मुख्य आरोपी पसार, तीन महिलांना अटक
१ लाख ३६ हजाराचा मुद्देमाल जप्त, गुन्हे शाखेची कारवाई
चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर महानगरातील जुनोना मार्गावरील एका घरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून देशी कट्टा, बंदुक, तलवारीसह अंमलीपदार्थ जप्त केले. याप्रकरणातील मुख्य आरोपी सोनूसिंग जितसिंग टाक पसार असून, तीन महिलांना अटक केली, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रपरिषदेत दिली.
मागील काही दिवसांपासून महानगरात अंमली पदार्थ विक्री वाढल्याच्या तक्रारी पोलिस विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्याअनुषंगाने जिल्हा पोलिस अधीक्षकांनी, धाडसत्र मोहिम हाती घेतली. बाबुपेठ परिसरातील जुनोना मार्गावरील विक्तुबाबा मंदिराजवळील टाक याच्या घरी गर्द अंमली पदार्थ विकल्या जात असून, तेथे मोठा साठा असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या हाती लागली. माहितीच्या आधारे पोलिस निरिक्षक ओमप्रकाश कोकाटे यांनी संबंधित घराची झडती घेतली.
पोलिस दिसताच सोनूसिंग टाक घटनास्थळावरून पसार झाला. घराच्या झडतीत पोलिसांना २५.२९ ग्रॅम गर्द पावडर (किंमत १२ हजार ६४५), एक देशी कट्टा (किंमत १० हजार), एक बारा बोअर बंदूक (किंमत २० हजार), एक एअर बंदूक (५ हजार), ५ नग तलवार (५ हजार), एक भाला, तीन चाकू व दोन सत्तुर (किंमत १ हजार ६००), काडतूस व इतर साहित्य (२ हजार १००), रोख ७९ हजार ९६० रूपये असा एकूण १ लाख ३६ हजार २०५ रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे महानगरात खळबळ उडाली असून, अवैधरित्या अंमली पदार्थ विक्री, साठवणूक व शस्त्रसाठा वापरणार्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. तसेच, आरोपींवर भारतीय दंड विधानान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.