Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, ऑगस्ट ३१, २०२०

सिंहगड लढाईत तानाजी मालुसरेनी घोरपड वापरली होती का?

सिंहगड लढाईत तानाजी मालुसरेनी घोरपड वापरली होती का?


इतिहास काय सांगतो

दि ३० आॅगष्ट २०२० 

काही एेतिहासिक घटनाना आधार असतो तर काही घटना अंदाजानेच ठरवाव्या लागतात. सर्वच दंतकथा खोटया आहेत असेही नाही. सिंहगड लढाई वेळची एक कथा सांगितली जाते ती म्हणजे १६७० साली 'तानाजी मालुसरे' यांनी घोरपडीच्या सहाय्याने चढून कोंढाणा किल्ला (सिंहगड) घेतला.  (ऐ.पो.पृ- ८३). शाहीर तुलसीदासाच्या पोवाड्यात आलेला हा उल्लेख आहे. परंतु सभासद बखरीत "...जैसा वानर चालून जातात त्याप्रमाणे मावळे गड चढून गेले"(स.ब.पृ-६७) असे लिहले आहे . इतिहासातील प्रत्येक नोंदीमध्ये काही तथ्य आहे की नाही यावर वाद प्रतिवाद होतात तसेच तानाजी मालुसरे हे खरेच एका घोरपडीच्या साह्याने कोंढाणा किल्ला वर चढून गेले होते का हा प्रश्न नेहमी उपस्थित केला जातो. तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ला घोरपडीच्या साह्याने सर केला होता अशा नोंदी इतिहासामध्ये आहे. 
प्रत्येकवेळी पुरावा पाहीजे असे नाही. पुरावे विचारणारयानी लक्षात घ्या, कोणतिही घटना घडत असताना, ती मुद्दाम घडविली तर पुरावा ठरवता येतो. पण आपण तर्क केला तरी घटना काय घडली असेल याचा अंदाज बांधु शकतो. 
पण जरी वरील घोरपडीची घटना सत्य नसली तरी यापूर्वी घोरपडीच्या सहाय्याने गड जिंकण्याचा प्रकार पंधराव्या शतकात (इ.स.१४७०) घडलाय आणि त्याचे पुरावेदेखील मिळतात.
▶️तो असा: यावेळी भारतात बहामानींची सत्ता होती. महमदशा बहामनी (दुसरा) हा सत्तेवर आला, त्याचा वजीर 'महमूद गावान' हा मोठा पराक्रमी होता. या गावानने दक्षिण कोकण जिंकण्याची मोहीम हाती घेतली. तो कोकणात उतरला.पूर्वीच्या एका घटनेचा सूड घेण्यासाठी त्याने 'खेळणा' उर्फ 'विशाळगड'वर स्वारी करायचं ठरवलं. हा किल्ला त्यावेळी कोकणातील राजा 'शंकरदेव मोरे' याच्या ताब्यात होता.या शंकररायाचा अंमल समुद्रापर्यंत असून त्याजजवळ तीनशे जहाजांचे आरमारही होते.त्यांचा मदतीने तो मुसलमान व्यापारांस फार उपद्रव देई.(मु.रि. खं१ पृ-२१६).त्याला शह देण्यासाठी महमद गवान पहाडी पायदळ घेऊन 'खेळण्यावर' आला.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,कोल्हापूरमध्ये मलकापूरनजीक हा दुर्ग वसला आहे. सह्याद्रीच्या बिकट रांगेतील हा बेलाग आणि नावाप्रमाणेच विशाल असा हा दुर्ग त्याला सहजासहजी जिंकता येईना, मौलाना अबुसयीरला लिहलेल्या पत्रात गवान लिहतो की, "… खेळण्याच्या किल्ल्याला वेढा घातला ,या किल्ल्याची मजबुती आणि शक्ती पाहून माझी खात्री झालीय की हल्ला करून तो आपल्या ताब्यात येणे शक्य नाही "(दुर्ग, पृ -५४०). अनेक महिने गेले तरी किल्ला हाती येत नव्हता. यावेळी महमूद गावानच्या फौजेतील सरदार कर्णसिंह आणि भीमसिंह या पितापुत्रांनी एक युक्ती सुचवली, ती म्हणजे घोरपडीच्या सहाय्याने किल्ला चढून जाण्याची. घोरपड हा साधारण पालीसारखा दिसणारा पण आकाराने मोठा असा प्राणी. याच्या फताड्या पायांमुळे आणि मोठ्या नखांमध्ये भिंत घट्ट धरण्याची क्षमता असते.
ठरल्याप्रमाणे एका काळ्याकभिन्न रात्री काही घोरपडींच्या कमरेला दोर बांधून हे पितापुत्र मोजक्या सैन्यानिशी किल्ल्यावर चढून गेले आणि आतून बंद असलेला किल्ल्याचा दरवाजा उघडला. बाहेर महमूद गावान दबा धरून बसले होते . दरवाजा उघडताच त्यांनी किल्ल्यात प्रवेश करून तो हस्तगत केला. मात्र लढाईदरम्यान कर्णसिंह धारातीर्थी पडले.(मु.सं.इ परि, पृ१५).पण त्यांच्या पराक्रमाने दक्षिण कोकणचे प्रवेशद्वार असणारा 'खेळणा' किल्ला मात्र ताब्यात आला.                                                  या प्रसंगानंतर बादशाह महमदशहाने कर्णसिंहाचा पुत्र 'भीमसिंहाला' दिलेल्या फर्मानात स्पष्ट उल्लेख आहे की, 'सोसमार' म्हणजे 'घोरपड' घेऊन रात्रीच्या वेळी त्यांच्या कंबरेस दोर बांधून आकाशाशी स्पर्धा करणाऱ्या त्या 'खिलना' किल्याच्या कांगोऱ्यावर त्यांना पाठवले आणि किल्ल्याचा दरवाजा उघडला..." यापुढे तो असेही लिहतो की, "...या लढाईत करणसिंघ कामास आला. या कुलाच्या शाश्वतीसाठी आणि चाकरीसाठी ८४ गावांसह मुधोळ पूर्वीप्रमाणे बहाल करण्याचे फर्मावतो.याशिवाय रायबाग व वाई हे परगणे बक्षीस देतो तसेच त्यांना 'राणा' ऐवजी 'राजा घोरपडेबहाद्दर ' हा किताब बहाल करतो आणि घोरपडीच्या रंगाचे निशाण देतो, ते त्यांनी आपल्या स्वारीत ठेवावे" .फार्मानावर तारीख आहे -२२ ऑक्टोबर १४७१. (मु.सं.इ परि, पृ१६). सदर फर्मान बनावट असल्याचे गजानन मेहेंदळे यांचे मत आहे.,याशिवाय करवीर सरदारांच्या कैफियती मधे घोरपडीचा आलेला हा उल्लेख, "..असे दर जागी पराक्रम स्वतः फौजेनिसी केले. त्यामुळे बादशहाची मर्जी खुश होऊन "घोरपडे" म्हणोन किताब दिल्हे कारण हेच कि जेथे जेथे प्रसंग पडेल तेथे घोरतर युद्ध करून जय मिळवतात...निरुपाय असले ठिकाणीसुद्धा 'घोरपडीचे' कंबरेस दोरी बांधून आत्मादेह क्षात्र धर्माकडे चित्त पुरवून हल्ला करतात. सबब त्यास घोरपडे असे किताब आबदागिरी वगैरे चिन्हे द्यावी,असी योजना करून दिल्हे." (क.स.कै, पृ-६९)
कर्णसिंह आणि शुभकृष्णसिंह हे भोसाजीचे पणतू. भोसाजीचे वंशज ते भोसले. वरील घटनेनंतर 'भीमसिंह' हा 'घोरपडे' बनला तर देवगिरीकडील 'शुभकृष्ण' मात्र 'भोसले'च राहिला [हेच छ.शिवाजी महाराजांचे घराणे](मु.सं.इ परि,पृ१७०-१७४).'पुढे बहमनी सत्तेचे पाच तुकडे पडून पाच शाह्या वेगळ्या झाल्या त्यापैकी एक आदिलशाही उदयास आली. तेव्हा या पराक्रमी घोरपडे मंडळींनी आदिलशाहीला साथ दिली.परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेनंतर मात्र या घराण्याने स्वराज्याची इमानेइतबारे सेवा केली.'संताजी घोरपडे' हे त्यापैकीच एक !
▶️ सिंहगड लढाई वेळी:: कोंढाणा सर करते वेळी रात्रीच्या वेळी यशवंती ह्या घोरपडीच्या द्वारे वरती किल्ल्यावर चढून जाण्याचा उपाय होय. रात्रीच्या वेळी किल्ल्याची दारे बंद झाल्यानंतर किल्ल्याचा सुभेदार उदयभान व त्याचे सैन्य यांना गुंगारा देत तानाजी मालुसरे यांनी युक्ती व उपलब्ध संसाधने द्वारे यशवंती  घोरपडीला दोर बांधून काही निवडक मावळ्यांसह कोंढाणा सर केला व मोठ्या शिताफीने उदयभानच्या सैनिकांना विरोध केला.
▶️ पण घोरपड माणसाचे वजन पेलु शकते का? 
घोरपडीयाच्या एकूण जवळपास ऐंशी प्रजाती आहेत.
घोरपड हा सरडा प्रजातीचा एक सरपटणारा प्राणी असलातरी ती तिचे वजन हे जास्तीत जास्त शंभर किलोपर्यंत तर उंची जवळपास पाच फुटापर्यंत वाढू शकते.घोरपड तिच्‍या नखांनी खडकाळ कठिण भागास घट्ट धरून राहू शकते. म्हणून पूर्वीच्‍या काळी किल्ल्यांवर, अथवा उंच भूस्‍तरांवर चढताना घोरपडीच्‍या कमरेस दोर बांधून तिचा चढाईसाठी उपयोग करून घेत होते. हिच्या पायाच्या नख्यांमुळे ही कुठेल्याही भिंतीवर दगड आणि डोंगर, कड्या कपाऱ्यातून सहज रित्या चढू शकते.
घोरपड ही प्रजाती सरपटणार्‍या प्राण्यांमध्ये वर्गीकृत होते. घोरपडीचा जबडा हा खूप मजबूत असतो तर शेपटीची लांबी हीसुद्धा खूप जास्त असते.घोरफडीचे अन्य अवयव विकसित असतात.घोरपडी या मांसाहार करतात.मांसाहारी घोरपडी या अंडी ,पक्षी, छोटे जीव जंतू इत्यादींचे.भक्षण करतात तर काही घोरपडी या शाकाहारी असतात ज्या फळे व जमिनीवरील भाज्यांचे सेवन करतात.
भारतामध्ये मोठ्या प्रमाणात बेंगॉल मॉनिटर ही घोरपड सापडते .बेंगाल मॉनिटर हे एका माणसाचे वजन सहजरीत्या उचलू शकेल इतकी मजबूत घोरपड मानली जाते आणि त्याची लांबी ही 71 सेंटीमीटर ते 175 सेंटीमीटर इतकी लांब असू शकते. बेंगाल मानिटर ही संपूर्ण भारतीय उपखंड प्रमाणेच साऊथ एशिया आणि पूर्व आशियामध्ये ही आढळून येते. अशी शारीरिक वैशिष्ट्ये किंवा जडण-घडण असलेल्या घोरपडीच्या द्वारे एखादा मावळा सर्वात आधी गडावरती घोरपडीच्या साह्याने दोर लावून पोहोचला असेल  आणि त्याने अन्य मावळ्यांना वरती येण्यासाठी साहाय्य केले असेल असे मानण्यामध्ये काहीही गैर नाही.
इतिहासातील वर्णनानुसार तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ला सर करताना वापरलेली यशवंती घोरपड बेंगाल मॉनिटर याच प्रजाती मधील होती.
▶️ काय घडले असेल त्या वेळी: तानाजी मालुसरेंची कथा अशी सांगितली जाते: तान्हाजी मालुसूरे व त्यांचे तिनशे धारकरी काळ्याकुट्ट आंधारात त्या डोणगिरी कड्याला चिकटले.दबत हळु हळु मुंगिच्या पावली डोणगिरी कड्याजवळ आले.गनिम तो सर्व कल्याण दरवाजाच्या बाजुस एकवटला.लांब बांबुचा पेटारा उघडला व त्यातुन ‘यशवंती’ घोरपड बाहेर कढली.तिच्या कमरेभोवती सोल कसला व तिच्या माथी तान्हाजींनी शुभारंभाचा शेंदुर थापला.तिनशे धारकर्यांनी हात जोडुन श्री कोंढाणेश्वराला नमन केले.ती नुसती घोरपड नव्हती.तर, जणु काही साक्षात आईभवानी घोरपडीच्या रुपात आपल्या भुत्यांना सहाय्य करण्यास सरसावली होती.त्या मुक्या प्राण्याने आपला सन्मान ओळखला व चित्कारत कडा चढु लागली.यशवंती सरसर कडा चढुन वर गेली.तान्हाजींनी दोराला ताकदिनिशी हासडा दिला व दोर पक्का झाल्याची खात्री केली.तान्हाजींच्या इशार्यासोबत एक वीर खांद्यावर सोलाची वेटोळी अडकवुन यशवंतीच्या कमरेला बांधलेल्या सोलास धरुन सरसर वर गेला व सोलाचा दुसरा पदर खाली सोडला.अशा प्रकारे दहा बारा सोल सोडले व सर्व मावळे वर चढुन तटबंधी लगतच्या झाडाझुडपांत लपुन बसले.सारे तटबंधी ओलांडुन आत घुसले व आडीचशे मावळे त्या मोंगली गोंधळात सामिल झाले व कल्याण दरवाजाकडे धावले.जो आडवा येईल त्याला कापत कापत पुढे सरकत ते आडीचशे वीर कल्याण दरवाजाजवळ आले.एकच हलकल्लोळ माजला.त्या अंधार्या रात्रीच्या या प्रकाराने सर्वच हादरुन भेदरुन गेले कुणाचेच कुणाला कळेना.आतुन हल्ला बाहेरुन हल्ला, आरोळ्या, हाणमार, कापकापी, रक्ताच्या चिळकांड्या, जिव्हारी बसलेल्या घावामुळे किंचाळण्याच्या आवाजाने तो कल्याण दरवाजाचा आसमंत थराररुन उठला व याच गोंधळाचा फायदा घेत.मावळ्यांनी कल्याण दरवाजाचा तो लाकडी अडसर बाजुला केला.कल्याण दरवाजा उघडला.कल्याण दरवाजा उघडलेला पाहताच शेलार मामा व सुर्याजीच्या दडुन बसलेल्या तिनशे मावळ्यांनी एकच मुसंडी मारली.घनघोर युध्द झाले.या युद्धात उदयभानूच्या एका तलवारीच्या घणाघाताने तान्हाजींच्या हातची ढाल चिरफळली.तशेच चिरफळल्या ढालीवर काही वार झेलले.डोईचे मुंडाशे काढुन तान्हाजी त्यावर वार झेलु लागले.पण,ते कीती तग धरणार.उदयभानूच्या वारांनी त्यांचा डावा हात पुर्ण रक्ताळला व साक्षात नरविर तान्हाजींसारखा नृसिंहही कळवळला.तान्हाजींनी एक अखेरचा वार उदयभानुच्या डाव्या खांद्यावर केला व त्याला उभा चिरला आणि आणि उमरठचा उमराव कोसळला. .गडावरील गवताचे खण पेटवले गेले.शिवरायांना इशारद मिळाली.गड आला! 
गड आला पण सिंह गेला.
आपण फक्त अंदाज बांधु शकतो. पण नक्की काय घडले हे इतिहासालाच माहित. 

📖 स्ंदर्भ ::

ऐतिहासिक पोवाडे - य.न.केळकर

सभासद बखर - हेरवाडकर

मुसलमानी रियासत - गो.स.सरदेसाई

करवीर सरदारांच्या कैफियती - स.मा.गर्गे

मुधोळ संस्थानच्या घोरपडे घराण्याचा इतिहास- द.वि.आपटे.

तुलशीदास पोवाडा. 
सभासद बखर
किल्ले सिंहगड
-आप्पा परब

मंतरलेला इतिहास - हर्षद सरपोतदार

दुर्ग - सतीश अक्कलकोट


सिंहगड लढाईत तानाजी मालुसरेनी घोरपड वापरली होती का?
सिंहगड लढाईत तानाजी मालुसरेनी घोरपड वापरली होती का?

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.