Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, जुलै २९, २०१०

भोंदू साधूनेही केले लैंगिक शोषण?

Friday, August 06, 2010 AT 12:00 AM (IST)

Tags: crime, sexual harassment, chandrapur, vidarbha
चंद्रपूर - राज शहा याच्या लैंगिक शोषणाचे प्रकरण गाजत असतानाच आज (ता. पाच) शहरातील एका पीडित तरुणीने वृत्तपत्रांच्या कार्यालयात निनावी पत्र पाठवून खळबळ उडवून दिली आहे. शहरातीलच एक महाराज (भोंदू साधू) याने आपले लैंगिक शोषण केल्याचा आरोप तिने या पत्रातून केला आहे.
गेल्या 15 दिवसांपासून लग्नाचे आमिष देऊन लैंगिक शोषण आणि अश्‍लील चित्रीकरण केल्याचे प्रकरण शहरात गाजत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी राज शहा, त्याचा मित्र पिंटू रॉय आणि एक मैत्रीण अशा तिघांच्या सेक्‍स स्कॅंडल नेटवर्कचा पर्दाफाश झाला. या प्रकरणाची कसून चौकशी सुरू असतानाच आज वृत्तपत्रांच्या कार्यालयात टपाल कार्यालयातून एक निनावी पत्र आले. त्यात पीडित तरुणीने राज शहाप्रमाणेच ढोंगीबाबाच्या कृत्याचा पर्दाफाश करण्याची विनंती पोलिस आणि प्रसारमाध्यमांना केली आहे. हिंदी भाषेत लिहिलेल्या या पत्रातून तिने राज शहाचे प्रकरण उघडणाऱ्या तरुणींच्या धाडसाचे अभिनंदन केले आहे. मात्र, पत्रामध्ये ती ढोंगीबाबाच्या वासनेला कशी बळी पडली, याचा पाढाही वाचला आहे. तिने लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, हा ढोंगीबाबा शहरातील एका प्रतिष्ठित मंदिरात राहतो. धर्म, पूजा आणि मानवसेवेच्या नावाखाली गेल्या अनेक वर्षांपासून त्याने तरुणींची शिकार केली आहे. शारीरिक, मानसिक आणि भावनात्मक शोषण केल्याचा आरोपही तिने केला आहे. केलेल्या कृत्यांचे संपूर्ण पुरावे असल्याचा दावाही तिने केला आहे

** ** ** * *** * * ** * ** *** * ** * * ** * * *  ****  ** **************
अखेर "नीतू' कोठडीत


Thursday, August 05, 2010 AT 12:00 AM (IST)

Tags: crime, chandrapur, vidarbha
चंद्रपूर - लैंगिक शोषणाच्या प्रकरणात मुलींना जाळ्यात ओढण्यासाठी प्रमुख भूमिका निभावणाऱ्या "नीतू'ला अखेर पोलिसांनी आज (ता. चार) दुपारी दीडच्या सुमारास अटक केली. लगेच तिला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने 15 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत तिची रवानगी केली. दरम्यान, तिच्या अटकेसाठी महिला संघटनांनी पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले होते.
बंगाली कॅम्प येथील एक पोल्ट्री व्यावसायिक शहा यांचा मुलगा राज याने तब्बल सहा तरुणींना लग्नाचे आमिष देऊन लैंगिक शोषण केल्याचा प्रकार एका पीडित तरुणीच्या माध्यमातून उघडकीस आला. या पीडित तरुणीने लग्नास नकार मिळाल्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. गेल्या आठवडाभरात या प्रकरणातील अनेक बाबी उघड झाल्याने राज शहा याच्यासह पिंटू रॉय यास अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले. दरम्यान, या प्रकरणात मुलींना जाळ्यात ओढण्याची प्रमुख भूमिका नीतू नामक 22 वर्षीय तरुणीने निभावल्याचे पीडितांनी दिलेल्या तक्रारीतून स्पष्ट झाले. मात्र, आठवडा लोटूनही तिला ताब्यात घेण्यात आले नव्हते. मध्यंतरी एक-दोनदा पोलिस ठाण्यात बोलावून तिची विचारपूस करण्यात आली. मात्र, तिने राज शहा हा मानसभाऊ असल्याचे सांगून पोलिसांच्या खाकीतून अलगद बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या प्रकरणात नीतूची भूमिका महत्त्वाची होती. त्यामुळे लैंगिक शोषणाच्या प्रकरणात नेमके काय घडले, याची चौकशी करण्यासाठी नीतूच्या अटकेचीही मागणी भाजप आणि मर्दानी महिला आस्था मंचाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना भेटून केली. चार-पाच दिवस उलटल्यानंतर पोलिसांनी आज दुपारी दीडच्या सुमारास तिला अटक केली. लागलीच तिला न्यायालयात हजर करण्यात आले.

'राज'ने दाखविले सहा मुलींना लग्नाचे आमिष!
Sunday, July 25, 2010 AT 12:00 AM (IST)
चंद्रपूर - बंगाली कॅम्प येथील एका पोल्ट्री व्यावसायिकाच्या मुलाने तब्बल सहा तरुणींना लग्नाचे आमिष देऊन फसविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यातीलच एका पीडित 18 वर्षीय मुलीने प्रेमविरहातून विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या संदर्भात तक्रार दाखल होऊनही रामनगर पोलिसांनी आरोपी "राज' यास अटक केलेली नाही.
बंगाली कॅम्प येथील रहिवासी असलेल्या एका सुशिक्षित कुटुंबातील 18 वर्षीय युवती नागपूर मार्गावरील कॉन्व्हेंटमध्ये बारावीचे शिक्षण घेत आहे. तीन महिन्यांपूर्वी एका मैत्रिणीच्या माध्यमातून राज या 24 वर्षीय तरुणासोबत ओळख झाली. या तीन महिन्यांत या दोघांमध्ये प्रेमसंबंधही जुळले. यादरम्यान राजने तिला लग्न करणार असल्याचे भासवून संबंध ठेवले. एकाच समाजातील असल्याने लग्नाला कुटुंबीयांकडून विरोध होणार नाही, असेही तरुणाने तिला सांगितले. मात्र, काही दिवसांनंतर लग्नाचे आमिष देणारा राज या युवतीशी मोबाईलवर बोलण्यास आणि भेटण्यास टाळाटाळ करू लागला. आजपर्यंत त्याने तब्बल सहा तरुणींना लग्नाचे आमिष दिल्याची माहिती मिळाली. दरम्यान, पीडित युवतीच्या कुटुंबीयांनी एका मध्यस्थीमार्फत राजचे वडील असलेल्या पोल्ट्रीफार्मच्या मालकाकडे लग्नाचा प्रस्ताव ठेवला. तेव्हा त्यांनीही उडवाउडवी करून प्रकरण दाबण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडित युवतीने फिनॉईल प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिला डॉ. अमल पोद्दार यांच्या रुग्णालयात भरती करण्यात आले. उपचारानंतर ती बरी झाली असून, आज (ता. 24) ती प्रथमच प्रसिद्धिमाध्यमांपुढे आली. घटनेची सर्व हकिगत तिने सांगितली.

 -----------------------------------------------
सकाळ वृत्तसेवा

Thursday, July 29, 2010 AT 12:22 AM (IST)
चंद्रपूर - पोल्ट्री फार्म व्यावसायिक शहा यांचा मुलगा राज याने लग्नाचे आमिष देऊन शारीरिक शोषण केल्याच्या प्रकरणात आज (ता. 28) आणखी एक पीडित तरुणी प्रसारमाध्यमांसमोर आली. तिनेही राजच्या कृत्यांचा पर्दाफाश केल्याने प्रकरणातील गुंतागुंत आणखीच वाढली आहे.
बंगाली कॅम्प येथील एका 18 वर्षीय तरुणीने प्रेमविरहातून विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर राज शहा याचे वासनाकांड उघड झाले. तरुणींना लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित करणे, अश्‍लील चित्र बाळगणे या आरोपाखाली राज यास पोलिसांनी नुकतीच अटक केली. राजच्या कृत्याची माहिती देताना आज एका युवतीने सांगितले की, सरदार पटेल महाविद्यालयातील "नीतू' नामक मुलीने राज याच्याशी ओळखी करून दिली. पहिल्याच भेटीत त्याने लग्न करू असे आश्‍वासन दिले होते. आकाशवाणीजवळील "राजनूर' या निवासीसंकुलातही त्याने तीनदा बोलाविले. अनेकदा दारू पिऊन असायचा. त्याच्याकडे वेगवेगळ्या कंपनीचे तीन महागडे मोबाईल होते. काही दिवसानंतर लग्नाचे आमिष देणारा राज मोबाईलवर बोलण्यास टाळाटाळ करू लागला. मोबाईलही नवीन आलेल्या तरुणीला दिला. 17 एप्रिलनंतर त्याची कधीही भेट झाली नाही. दरम्यान, सुरवातीला तक्रार करणारी तरुणी 28 एप्रिलपासून राजच्या संपर्कात आली. तेव्हापासूनच आपण त्याच्यापासून दूर गेल्याचेही तिने सांगितले. या प्रकरणात आतापर्यंत चार तरुणींनी आपले म्हणणे पोलिसांना सांगितले. मात्र, पोलिसांकडून ठोस कारवाई केलेली नाही. ज्या दिवशी बंगाली कॅम्प येथील तरुणीने विष प्राशन केले. त्यावेळी ती रुग्णालयात भरती असताना अन्य मुलीही भेटायला आल्या होत्या. त्या राजच्या सांगण्यावरूनच आल्याचेही उघड झाले आहे. मुलींना राजशी ओळख करून देणारी "नीतू' ही राजकडून पैसे घेऊन काम करीत होती, असे तक्रारकर्त्या दोन्ही तरुणींनी सांगितले. या दोघींनीही पोलिस अधीक्षक डॉ. मनोज शर्मा यांची भेट घेऊन सविस्तर माहिती दिली.

मुलींवर बलात्कार करणाऱ्या नराधमास अटक

Monday, July 26, 2010 AT 02:42 PM (IST)
चंद्रपूर - लग्नाचे आमीष दाखवून मुलींवर बलात्कार करणाऱ्या नराधमास पोलिसांनी सोमवारी अटक केली. राज शहा (वय २२, रा. चंद्रपूर) असे त्याचे नाव आहे.

चंद्रपूरमध्ये राहणाऱ्या एका मुलीबरोबर शहा याने गेले काही महिने शारीरिक संबंध ठेवले होते. तिच्याबरोबर लग्न करण्याचे आमीष त्याने दाखविले. अखेर गेल्या आठवड्यात त्याने लग्नास नकार दिल्यानंतर संबंधित मुलीने पोलिस ठाण्यात शहाविरुद्ध तक्रार दाखल केली. त्या दिवसापासून शहा फरार होता. पोलिसांनी त्याच्या निवासस्थानी धाड टाकली. त्यामध्ये अनेक अश्‍लिल मासिके आणि अन्य आक्षेपार्ह साहित्य आढळून आले.
शारीरिक संबंधांच्या चित्रीकरणाचा संशय

Monday, July 26, 2010 AT 12:31 AM (IST)
चंद्रपूर - लग्नाचे आमिष देऊन तरुणीशी शारीरिक संबंध ठेवणाऱ्या राजच्या निवासी संकुलात पोलिसांनी छापा घातल्यानंतर प्रकरणाने वेगळेच वळण घेतले आहे. त्याच्या बेडरूममधील काही साहित्यांवरून शारीरिक संबंधांचे चित्रीकरण झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. यातील पीडित 18 वर्षीय मुलीने या सर्व प्रकाराचा भांडाफोड केला आहे.
बंगाली कॅम्प येथील रहिवासी असलेले पोल्ट्री फार्म व्यावसायिक प्रकाश शहा यांचा मुलगा राज याने 18 वर्षीय युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण केले. मात्र, काही दिवसांनंतर लग्नाचे आमिष देणारा राज या युवतीशी मोबाईलवर बोलण्यास आणि भेटण्यास टाळाटाळ करू लागला. या प्रेमविरहात 18 वर्षीय युवतीने फिनाईल प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्नही केला. त्यानंतर तिने पोलिसांना तक्रार देऊन राजने केलेल्या कृत्याची माहिती दिली. तिने दिलेल्या माहितीत आजपर्यंत त्याने तब्बल सहा तरुणींना लग्नाचे आमिष दिले असून, शारीरिक संबंध ठेवले होते. एका मैत्रिणीच्या माध्यमातून अन्य तरुणीशी ओळखी करून शारीरिक संबंध प्रस्थापित करतो. अशा नवनव्या तरुणींना गाठून फसविल्याचे तक्रारीत म्हटले होते. या प्रकरणाचा भांडाफोड करण्यासाठी पीडित तरुणी आज (ता. 25) स्वतः पोलिस अधीक्षक डॉ. मनोज शर्मा आणि अधिकाऱ्यांना घेऊन गेली. या पोलिस चौकशीत अनेक नवीन बाबी उघड झाल्या. इरई नदीच्या काठावर त्याच्या मालकीचे "राजनूर' नावाचे निवासी संकुल आहे. पहिल्याच माळ्यावर त्याची आलिशान खोली असून, तिथे सर्व व्यवस्था आहे. पोलिसांनी तपासणी केली असता त्याच्या फ्रिजमध्ये 10 बिअर बॉटल्स, आक्षेपार्ह साहित्य, चित्रीकरण करण्यासाठी वापरण्यात आलेली यंत्रणा आढळून आली. पोलिस अधीक्षक डॉ. मनोज शर्मा यांनी रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाची तपासणी केली. आरोपी राजचे वडील प्रकाश शहा यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. या प्रकरणात राजला सहकार्य करणाऱ्या पिंटू आणि कपिल नामक दोन तरुणांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.