Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, ऑगस्ट ३१, २०२०

तावीज(क्राईम डायरी)

तावीज (क्राईम डायरी)

फेसबुक लिंक https://bit.ly/2QD2J30
जोरदार वळीव पाऊस सलग तीन दिवस पडत होता. सकाळी कडक ऊन, उकाडा अन् दुपारी जोरदार पाऊस यामुळे शेतातील कामे लवकरच करावी लागत होती. यावर्षी वळिवाला लवकर सुरुवात झाल्यामुळे पाऊस अधिक आहे असे भाकीत जाणकार शेतकरी व्यक्त करत होते. विजेचा लपंडाव सुरू झाला होता. पांडूनाना शेतातल्या खोपीत बसून होता. समोरच वीज चमकायची तसं नानाचं काळीज हालायचं. नानाचं पाच एकर शेत एका जागेला होतं. दुपारची भाकरी खाऊन नाना हातात सुताची दोरी वळत होता. पुन्हा वीज झाली तसा नाना उठला अन् भांगलणीचं खुरपं खोपीच्या दाराम्होरं टाकलं. तेवढ्यात जोरात वीज झाली अन् समोरच लिंबाचं झाड जळताना दिसलं. तसा नाना स्वतःशी पुटपुटला, ‘थोरल्याला सांगितलं होतं लिंबाचं झाड इजेला धार्जिण असतंय; तवा तोडून टाक. पण म्हातार्याचं ऐकतंय कोण?’ पूर्ण झाड जळताना बघून नानाचं मन कालावलं. दोन-चार कुत्र्यांचा जोरात भुंकण्याचा आवाज येऊ लागला.
तसा नाना पावसातच उठला. हातात खुरपं अन् काठी घेऊन तो कुत्र्यांच्या आवाजाकडे जाऊ लागला. मळ्याच्या एका बाजूला ओढा होता. त्या ओढ्याकडे कुत्र्यांचा मोठा आवाज ऐकू आला. दोन-चार कुत्री माती उकरत होती. नाना पुढं जाईल तसं कुत्री नानावरच गुरगुरू लागली. तसा दगडाचा टिपिरा एकाला दिला, तसं ते ओरडतच पळालं. नानानं पुढं होऊन बघितलं नी नानाच्या काळजात धस्सं झालं.
आल्यापावली नाना माघारी फिरला अन् पावसातच नानानं घर गाठलं. काय बघितलं हे पोरग्याला सांगितलं. पोरगा पावसातनंच
पोलिसपाटलांच्या घरी गेला. ताबडतोब पाटलांनी पोलिसांना खबर दिली.
घटनेची खबर मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. फौजदार माणिक मनोहर यांनी पुढं होऊन पाहिलं आणि शिपायांना इशारा केला. साहेबांच्या इशार्याबरोबर पोलिस ओली माती उकरू लागले. उकरलं तेव्हा एका तरुणाचं प्रेत बाहेर आलं. कपड्यावरून तो तरुण शहरी भागातला वाटत होता. पण कोणताच ओळखीचा मागमूस नव्हता. प्रेत बाहेर काढण्यात आलं. प्रेताचा पंचनामा करून प्रेत पी. एम.ला पाठविण्यात आलं. पोलिस घटनास्थळी चौकशी करत होते. मात्र एकही वस्तू पोलिसांना संशयास्पद आढळून आली नाही.
जिथं प्रेत पुरलं होतं तिथं जवळपास नानाची खोप व दुसर्या दोन-तीन खोपी होत्या. जवळपास कायमची वस्ती नव्हती. त्यामुळे या तरुणाला कुणीतरी मारून आणून इथे पुरल्याचा अंदाज मनोहर यांनी बांधला. नानाकडे पुन्हा पोलिसांनी चौकशी केली. परंतु नानाला काहीच माहिती नव्हती. कुत्र्यांच्या आवाजावरून नानाला प्रेत दिसलं होतं.
पोलिस गावात येऊन मयत तरुणाचा फोटो दाखवून चौकशी करत होते; मात्र नानाच्या गावातील कोणीच त्या तरुणाला ओळखत नव्हते. डॉक्टरांच्या अहवालात गळा दाबून खून असा निष्कर्ष आल्याने खून करूनच प्रेत पुरले होते हे निश्चित. चार दिवस होऊनही मयताची ओळख पटत नव्हती. कोणत्याही पोलिस स्टेशनला संबंधित तरुणाच्या वर्णनाची केस नोंद नव्हती. त्यामुळे प्रेताची ओळख पटल्याशिवाय तपास करणं फौजदार मनोहर यांना अवघड झालं होतं.
पोलिसांनी घटनास्थळाची पुन्हा बारकाईने पाहणी सुरू केली. जवळपास 100 फुटांचा परिसर पिंजून काढला. अन् एक अंधूकसा धागा पोलिसांना मिळाला. एक लहानसा तावीज व त्याला बांधलेला काळा दोरा होता. त्याची बारकाईने मनोहर यांनी पाहणी केली. मयत तरुणाचा अथवा आरोपीपैकी एकाच्या गळ्यातील तावीज असावा, असा अंदाज पोलिसांनी बांधला. पोलिसांनी लागलीच मोहल्ल्यात धाव घेतली. परंतु, हा तावीज या भागात मिळत नसल्याचे बहुसंख्य मुस्लिम बांधवांनी सांगितले. पुन्हा पोलिसांचा भ्रमनिरास झाला. मग हा तावीज मिळतो कुठे? हा प्रश्न पोलिसांना पडला. तालुक्याच्या ठिकाणी असणार्या मशिदीमधील मौलवींना हा तावीज फौजदार मनोहर यांनी दाखविला. त्यांनी मात्र हा तावीज ओळखला. अशाप्रकारचे तावीज दुर्गम जिल्ह्यात मिळत असल्याची मौलवींनी माहिती दिली. ♍पोलिस एका जिल्ह्यात पोहोचले. परंतु नेमके कोणत्या तालुक्यात माहिती नसल्याने ते प्रत्येक तालुक्यात फिरू लागले. दोन-चार तालुके पालथे घालून आले. पोलिस कंटाळले अन् एका तालुक्यात मात्र पोलिसांना यश आले. सदरचा तावीज तालुक्यातील एका दर्ग्यासमोर विकत मिळत होता. पोलिस दर्ग्यासमोर पोहोचले. तावीज विक्रेत्यांची दोन दुकाने तिथे होती. एका दुकानदाराने तावीज आपण विकल्याचे सांगितले. तावीजच्या मागे काहीतरी खूण होती ती बघून आपण हा एक महिन्यापूर्वी विकल्याचे सांगितले. प्रेत सापडून दहा दिवस झाले होते. मात्र, अद्याप पोलिसांना ओळखही पटवण्यात यश आले नव्हते.
मयताचा तावीज असावा असा अंदाज करून फोटो दाखविताच दुकानदाराने ओळखला. तावीज घेताना आणखी एक तरुण त्याच्या बरोबर होता. पोलिसांनी दर्ग्याजवळच्या गावामध्ये जाऊन चौकशी केली. अगदी दहा-बारा गावांमध्ये चौकशी केल्यानंतर शेवटी एका गावातील मयत तरुण असल्याचे दिसून आले. त्याचे नाव महंमद शफीक असे होते.
प्रेताची ओळख पटल्यामुळे महत्त्वाचे काम पोलिसांचे झाले होते. महंमदची संपूर्ण कुंडली पोलिसांनी काढली. परंतु त्याचा कुणाबरोबर झगडा-वाद नव्हता. त्याचे कुणाशी अनैतिक संबंधही नव्हते, मग अशा तरुणाचा खून करून प्रेत एवढ्या लांब नेऊन कोण पुरेल हा प्रश्नच पोलिसांना पडला होता. तो एका कंपनीमध्ये कामाला होता, तिथे चौकशी केली. परंतु तिथेही त्याचे रेकॉर्ड चांगले होते. खबरेही कामाला लावले. घरातील माणसांना तो कामावर आहे एवढेच माहीत होते. कंपनीच्या समोर चहाची टपरी होती. त्याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली.♍
ज्यावेळी खून झाला त्याच्या आदल्यादिवशी महंमद व अन्य तिथे सुट्टी झाल्यानंतर चहा पिण्यासाठी इथे आले होते. त्यांच्यामध्ये कोणत्यातरी शैला नावाच्या महिलेची चर्चा सुरू होती, जे कामगार होते ते आता कामावर होते. त्याबरोबर हवालदार ठोंबरेंनी मनोहरना कल्पना दिली. टपरीवाल्याला घेऊन पोलिस कंपनीत गेले. बाजूला उभे राहून त्या तिघांना त्याने आळखले. पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतले.
तिघांनाही पोलिसांचा चांगलाच पाहुणचार मिळाला. मात्र, महंमद कुठे आहे हे माहीत नाही असेच त्यांनी सांगितले. मात्र शैला कोण हे त्यांनी सांगितले. आपण महंमदला मारले नाही. आम्ही त्याला शैलावरून चिडवत होतो. असेच पालूपद त्यांनी लावले. पोलिसांनी कंपनी गेटवरून शैलाला ताब्यात घेतलं.
‘बोला शैला मॅडम, महंमद कुठे आहे?’ ‘मला काय माहीत नाही. अन् माझा काय संबंध त्याच्याशी?’ असा उलट सवालच तिने पोलिसांना केला. त्याबरोबर वाघमारे बाईंनी जोराचा दणका तिला दिला. त्याबरोबर ती धडपडली, रडू लागली, ‘साहेब, मीच मारलं महंमदला. मी त्याच्याकडून उसने पैसे घेतले होते. परंतु माझी पैसे परत करण्याची ऐपत नव्हती. त्या बदल्यात मी त्याला ‘हवे ते’ द्यायला तयार होते परंतु त्यानं मला सरळ नकार दिला.
तो सारखे आपले पैसे परत मागत होता. त्यामुळे शेवटी माझा नाईलाज झाला. कंपनीतील अशोक शिपायाला मी यामध्ये सामील करून घेतले. त्या बदल्यात मी त्याला ‘हवे ते’ दिले. अन् मग तो तयार झाला. पैसे देतो असे सांगून आम्ही त्याला माझ्या घरात नेऊन त्याचा दोघांनी गळा दाबला. अन् रात्रीच्या अंधारात त्याला पोत्यात घालून मोटारसायकलवरून दूर एका रानात पुरला. पण आम्ही कसं काय सापडलो काय माहीत?’ ‘चला मॅडम स्टेशनला, आम्ही तुम्हाला तिथेच समजावून सांगतो आणि तुम्ही दोघेही आता तुरुंगात बसा हिशेब करत.’ असे सांगून अशोकलाही ताब्यात घेतले.♍
तावीज (क्राईम डायरी)

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.