पाथर्डीतले सातवाहन कालीन रांजण !
फेसबुक लिंक http://bit.ly/3gKukxF
नाशिकमधील पांडवलेणी येथील अनेक शिलालेखांमध्ये व्यापाऱ्यांनी दान दिल्याचा उल्लेख आहे, तसेच पूर्व महाराष्ट्रात प्रवेश करण्यासाठी कल्याण-कसारा-नाशिक हा व्यापारी मार्ग प्रसिद्ध होता.गोवर्धन व अंजनेरी ही प्रसिद्ध बाजारपेठ होती, या इतिहासाला भक्कम दुजोरा देणारे सातवाहनकालीन दगडी तीन रांजण पांडवलेणीच्या पायथ्याशी असलेल्या पाथर्डी गावात आढळले आहेत. व्यापारासाठी या मार्गाचा वापर करणारे व्यापारी या रांजणांत ठरवून दिलेला कर टाकत असत. या अनोख्या दगडी रांजणांमुळे व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचा दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास समोर येणार आहे.
सातवाहन राजे हे महाराष्ट्राचे पहिले राजे म्हणून ओळखले जातात. साधारण इसवी सनापूर्वी २०० सालातल्या कालखंडात महाराष्ट्र समृद्धीच्या शिखरावर होता. त्याच्या खाणाखुणा इ. स. ७०० पर्यंत नाशिकच्या पांडवलेणीत पाहायला मिळतात.
जगभरातील व्यापारी कल्याण बंदरावर आपला माल घेऊन उतरत. त्यानंतर हा माल सातवाहनांची राजधानी प्रतिष्ठान (आताचे पैठण), उपराजधानी जीर्णनगर (आताचे जुन्नर), तसेच सातवाहनांच्या अधिपत्याखाली असलेल्या नाशिकच्या मुख्य बाजारपेठेत म्हणजे गोवर्धन (गोवर्धन आता बाजारपेठ नाही.) येथे व्यापारी हा माल घेऊन येत. कल्याण-नाणे घाट-जुन्नर-नगर-
पैठण हा महाराष्ट्रातील प्राचीन व्यापारी मार्ग होता. त्यामुळे या मार्गावरील जुन्नरची बाजारपेठ तेव्हापासूनच प्रसिद्ध होती. त्या काळी पूर्व महाराष्ट्रात जाण्यासाठी कल्याण-कसारा-नाशिक या मार्गाला व्यापारी पसंती देत. त्यामुळेच या मार्गावर त्रिंगलवाडी लेणी, पांडवलेणी (त्रिरश्मी लेणी) व अंजनेरी लेणी निर्माण झाल्या. डोंगराळ भागातून येणाऱ्या या व्यापारी मार्गाचे संरक्षण व्हावे, तसेच लूटमारीपासून बचाव व्हावा म्हणून या मार्गावर किल्ल्यांची निर्मितीही झाल्याचे दिसते. कावनई किल्ला, त्रिंगलवाडी किल्ला, अंजनेरी किल्ला, ब्रह्मगिरी किल्ला याचीच उदाहरणे आहेत.Ⓜ
अंजनेरीची बाजारपेठही सातवाहनांच्या काळात प्रसिद्ध बाजारपेठ होती. या बाजारपेठेत येण्यासाठी व्यापाऱ्यांवर कर आकारणी केली जाई. त्या बदल्यात व्यापाऱ्यांना स्थानिक बाजारपेठेत व्यवसाय करता येई, तसेच त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी स्थानिक राजा घेत असे. त्याच्या पाऊलखुणा यापूर्वी नाशिकमध्ये उजेडात आल्या नव्हत्या. त्यामुळे नाशिकमार्गे महाराष्ट्रात इतरत्र जाणाऱ्या व्यापाऱ्यांवर कर आकारणी होत होती का, याचे उत्तर मिळत नव्हते. मात्र, पाथर्डीत कर आकारणी करण्यासाठी महत्त्वाचे असलेले दगडी रांजण मिळाल्याने कल्याण-कसारा-नाशिक या मार्गे नाशिकमध्ये प्रवेश करणाऱ्या व्यापाऱ्यांनाही कर द्यावा लागत असे, हे आता स्पष्ट झाले आहे. या रांजणांमुळे सातवाहनकालीन व्यापारावर नव्याने प्रकाश पडणार आहे.
लेण्यांसाठी व्यापाऱ्यांकडून दान पांडवलेणी, अंजनेरी लेणी, तसेच जैन मंदिरांसाठी व्यापाऱ्यांनी दान दिल्याची अनेक उदाहरणे शिलालेखाच्या माध्यमातून लक्षात येतात. विदेशी बनावटची भांडी व काचेच्या वस्तू नाशिकमध्ये आढळल्या आहेत. जुनी नाणी, सोन्याच्या मोहराही व्यापारी मुक्त हस्ताने दान करीत असत. त्यामुळे नाशिकमध्ये बौद्ध लेणींची सातवाहन काळात भरभराट झाल्याचे दिसते.
ठेवा व्हावा संरक्षित!
पाथर्डीत सापडलेले दगडी रांजण चार फूट व्यासाचे आणि पाच फूट उंचीचे आहेत. हे रांजण पूर्वी जकातीसाठी वापरले जात असत. जकात कर रूपाने यात तत्कालीन ‘कर्षापण’ नावाची नाणी टाकली जात असत. पाथर्डीतील तीन रांजणांपैकी एक अजूनही सुस्थितीत आहे, तर दोन रांजण काहीअंशी जमिनीत गाडले गेलेले आहेत. आता हा अनमोल ठेवा सुरक्षित ठिकाणी हलवून त्याचे संवर्धन करण्याची गरज आहे.Ⓜ__________________________
माहिती सेवा गृप पेठवड़गाव
__________________________