जुन्नर :आनंद कांबळे
सिटू संलग्न अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा मेळावा आज (दि.१७) तळेरान (ता.जुन्नर) येथे जिल्हा सल्लागार कॉम्रेड लक्ष्मण जोशी यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने २० फेब्रुवारी २०२३ पासून शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, वेतनवाढ मिळावी यांसह विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. या संपामध्ये सक्रिय सहभागी होऊन संप यशस्वी करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून मेळाव्याची सुरुवात झाली. यावेळी जिल्हा सल्लागार लक्ष्मण जोशी म्हणाले, अंगणवाडी कर्मचारी यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा आणि मानधन वाढ, नवीन चांगला मोबाईल, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना थकीत सेवासमाप्ती लाभ द्यावेत, निवृत्तिवेतन सुरु करावे, नवीन मोबाईल, पदोन्नती बाबतचे निकष निश्चित करावेत, आहार, इंधन, प्रवास व बैठक भत्ता मिळावा, मोबाईल रिचार्जची थकीत देयके देण्यात यावीत, उन्हाळ्याच्या सुट्ट्या मिळाव्यात, वाढलेल्या लोकसंख्येसाठी नवीन अंगणवाडी सुरु करावी, मानधनामध्ये सेवेच्या अवधीनुसार वाढ द्यावी, जादा पदभाराचा अतिरिक्त मेहनताना, साहित्य अंगणवाडीत पोहोच करणे, विविध विमा योजनांचा लाभ, इंधन व आहार दरात वाढ करावी, आदी मागण्यांना घेऊन हा संपन्न होणार आहे. हा संप सर्व अंगणवाडी महिलांनी मोठ्या ताकतीने सहभागी व्हावे.
यावेळी संघटनेच्या अध्यक्षा शुभांगी शेटे, सचिव मनीषा भोर, सुप्रिया खरात, सुशील तांबे, मीना मस्करे, आदींसह पदाधिकारी, अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या.