती तर ही जागा भाजपाकडून हिसकावून घेण्याचा चंग काँग्रेसने बांधला होता व त्यात त्यांना विजय मिळाला . महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी या भागात सभा घेऊन ,रोड शो करून प्रचाराचा चांगलाच धुराळा उडविला होता.
                                         या पराभवाचा विचार करता प्रामुख्याने काही गोष्टी लक्षात येतात त्यातील पहिली म्हणजे जो निकष चिंचवड मध्ये लावला तोच कसब्यामध्ये भाजपाने का नाही लावला ? अन्य उमेदवार का दिला?
                                         येथे ब्राह्मण उमेदवार न दिल्याचाही परिणाम आहे येथील ब्राह्मण समाज नाराज होता ,ही नाराजी त्यांनी अनेक वेळा प्रदर्शित केली होती परंतु भाजपाने त्याकडे साफ दुर्लक्ष केले व ब्राह्मणांना गृहीत धरले हा समाज आपलाच आहे तो आपल्याला सोडणार नाही हाच भाजपाचा समज होता , तो नाराज नाही ,तो समाज समजूतदार आहे . त्यांची नाराजी आपण दूर केली आहे अशाच घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करीत होते .येथे ब्राह्मणांचे वर्चस्व असून गेली अठ्ठावीस वर्ष तेथे ब्राह्मण आमदार होता .खासदार गिरीश बापट यांनी या मतदारसंघाची बांधणी केली होती त्याकडे भाजपने दुर्लक्ष करून भाजपाने जनतेची नाराजी ओढवून घेतली व मतदारांची सहानुभूतीही गमावली होती तसेच येथे तिरंगी लढत होऊ नये याकडे नव्याने प्रयत्न केले राष्ट्रवादीचे अजित पवार व काँग्रेसचे नाना पटोले यांनी मवआ मधे फूट न पडू देता मोठ्या एकजुटीने ही निवडणूक लढविली व पुढील होणाऱ्या निवडणुकीत मविआ जर एकसंघ राहिली तर महाराष्ट्रात भाजपाला तगडी झुंज द्यायला लागू शकते नव्हे तर सत्ता सुद्धा मवीआ ची येऊ शकेल असा संकेतच या निवडणुकीने दिला आहे.

                                   ही उमेदवारी टिळकांच्या परिवाराला दिली असती तर कदाचित चित्र वेगळे राहू शकले असते.

                                   यापूर्वीही ब्राह्मणांना गृहीत धरण्याची चूक भाजपने केली होती कोथरूड या मतदार संघाचा आमदार मेधा कुलकर्णी यांची सीट कापून तेथून चंद्रकांत पाटलांना उमेदवारी दिली होती तेव्हा ती ब्राह्मण समाज नाराज झाला होता ,परंतु ती नाराजी दूर करण्यात भाजपा नेते यशस्वी ठरले होते व पाटलांना विजय मिळाला होता. परंतु भाजपाने पुन्हा याही वेळेस तीच गोष्ट केल्याने मात्र समाज खवळला व एकदा फटका दिलाच पाहिजे ही भावना जोर धरू लागली व त्यांनी फटका दिला.

                खासदार गिरीश बापट यांची प्रकृती चांगली नसतानाही त्यांना प्रचारार्थ घेऊन येण्याने मतदारांची सहानुभूती मिळेल हा अंदाजही भाजपाचा खोटा ठरला तर त्यांच्या येण्याने उलट प्रतिक्रिया मतदार संघामध्ये उमटली.

       सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मवीआ एकत्रित होऊन निवडणूक लढविणे हा होय या विजयाने महाविकास आघाडीला पुढील निवडणुकीची दिशा दाखविली आहे तर भाजपा आणि शिवसेना यांना (एकनाथ शिंदे) महाराष्ट्रात सोपे नाही याची जाणीव ही करून दिली आहे
                
- सुनिल देशपांडे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.