लॉकडाऊनमध्ये विक्रीच नाही; उदरनिर्वाहाचा यक्ष प्रश्न
सतीश बाळबुधे
यवतमाळ : केलेल्या श्रमाचा मोबदला चांगला मिळावा यासाठी अनेकजण प्रयत्नरत असतात. दिवसभर घाम गाळूनही श्रमाच्या मोबदल्याची शाश्वती नसेल तर जिवण मरण्याचा प्रश्न समोर येतो. शिवाय, उदरनिर्वाह कसा करावा, फाटक्या जोळीत भाकरीचा तुकडा पडेल की नाही याचीही चिंता सतावत असते. ही व्यथा आहे अशाच एका कारागिराची जो आपल्या परिवारासह धूळे जिल्ह्यातून यवतमाळ येथे व्यवसाय करण्यास आला. यवतमाळमध्ये चांगली कमाई होईल आणि आर्थिक परिस्थिती सुधारे अशी त्याला अपेक्षा होती. मात्र, बॅट विक्रीच्या ऐन हंगामात लॉकडाऊन काळात एका पैशाचीही कमाई न झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. दरम्यान, लॉकडाऊन जाहीर झाल्याने होत्याचेही नव्हते झाले आहे. आता तर मुलांच्या उज्वल भविष्याच्या विचाराने रात्रीचेही झोप हरवल्याचे त्याने सांगितले.
सुनील धर्मा पवार शिरपूर (जि. धुळे) येथून यवतमाळ येथे बॅट विक्री करण्याच्या व्यवसायासाठी आला. परिस्थिती अत्यंत बेताची. दोन पैसे मिळावे या उद्देशाने आपल्या परिवारासह यवतमाळ गाठले. यात एक मुलगा सहावीत तर दोन मुली २ री ३रीत शिकणा-या. इतक्या कुटुंबांचा गाडा चालतो तो फक्त शिरसच्या लाकडी बॅट विकण्यावर. बॅट बनवा ती ग्राहकांना आवडली तर २०० ते ५०० रुपये मजूरी मिळणार इतकाच त्याचा नित्यक्रम. येथील आर्णी रोड लगत दरवर्षी अनेक कारागीर येतात. क्रिकेट बॅट, स्टम्स, बेल्स, स्टडी टेबल्स विक्रीचा व्यवसाय ते करतात. दिवसरात्र मेहनत करून बॅट व इतर साहित्य बनवावे लागतात. यावरच त्यांचा उरनिर्वाह चालतो. उन्हाळ्यातील दोन-तीन महिने सर्वाधिक कमाईचे असतात. परंतु, कोरोनामुळे लॉकडाऊन लागल्याने मुले घराबाहेर पडलीच नसल्याने बॅट विक्रीवर परिणाम झाला आहे. गतवर्षी याच काळात दिवासला दोन ते तीन हजारांची विक्री होत होती. आता पावसाळा सुरू झाल्याने दिवसाला एक किंवा दोन बॅट विक्री होत असल्याने जवळच्या तुटपूंजीवर कसेबसे दिवस काढले आहेत. ग्राहकांच्या प्रतीक्षेत दिवसभर ताटकळत बसावे लागत असल्याची खंतही त्याने व्यक्त केली.
सिझन वाया गेल्याने मुलाबाळांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दोन पैशा जादा मिळतील या आशेने आधीच भटकंती करीत असल्याने कधी-या गावी कधी दुस-या गावी येजा करावी लागत होती. शिक्षणाचे महत्त्व असल्याने शिक्षणाचा प्रश्न शांत बसू देत नाही. काय करावे आणि कसे जगावे हाच प्रश्न सतत घोंगावत असतो. सध्या तरी शासकीय मदतीपासून वंचित आहे. कोणतीच मदत गेल्या तीन महिन्यापासून मिळालेली नाही.
- सुनील धर्मा पवार (बॅट व्यावसायिक)
रहने को……खुदा है रखवाला……
यवतमाळ येथे गेल्या सहा महिन्यांपासून एका झोपडीत राहत आहे. परिवारासह झोपडीत राहतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. कधी पाऊस आल्यास थंडीत कुडकूडत रात्र काढावी लागते. कधी कधी तप्त उन्हाने शरीरातून घाम जातो, तर कधी अति थंडीत राहावे लागते. वादळ वारा आल्यास त्याला सोसत जगावे लागत आहे. शिरसच्या लाकडी सामानासह रात्रभर देखरेख करीत रात्र काढावी लागते. परिणामी, निसर्ग जी स्थिती दाखवेल त्या स्थितीशी लढत रात्र काढावी लागत आहे.