Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, एप्रिल १०, २०१०

नक्षलवाद्यांच्या दहशतीत 'माटी तिहार'ची लगबग

नक्षलवाद्यांच्या दहशतीत 'माटी तिहार'ची लगबग
प्रमोद काकडे - सकाळ वृत्तसेवा
सुकमा (जि. दंतेवाडा) - बस्तरच्या घनदाट जंगलातून जाताना रस्त्यात काय पेरलेले असेल, याचा नेम नाही. येथील प्रवास धोकादायक आहे. या प्रवासात वाटेत लाकडाचे ओंडके टाकून वाट अडविली तर..? या परिसरात येणाऱ्या कोणत्याही नवख्या माणसाच्या काळजाचा ठोकाच चुकेल; मात्र तो काही क्षणांसाठीच! कारण वाट अडविणाऱ्या आदिवासी तरुण-तरुणींच्या उत्सवाचा तो एक भाग आहे. याला 'माटी तिहार' या नावाने येथे ओळखले जाते. दोन-चार रुपये दिले की ते वाट मोकळी करून देतात. पैसे दिले नाहीतर दगडफेकीला सामोरे जावे लागते. नक्षलवाद्यांच्या दहशतीची छाया असताना मात्र त्यांच्या उत्साहात तिळमात्र फरक पडलेला नाही.

चार दिवसांपूर्वी सुकमापासून 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या ताडमेटला जंगलात माओवाद्यांनी 76 केंद्रीय राखीव पोलिस दलांच्या जवानांचा बळी घेतला. त्यानंतर या भागात "हाय अलर्ट' घोषित करण्यात आले आहे. रोजच मृत्यूला सामोरे जाणाऱ्या आदिवासींच्या लेखी या "अलर्ट'ला कवडीचीही किंमत नाही, ते आपल्याच मस्तीत जगत आहेत. येथील आदिवासींच्या उदरनिर्वाहाचे साधन मुख्यत: शेती आणि शिकार आहे. शेतीत प्रामुख्याने गव्हाचे पीक घेतले जाते. आता हंगाम संपलेला आहे. त्यानंतर "माटी तिहार' या उत्सवाला सुरवात होते. सामूहिक शिकार करायची किंवा त्यांच्या भागातून जाणाऱ्या व्यक्तींची वाट अडवून त्यांच्याकडून पैशाच्या स्वरूपात "कर' वसूल करायचा. त्यातून मिळणाऱ्या रकमेतून मौजमजा करायची, असे या उत्सवाचे एकूण स्वरूप आहे. या उत्सवाला प्राचीन अशी परंपरा आहे.

जंगलात आता केवळ आदिवासी शिल्लक आहेत. घनदाट जंगल असूनही चिटपाखरू दिसत नाही. त्यामुळे "सामूहिक शिकार' हा विषय आता मागे पडला. आदिवासी भागातून आता चांगले डांबरी रस्ते झाले आहेत. वर्दळीचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्‍वभूमीवर रस्त्यात ओंडके टाकून वाहने अडवून पैसे वसूल केले जातात. या कामात आदिवासींची मुले, तरुण-युवतींचा पुढाकार असतो. यावेळी ज्येष्ठ मंडळी मात्र रस्त्याच्या कडेला असलेल्या जंगलात लपून असतात. वाहन थांबले की आदिवासी तरुणी वाहनांभोवती फेर धरून नाचतात. या भागातील आदिवासी मुळातच लाजाळू असल्यामुळे पैशाची मागणी स्वत: करीत नाहीत. जेवढे हातावर ठेवाल तेवढ्यात ते समाधान मानतात. पैसे दिले की रानफुले देऊन पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा देतात. मात्र, पैसे देण्यास नकार दिला की लपून असलेली आदिवासी ज्येष्ठ मंडळी वाहनावर दगडफेक करण्यासही मागेपुढे बघत नाही. पोलिसांनाही या भागातून जाताना पैसे द्यावे लागतात. जुन्या काळी राजाची वाट अडवून पैशाची मागणी केली जात होती. हा उत्सव शेतीचा हंगाम सुरू होईपर्यंतच असतो.

चहुबाजूंनी पोलिसांची गस्त आणि माओवाद्यांची छाया असताना त्यांच्या उत्सवाच्या उत्साहात काहीच फरक पडलेला नाही. या मार्गाने जाताना मात्र आदिवासींचे असे वेगळ्या प्रकारचे आदरातिथ्य मनावरील ताण हलका करण्यास हातभार लावते<

विश्रांतीसाठी नियमितपणे एकाच ठिकाणी येणे भोवले

प्रमोद काकडे - सकाळ वृत्तसेवा
सुकमा (जि. दंतेवाडा, छत्तीसगड) - मोठ्या घातपातासाठी ओरिसा-छत्तीसगडच्या सीमेवर नक्षली एकत्र आले आहेत, या गुप्तचरांच्या सूचनेकडे केलेले दुर्लक्ष आणि विश्रांतीसाठी जंगलात सातत्याने एकाच ठिकाणाची केलेली निवड या दोन ठळक चुकांमुळे केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या 62 व्या बटालियनचे 76 जवान शहीद झाल्याचे बाब समोर आली आहे.

केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या 62 व्या बटालियनचे 82 जवान दंतेवाडा जिल्ह्यातील चिंतलनार ठाण्यात गत सहा महिन्यांपासून तैनात आहे. येथून 80 किलोमीटवर चितलनार आहे. रविवारी हे 82 जवान गस्तीवर निघाले होते. दोन दिवस गस्त घातल्यानंतर मंगळवारला ताडीमेटला या गावाच्या बाहेर विश्रांतीसाठी एकत्र आले. ज्या ठिकाणी हे एकत्र आले, ते खुले मैदान आहे. बाजूला दोनशे मीटर उंचीचे डोंगर आहे. या जवानांचे विश्रांतीचे हे नेहमीचेच ठिकाण होते. त्यामुळे नक्षलवाद्यांनी सुनियोजितरीत्या काल मंगळवारला (ता. 6) डाव साधला. डोंगरावर दबा धरून बसलेल्या जवळपास तीनशे नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर चारही बाजूनी अंदाधुंद गोळीबार केला. पहाटे साडेचारच्या सुमारास जवान विश्रांती घेत असताना हा अचानक हल्ला झाला. जवांनाना सावरायलाही वेळ मिळाला नाही. काही जवानांच्या बंदुकाही त्यांच्यापासून दूर ठेवलेल्या होत्या, तर काहींनी "लॉक' करून ठेवल्या होत्या. त्यामुळे सुरवातीला जवानांकडून नक्षलवाद्यांचा प्रतिकार होऊ शकला नाही. त्यामुळे अर्ध्याहून अधिक जवान काही वेळातच शहीद झाले. ज्यांनी स्वत:ला सावरत झाडाच्या मागे आडोसा शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांनाही मृत्यूला सामोरे जावे लागले. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे जवान झाडाच्या मागे आडोसा शोधतील, हे गृहीत धरूनच नक्षलवाद्यांनी आजूबाजूला प्रेशरबॉम्ब लावले होते. यामुळे बळींची संख्या आणखी वाढली. ग्रेनेड, हातबॉम्ब यासोबतच नक्षलवाद्यांनी तीरकमठ्यांनी बेसावध जवानांवर हल्ला चढविला.

काही जवानांकडून प्रत्युत्तरादाखल गोळीबार सुरू असतानाच काही जवानांनी चिंतलनार आणि चिंतागुफा या पोलिस ठाण्यात वायरलेसवरून संपर्क साधला. त्यानंतर या जवानांच्या मदतीसाठी भूसुरुंगरोधक वाहन पाठविण्यात आले. मात्र, चकमक सुरू असलेल्या घटनास्थळापासून पाच किमी अंतरावर स्फोट घडवून नक्षलवाद्यांनी हे वाहन उडविले. सुदैवाने यात केवळ चालक ठार झाला. दरम्यान, ताडीमेटला गावाजवळ जवानांना ठार केल्यानंतर नक्षलवाद्यांनी त्यांची शस्त्रे लुटली. केवळ एके-47 रायफल्स पोलिसांच्या हाती लागली. काही जखमी जवान ठार झाले, असे समजून त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने बोटावर मोजण्याइतके जवान या कारवाईत बचावले.

हालचालीचा सूक्ष्म अभ्यास
केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांच्या हालचालीचा सूक्ष्म अभ्यास केल्यानंतरच नक्षलवाद्यांनी कारवाईचे नियोजन केल्याचे घटनाक्रमावरून स्पष्ट होते. जवान विश्रांतीसाठी एकच ठिकाणी थांबतात, या एकाच सूत्राचा आधार घेऊन नक्षलवाद्यांनी कारवाईची आखणी केली. जवान मोकळ्या मैदानावर थांबत असल्याने सभोवताल असलेल्या भौगोलिक स्थितीचा नक्षलवाद्यांनी पुरेपूर लाभ घेतला. कारवाई सुरू केल्यानंतर जवानांपर्यंत मदत पोहोचू नये, यासाठी घटनास्थळापर्यंत पोचणारे मार्ग खोदून ठेवण्यात आले होते तसेच भूसुरुंग पेरून ठेवण्यात आले होते. पहाटे साडेचार ते सकाळी नऊ वाजेपर्यंत घटनास्थळाच्या पाच किलोमीटरच्या परिसरावर संपूर्णपणे नक्षलवाद्यांचे नियंत्रण होते. नक्षलवाद्यांचा मोठा डाव यशस्वी झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून जवानाचा मृत्यू गस्तीवर असताना झाल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात जवान विश्रांती घेत असताना नक्षलवाद्यांनी हल्ला चढविला. त्यामुळेच मोठी जीवितहानी झाल्याचे घटनास्थळाला भेट दिल्यानंतर स्पष्ट होते.

कालच्या भीषण हल्ल्यामुळे या भागात संतापाचे वातावरण असून, आज कोटा, दोरनापाल, सुषमा या भागात लोकांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळला.

बस्तरमधील नक्षली घटना
14-15 मार्च 2008 - रानबोदली पोलिस कॅंपवर हल्ला - 55 जवान शहीद
9 जुलै 2008 - उत्पालमेटा पोलिस पथकावर हल्ला-22 जवान शहीद
9 मे 2009 - धमतरीरिसगाजवळ पोलिस पथकावर हल्ला- 12 जवान शहीद
11 जुलै 2009 - राजनांदगाव - मदनवाडा पोलिस मदत केंद्रावर हल्ला - 29 जवान शहीद
6 एप्रिल 2010 - ताडमेटला - सुरला जवानांवर हल्ला - 76 जवान शहीद संबंधित बातम्या
हल्ल्याचा सूत्रधार कटकम सुदर्शन?
नक्षलवाद्यांनी केली 76 जवानांची हत्या
अंगाला हळद लागण्यापूर्वीच हौतात्म्य
'सीआरपीएफ'ने केली पोलिस संरक्षणाची मागणी

प्रतिक्रिया
On 4/8/2010 1:40 PM Mihir said:
यात अटल मृत्यू होणार तो जंगल जपण्यार्या आदिवास्याचा.. आणि विजय होणार भांडवल-दरांचा.. हा प्रश्न फारच वेगळ्या पद्धतीने हाताळला पाहिजे.. या operation मध्ये आदिवासी एक तर मारल्या जातील, किवा भीतीने गाव सोडून शहरात पळतील आणि झोपडपट्टी करून राहतील... जे कि या मोठ्या companies ना हवय.. यात खरच कुणाचा विकास आहे का ?? असेल तर तो नक्कीच या मोठ्या विदेशी कंपन्या आणि इथल्या industrialist चा.....!!!!!!!
On 4/8/2010 1:34 PM Mihir said:
आताच्या घटनेत जे जवान मारले गेलेत , त्यांचे प्राण अमुल्यच आहेत , पण त्यांच्या वर झालेल्या या हल्ल्या मुळे इतर अधिकारी हाच विचार करणार.. कि या नक्षलवाद्यांना गावातल्या लोकांनी माहिती किवा मदत केली.. त्या मुळे निर्दोष आदिवास्यान बद्दल चीड निर्माण होऊन रागाने target केल्या जाणार. आणि दुसर्या बाजूस , जर जवानान कडून काही नक्षलवादी मारल्या गेलेत तर तेही या आदिवासी गवान वरच राग काढणार, या शंके ने कि तुम्हीच पोलीसा ना मदत केलीत.
On 4/8/2010 9:26 AM jaydeep said:
194 lives and counting... hopeless government still waiting for talks...

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.