"डेरा आंदोलनातील कोविड योध्द्यांच्या भावनांचा उद्रेक...
...अखेर वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांना पळ काढावा लागला
चंद्रपूर : 7 महिन्यांच्या थकीत पगारासाठी मागील जवळपास तीन महिन्यापासून डेरा आंदोलन करणाऱ्या चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कंत्राटी कामगारांच्या भावनांचा आज पुन्हा एकदा उद्रेक झाला.वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख आज चंद्रपूरच्या दौऱ्यावर होते. जिल्हाधिकारी कार्यालया जवळील नियोजन भवन येथे अमित देशमुख यांची पत्रकार परिषद सुरू असताना मागील बाकावर बसलेल्या तीन कोविड योध्द्या महिला कामगारांनी थकीत पगाराबाबत मंत्री देशमुख यांना धारेवर धरले.
यावेळी कामगारांच्या भावनेचा उद्रेक झाला. आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या नंतर महिला कामगार थकित पगारासाठी ढसाढसा रडायला लागल्या. कामगारांचा उद्रेक पाहून अखेर वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे सह नियोजन भवनातून पळ काढणे सोयीस्कर समजले.
नियोजन भवनातून बाहेर निघाल्यानंतर सुद्धा गनिमीकाव्याने बाहेर उभ्या असलेल्या कंत्राटी कामगारांनी अमित देशमुख यांना
घेरले.देशमुख यांच्या समोर प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.त्यांचा निषेध करण्यात आला तसेच गो-बॅक अमित देशमुख चे नारे लावण्यात आले.'थकीत पगार द्या,मगच जिल्ह्यात या,असे नारे लावण्यात आले.परिस्थितीचा अंदाज आल्यानंतर येथुन सुद्धा वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख यांनी पोलिसांच्या सुरक्षेमध्ये पळ काढला.
वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या चंद्रपूर दौऱ्याची माहिती मिळाल्यानंतर जन विकास सेनेचे अध्यक्ष नगरसेवक पप्पू देशमुख यांनी 'गो-बॅक' अमित देशमुख चा नारा दिला होता.'आधी कोविड योध्द्यांचे थकित पगार द्या, मगच चंद्रपूर जिल्ह्यात या' असा इशारा पप्पू देशमुख यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला होता. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर दंगा पथक व पोलिसांचा फौजफाटा अमित देशमुख यांच्या संरक्षणासाठी लावण्यात आला होता. पप्पू देशमुख यांच्यामागे सुद्धा काल रात्रीपासून पोलिसांच्या गुप्तचर विभागाचा ससेमिरा लागला होता.या सर्वांना बगल देत जनविकास सेनेच्या कामगारांनी गनिमी काव्याने आज अमित देशमुख यांना पळवुन लावले.
जोपर्यंत थकित पगार व किमान वेतन लागू होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील बी कामगारांचा हक्क मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी भावना सुद्धा यावेळी जन विकास चे अध्यक्ष पप्पु देशमुख यांनी व्यक्त केले.