Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, ऑगस्ट ०७, २०१०

बोगस बिलांतून 25 लाखांचा गैरव्यवहार

सकाळ वृत्तसेवा

Friday, August 06, 2010 AT 12:00 AM (IST)

Tags: crime, bribe, chandrapur, vidarbha

चंद्रपूर - कंत्राटी कर्मचाऱ्यांना अग्रीम रक्कम देता येत नसतानादेखील प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी बोगस बिले जोडून सर्वशिक्षा अभियानातील 25 लाखांचा गैरव्यवहार केल्याची माहिती आहे. वर्षभर प्रभार सांभाळणाऱ्या या शिक्षणाधिकाऱ्यांची नुकतीच बदली झाल्यानंतर हा घोळ लक्षात आला आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात मागील दीड वर्ष कायमस्वरूपी शिक्षणाधिकारी नव्हते. त्यामुळे उपशिक्षणाधिकारी पदावरील अधिकारीच ही खुर्ची सांभाळत होते. जिल्हा परिषदेच्या सभा किंवा मोठ्या अधिकाऱ्यांच्या दौऱ्यादरम्यान हे प्रभारी अधिकारी नेहमीच गायब राहायचे. त्यांच्या दीड वर्षाच्या कार्यकाळात हजेरीपटावर आजारी रजा, दौरा, तातडीच्या कामाची नोंद आहे. सभांमध्ये उत्तर देणे जमत नसल्याने आणि आपला भोंगळ कारभार उघड होऊ नये म्हणून कनिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविणे, हा प्रकार त्यांच्या कार्यकाळात चालला. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांची बदली नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी येथे गटशिक्षणाधिकारी म्हणून झाली. त्यानंतर त्यांच्या जागी आलेल्या नव्या अधिकाऱ्याला मागील कार्यकाळात झालेला गैरव्यवहार लक्षात आला. मात्र, त्यांनी याची कुठे वाच्यता केलेली नाही. विश्‍वसनीय सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, कंत्राटी कर्मचाऱ्यांना अग्रीम रक्कम देता येत नाही. याउपरही प्रभारी शिक्षणाधिकाऱ्यांनी एक ते दीड लाखांचे अग्रीम राशी वितरित केली. त्याची कुठेही नोंद नसून, बोगस बिले जोडण्यात आली आहेत. सर्वशिक्षा अभियानांतर्गत येणाऱ्या अपंग एकात्म शिक्षण, पर्यायी शिक्षण, शैक्षणिक गुणवत्ता कार्यक्रम आदींची बिलेही बोगस असल्याची माहिती आहे. सात ते 10 जूनपर्यंत पंचायतराज कमिटीकरिता शिक्षण विभागाची एक चमू पाठविण्यात आली. त्यासाठी त्यांनी खासगी बस भाड्याने केल्याचे दाखविले. यात 20 ते 25 हजारांचे बिले जोडण्यात आली आहेत. वस्तुत: बस भाड्याने करण्यात आलेली नव्हती. जर केली असेल तर डिझेल किंवा टोलटॅक्‍सच्या पावत्या जोडलेल्या नाहीत. शिवाय कंत्राटी साधनव्यक्तीच्या नियुक्ती आणि बदलीतही आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.