आमदार सुभाष धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेस च्या अध्यक्षा नम्रता आचार्य ठेमस्कर यांचा विशेष लेख
अलीकडे राजकारणात साधे आमदार जरी बनले तरी घरापासून ते गाडी पर्यंत सगळे बदललेले दिसते. याला छेद देणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे पूर्व विदर्भातील राजुरा मतदारसंघाचे आमदार सुभाष भाऊ धोटे. सुभाष धोटे हे असे एक नाव आहे. जो माणूस सामान्य लोकांना ओळखतो आणि सामान्य लोक या माणसापर्यंत सहज पोहचू शकतात. त्यांचे ऑफिस याचे उत्तम उदाहरण आहे. ना काही कॅबिन, ना काही खाजगी खोली, जो माणूस आपली समस्या घेऊन येईल तो आमदार सुभाष भाऊ यांच्या शी सरळ, थेट बोलणार. आणि आमदार सुभाष भाऊ सुद्धा सरळ सरळ जितकी त्या माणसाची समस्या सोडवता येईल तितकी तात्काळ सोडवणार.
त्यांच्या ऑफिसमध्ये कोणी जरी गेले तरी एक डोळ्यात भरेल अशी एक गोष्ट निदर्शनास येईल ती म्हणजे तिथे एक फळा लावला आहे आणि त्या फळ्यावर आज आमदार साहेबांचा दौरा कुठे आहे. ते किती वाजेपर्यंत ऑफिसमध्ये उपलब्ध असतील हे लिहिलं असतं. यातून जी कोणी व्यक्ती ऑफिसमध्ये येईल त्याला लगेच ही माहिती प्राप्त होते की आजचा भाऊ चा कार्यक्रम काय आहे. वरकरणी ही बाब साधी वाटत असली तरी, यात काय विशेष?? एक साधा फळा तर आहे असे वाटेल कारण आजचा जमाना तर व्हाट्स अप च्या दौऱ्याचा आहे असे कोणी म्हणू शकतं. पण राजुरा मतदारसंघात जिल्ह्यातील सर्वात अधिक ग्रामपंचायती आहेत त्यामुळेच सर्वाधिक खेडे आहेत. आणि गावातील अनेक लोकांकडे अजूनही अँनरोईड फोन नसतो हे वास्तव आहे. तेव्हा हा फळा आजही त्यांच्या नक्कीच उपयोगी पडतो.
तसा राजुरा मतदारसंघ भौगोलिक दृष्ट्या बघितलं तर महाराष्ट्राची सीमा या मतदारसंघात समाप्त होते. हा मतदारसंघ आदिवासी बहुल आहे, या मतदारसंघातील जिवती तालुक्या सारखा भाग तर शेवटल टोक आहे. क्षेत्रफळाने चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वात मोठा विधानसभा मतदारसंघ म्हणजे राजुरा. आधी राजुरा देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा निजामांच्या ताब्यात होते. १७ सप्टेंबर १९४८ रोजी राजुरा निजामाच्या तावडीतून मुक्त झाले. १ नोव्हेंबर १९५६ रोजी भाषावार प्रांतरचना
अस्तित्वात आली. त्यावेळी राजुरा तालुका द्विभाषिक राज्यातील नांदेड जिल्ह्यात जोडण्यात आला. १९५२ च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत राजुरा आंध्रप्रदेशात होता. अशापध्दतीने राजुरा या मतदारसंघाला एक ऐतिहासिक राजकीय पार्श्वभूमी आहे.
या अशा आगळ्यावेगळ्या मतदारसंघात आमदार सुभाष भाऊ धोटे यांनी आपल्या कर्तृत्ववाने वेगळा ठसा उमटवला हे म्हणण्यास वाव आहे. कारण सुभाष भाऊंनी कधीही मतदारसंघात विकास कामे करतांना त्यांना इव्हेंट रूप दिले नाही. ज्या सामान्य लोकांच्या गरजा असतील, जे सर्वाधिक आवश्यक असेल ते जनतेपर्यंत कसे पोहचेल हाच त्यांचा ध्यास असतो.
सुभाष भाऊंनी आपल्या राजकिय कारकीर्दीची सुरवात आपल्या महाविद्यालयातच केली.विद्यार्थी संघटनेचे ते अध्यक्ष होते. त्याच वेळी खर तर समोर या माणसासाठी उज्वल राजकिय भविष्य आहे असे कोणीही सांगू शकले असते. ते काँग्रेस चे एक सच्चे कार्यकर्ते आहेत. एन.एस.यु.आय. चे जिल्हाध्यक्ष, नंतर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस, जिल्हा परिषद कार्यवाहक अध्यक्ष, प्रदेश प्रतिनिधी असे अनेक पदे त्यांनी भूषवली.
पण त्याचबरोबर सहकार क्षेत्रात देखील त्यांनी आपला ठसा उमटवला. सुभाष भाऊ सहकार क्षेत्रातील उत्तम जाणकार आहेत. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे संचालक, त्यानंतर उपाध्यक्ष, त्यानंतर विभागीय मंडळ शिखर बँकेचे अध्यक्ष असा त्यांचा सहकार क्षेत्रातील प्रवास सुद्धा उल्लेखनीय राहिला.सध्या ते विदर्भ कॉपरेटिव्ह फेडरेशन चे अध्यक्ष आहेत. या मध्ये सुनील केदार, राजेंद्र शिंगणे, सुरेश देशमुख, अरविंद सावकार पोरेड्डीवार यांच्या सारखे मातब्बर मंडळी कार्यरत आहेत.
राजकीय क्षेत्रातील सुभाष भाऊंची सुरवात दमदार राहिली तरी पुढे त्यांना विधानसभेची संधी मिळायला मात्र वेळ लागला. घरी वडील व काका आमदार असूनही सुभाष भाऊं ना आमदार बनण्यासाठी संघर्ष करावा लागला. त्यांना अनेकदा वाटायचे आपल्याला तिकीट मिळावे पण त्यांना ते मिळाले नाही. पहिल्यांदा त्यांना २००९ ला विधानसभेचे तिकीट मिळाले त्यात ते विजयी झाले. दुसऱ्यांदा त्यांना अपयश मिळाले पण नंतर २०१९ च्या निवडणूकित त्यांना पुन्हा एकदा राजुरा विधानसभेचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली.
यावेळी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक संकटे आली पण सुभाष भाऊ त्या संकटाना सुद्धा सामोरे गेले आणि केवळ आणि केवळ स्वतः च्या कष्टाने आमदार बनले. पक्षाने इतक्यांदा तिकीट नाकारले पण त्यांनी काँग्रेस पक्ष कधीही सोडला नाही. ते आपल्या संधीची वाट बघत राहिले आणि जेव्हा संधी मिळाली त्यांनी त्याचे सोने केले.
आपल्या मतदारसंघातील अनेक प्रश्न त्यांनी विधानसभेत उचलले व धसास लावले. ग्रामीण रुग्णालय, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, जिवती येथील कुपोषणाची समस्या असो. त्यांनी त्या बद्दल आवाज तर उठवलाच पण शासकीय स्तरांवर भेटीगाठी घेऊन अनेक प्रश्न मार्गी लावले. जिवती तालुक्यातील गेली ५० वर्षापासून रेंगाळत असलेला १४ गावांचा प्रश्न वारंवार विधानसभेत मांडून तेथील नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे काम सुभाष भाऊंनी केले त्यांच्या अथक प्रयत्नांनी आज १४ गावांचा सीमावाद प्रश्न निकाली लागला आहे.या चौदा गावांना आता महसूली दर्जा प्राप्त झाला आहे. त्यांची तळमळ आहे की मतदार संघात मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांसाठी पाण्याची सुविधा निर्माण करुन हरित क्रांती घडावी माझा परिसर सुजलाम सुफलाम व्हावा या साठी ते प्रयत्नरत आहेत.
राजुरा शहरात तलाव करून त्यांनी राजुरा शहराच्या सौंदर्यीकरणात आणखी भर घातली. गडचांदूर मध्ये नगरपालिका निर्माण व्हावी यासाठी आपल्याच पक्षाची ग्रामपंचायत असतांना देखील मागेपुढे न पाहाता लोकांच्या हितासाठी गडचांदूर नगरपरिषदेसाठी पुढाकार घेतला.जिवती सारख्या आदिवासी बहुल भागात पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी तीन तलावांची निर्मिती केली. मतदारसंघातील आरोग्य समस्या दूर व्हाव्या या साठी चार प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती सुभाष भाऊंनी केली आहे. जिवती तालुक्यात १८० कोटींची विकास कामे सुरू आहे. हे केवळ त्यांच्या प्रयत्नांनी शक्य झाले आहे.
सुभाष भाऊंना काँग्रेस पक्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यामुळे आमच्या सारख्या राजकारणात कारकिर्द घडवू इच्छिणाऱ्या अनेकांच्या साठी ते मार्गदर्शक ठरतात. राजकिय वारसा असून ही कुठल्याही गर्वाचा दर्प त्यांना कधी झाला नाही. आपल्या मतदारसंघातील प्रश्न तर ते सोडवतातच पण त्याच बरोबर पक्षाने दिलेले सर्व च्या सर्व कार्यक्रम त्यांच्या मतदारसंघात राबवले जातात. मागे पक्षाकडून सर्व जिल्हयात आझादी गौरव पदयात्रा काढण्यात आल्या. प्रत्येक जिल्ह्याने १८० किलोमीटर ची यात्रा काढायची होती. सुभाष भाऊंनी आपल्या नेतृवात धुव्वाधार पावसात राजुरा मतदारसंघातच स्वतंत्र १८० किलोमीटर ची यात्रा काढली.अनेक पूरग्रस्त भागात तर गुडघ्याभर पाण्यात चालून त्यांनी ही यात्रा पूर्ण केली. त्यांचा हा उत्साह तरूणांना लाजवेल असा आहे.
त्यांच्या सोबत त्यांच्या मतदारसंघात फिरणे म्हणजे राजकारणाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच राजकारणातील नव्या मुलांना शिकवणी लावण्या सारखे आहे.
त्यांना आपल्या मतदारसंघात फिरत असतांना अनेक लोक भेटतात त्यांच्या सोबत त्यांचा थेट संवाद तरअसतोच पण प्रत्येकाचे नाव त्यांना माहिती असते त्याच सोबत त्यांची समस्या देखील काय होती हे सुध्दा त्यांना माहीत असते. राजकारणात यशस्वी होण्यासाठी मेहनत,चिकाटी, धैर्याची आवश्यकता असते त्याचा वस्तुपाठ म्हणजे सुभाष भाऊ आहेत.
राजकारणात उशिरा संधी मिळाली नाहीतर कदाचित ते आज आहेत त्या पेक्षाही उंच स्थानावर असते पण खरं तर संधी उशिरा मिळूनही त्याचे सोने करता येते, लोकांच्या हितासाठी लढता येते हे सुभाष भाऊं नी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.
जे आहे, ते आहे सरळ बोलायचे उगीच मनात एक आणि ओठावर दुसरे हा त्यांचा स्वभाव नाही. अनेकदा स्पष्ट बोलणाऱ्या व्यक्तींचा लोकांना कधी कधी राग येतो. पण अशा व्यक्तीच आपल्याला आयुष्यात आरसा दाखवत असतात. जो की प्रत्येक व्यक्तींसाठी आवश्यक असतो. स्पष्टवक्तेपणा स्वभाव असला तरी त्यांचे मन अतिशय संवेदनशील आहे. वडिलांचे छत्र लवकर हरवल्यावर आपल्या आई सोबत इतर चार भावांना सुभाष भाऊंनी केवळ सांभाळलेच नाहीतर प्रत्येकाला योग्य वळणाला लावून मोठ्या भावाचे कर्तव्य सुद्धा यशस्वीपणे पार पाडले.
त्यांच्या बद्दल आणखी एक सांगायचे झाल्यास ते कार्यकर्त्यांचे गुण पारखून संधी देतात. खूप कमी लोक इतरांच्या गुणांना ओळखतात. आणि त्यांना मोठं करतात सुभाष भाऊ त्यांच्या पैकीच एक आहेत. मी स्वतः बद्दल सुद्धा म्हणू शकते कि मला संधी देणारे सुभाष भाऊ सुद्धा आहेत. राजकारणाचे गाढे ज्ञान, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, सामान्य जनतेची नाळ ओळखण्याचे कसब, विधानसभेचे ज्ञान, जनतेशी थेट संवाद, गोर गरीब जनतेचे दुःख समजून घेणारे व्यक्तिमत्त्व, महिलांना सन्मान देऊन त्यांना राजकारणात संधी देणारे नेतृव, स्वतःच्या मतदारसंघातील अडचणी समजून घेण्यासाठी सतत प्रवास करणारे प्रवासी अशी कितीतरी विशेषणे त्यांना लागू होतात.
आज या कर्मयोगी, राजकारणातील अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने त्यांना खूप खूप शुभेच्छा. त्यांची उत्तरोत्तर प्रगती व्हावी हीच मंगल कामना..
नम्रता आचार्य-ठेमस्कर (जिल्हाध्यक्ष,चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेस, ग्रामीण)
MLA Subhash Bhau Dhote is a versatile personality in politics Congress leader rajura vidhansabha Chandrapur district Maharashtra India rajura India Maharashtra
beautification of Rajura city by constructing a lake in Rajura city. municipality in Gadchandur,