Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, मे ०५, २०२१

प्राचिन माण

प्राचिन माण 
________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगांव
_________________________

फेसबुक लिंक http://bit.ly/3xNDK1p
माण हा सध्या सातारा जिल्ह्यातील प्रदेश आहे.माण या नावाचे कोणतेही गाव नाही पण माण नदीच्या नावावरून या प्रदेशाला "माण" हे नाव मिळाले.या माणचे बरेच एेतिहासिक संदर्भ मिळतात.सातवाहनांनंतर चौथ्या शतकात हा प्रदेश पूर्वकालीन राष्ट्रकूटांच्या अंमलाखाली होता. त्या वंशाचा मूळ पुरुष मानांक (कार. इ. स. ३५०–७५) याने आपल्या नावे मानपूर नामक नगर स्थापून तेथे आपली राजधानी केली होती हे मानपूर म्हणजेच सातारा जिल्ह्यातील माण असावे. या वंशाच्या अंमलाखालचा प्रदेश प्राचीन कुंतल देशात अंतर्भूत होत असल्याने येथील राजास कुन्तलेश्वर किंवा कुंतलाधिपती म्हणत. कुंतल देशात कृष्णवर्णा किंवा कृष्णा नदीकाठच्या प्रदेशाचा अंतर्भाव होत असे. ‘करहाटक ४०००’ या प्रदेशाचा कुंतल देशात समावेश होता. या राजांना उत्तरेतील गुप्त सम्राटांचा पाठिंबा होता.राजशेखर, भोज, क्षेमेंद्र इ. संस्कृत ग्रंथकारांनी उल्लेखिलेल्या परंपरेप्रमाणे गुप्तराजा दुसरा चंद्रगुप्त -विक्रमादित्य याने स्वकालीन राष्ट्रकूट राजाच्या म्हणजे मानांकाचा पुत्र देवराजच्या दरबारात कविकुलगुरू कालिदास याला आपला दूत म्हणून पाठविले होते. नंतर या घराण्याचे विदर्भातील वाकाटकांशी विवाहसंबंध झाले आणि पुढे ते त्यांचे सामंत झाले. या काळात उदयास आलेल्या विष्णुकुंडिन वंशातील दुसरा माधव वर्मा (६ वे -७ वे शतक) याच्या खानापूर ताम्र पटात रेठ्ठूरक (रेठरे बुद्रुक) या गावचा उल्लेख असून त्याच्या स्तंभाच्या निर्देशात राजमाची, शेणोली, कोला व मलखेट या गामांचा उल्लेख आहे. आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवड़गावची पोस्ट,शिवाय दानपत्रातील बेलवाटिका व वठ्ठरिका म्हणजे अनुक्रमे बेलवंडे व वाठार हेही स्पष्ट आहे. यावरून काही काळ या वंशाचा या प्रदेशावर अंमल असावा. चालुक्य दुसरा पुलकेशीने हे राज्य खालसा करून (६३१) तिथे आपला भाऊ विष्णुवर्धन याची काही काळ नियुक्ती केली.बदामीच्या चालुक्यांच्या पतनानंतरचा या प्रदेशाचा इतिहास सुस्पष्ट नाही तथापि तो नंतरच्या राष्ट्रकूट (७५३–९७५) घराण्याच्या साम्राज्यात अंतर्भूत झाला असावा आणि त्यांनी त्यावर एखाद्या सामंताची नेमणूक केली असावी. या काळातील त्यांची राजधानी सातारा जिल्ह्यातील कराड येथे असावी. कर्नाटकातील उत्तरकालीन सिंदराजे स्वतःचा ‘करहाटपूर वराधिश्वेर’ असा निर्देश करतात, यावरून ते मूळचे करहाटचे होते, हे निश्चित. कर्नाटकातील काही सिंदराजांच्या लेखांत ते मूळचे करहाटकचे होते, असे उल्लेख येतात. यावरून सिंदनृपती आदित्यवर्मा याची राजधानी करहाटकच असावी असे वाटते. नंतर शिलाहार द्वितीय जतिग याने तो प्रदेश जिंकून करहाटक येथे आपली राजधानी केली असावी. या शाखेचा पहिला ज्ञात लेख मारसिंहाचा (१०५८) मिरज ताम्रपट होय.
मारसिंह (कार. १०५०–७५) याच्या ताम्र पटात द्वितीय जतिगाचा मुलगा व उत्तराधिकारी गोंक याचे वर्णन असून तो करहाटक, कुण्डी, मिरिज देश यांचा अधिपती असल्याचा उल्लेख आहे. गोंकानंतर त्याचा मुलगा मारसिंह गादीवर आला. त्यावरून शिलाहारांची आरंभीची राजधानी करहाटक असावी.
शिलाहारवंशी राजकन्या चंद्रलेखा हिच्या चालुक्य राजा सहाव्या विक्रमादित्या बरोबरच्या करहाटक येथील स्वयंवराचे वर्णन बिल्हणाच्या विक्रमांकदेव चरितात आहे. तिच्या पित्याचे नाव करहाटपती असे त्यात आले आहे. राजा मारसिंह हा तिचा पिता असावा. या शाही विवाहानंतर शिलाहारांनी आपली राजधानी करहाटकहून कोल्हापुरास हलविली असे दिसते तथापि करहाटक येथे चालुक्य राजपुत्र मल्लिकार्जुन (चंद्रलेखेचा पुत्र) आणि सहाव्या विक्रमादित्याचा मांडलिक जोगम हे काही वर्षे राज्य करीत होते, असे कोरीव लेखांत उल्लेख आढळतात. कोल्हापूर व त्याच्या आसमंतात सापडलेल्या अनेक कोरीव लेखांत व वाङ्‌मयातही त्यांचा उल्लेख ‘करहाटाधिपती’ असाच आढळतो. शिलाहार वंशातील दुसरा भोज (कार. ११७५–१२१२) हा शेवटचा व श्रेष्ठ राजा होय. त्याने सातारा जिल्ह्यात १०–१२ किल्ले बांधले. त्यांपैकी सप्तर्षी (सातारा किंवा अजिंक्यतारा), चंदन-वंदन वगैरे काही प्रसिद्घ किल्ले होत. यादव राजा सिंघण (कार. १२१०–४६) याने भोजाचा पराभव केला. त्यानंतर हा प्रदेश यादवांच्या आधिपत्याखाली आला. या काळातील कोरीव लेखांत या प्रदेशाविषयी उल्लेख नाहीत. मात्र यादव वास्तुशिल्प शैलीतील मंदिरे फलटण (जबरेश्वर), परळी (शिवमंदिर व वीरगळ), कातरखटाव (कातरेश्वर), देऊर (विठ्ठल-रुक्मिणी), खटाव (नागनाथ), किकली (भैरवनाथ), शिंगणापूर (महादेव) इ. ठिकाणी आहेत. यांपैकी किकलीच्या भैरवनाथ मंदिरासमोर एक अस्पष्ट कोरीव लेख असून त्यातील ‘सिंघणदेव’ ही पुसट अक्षरे यादव वंशाच्या आधिपत्याचा निर्देश दर्शवितात.शिंगणापूरची स्थापना शिंगणराजे यादव (सन १२१० - ४७) या राजाने केली म्हणून यास शिंगणापूर हे नाव दिले आहे. इथल्या डोंगरमाथ्यावर एखाद्या शिरपेचाप्रमाणे शोभणारे शंभू महादेवाचे मंदिर हे माणदेशात सर्वात उंच ठिकाणी वसलेले तीर्थक्षेत्र आहे असे मानले जाते. हे देवस्थान अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत मानले जाते.
यादवांच्या पतनानंतर (१३१८) दक्षिण हिंदुस्थानात राजकीय अनागोंदी होती. बहमनी सत्तेखाली (१३४७–१५३८) गुलबर्गा तरफाचा सातारा भाग होता. कोकण भाग वगळता अन्य प्रदेश बहमनी साम्राज्यात होता. मुहंदशाह बहमनी (कार. १३५८–७५) याने खुद्द सातारा किल्ल्याची डागडुजी करून परिसरात अनेक किल्ले बांधून संरक्षण व्यवस्था भक्कम केली. या काळात वाई व माण ही दोन प्रमुख लष्करी ठाणी होती. बहमनी सत्तेच्या विभाजनानंतर हा प्रदेश आदिलशाही अंमलाखाली आला. याकाळात जावळीचे चंद्रराव मोरे, फलटणचे राव नाईक निंबाळकर, मलवडीचे झुंझारराव घाटगे, म्हसवडचे माने आदी मातब्बर मराठा मांडलिक घराणी वंशपरंपरेने आपल्या जहागिरीच्या ठिकाणी कार्यरत होती. त्यांच्या जीवावरच आदिलशाही सत्ता कोकणात स्थिरावली आणि पश्चिम महाराष्ट्रात त्यांनी आपली सत्ता दृढतर केली. याचकाळात छ.शिवाजी महाराजांनी जावळी व परिसर पादाक्रांत करून (१६५६) रायरी (रायगड) घेतला आणि पुढे अफजलखानाचा निःपात करून (१६५९) वाई देश जिंकला. शिवाजी महाराजांच्या निधनापर्यंत व नंतरही किरकोळ अपवाद सोडता सातारा किल्ला व त्याचा परिसर मराठ्यांच्या अंमलाखाली होता. पुढे छ.राजारामांनी सातारा ही मराठ्यां ची राजधानी केली. औरंगजेबाने सातारा-परळी किल्ल्यांसह बराच भाग मोगल सत्तेखाली आणला (१६९९). त्याच्या मृत्युनंतर (१७०७) तो छ. शाहूंच्या अखत्यारीत आला आणि सातारा संस्थानची निर्मिती झाली.प्रतापसिंह भोसले (कार. १८०८–३९) यांच्या कारकीर्दीत सातारा शहर व जिल्ह्यात अनेक सुधारणा झाल्या. हा प्रदेश पेशवाईच्या अस्तापर्यंत (१८१८) मराठी सत्तेखाली होता पुढे सुरूवातीस बिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे त्यावर वर्चस्व होते. नंतर तो अव्वल इंग्रजी अंमलाखाली भारत स्वतंत्र होईपर्यंत होता. माण तालुक्यात अतिशय प्रसिद्ध तीर्थक्षेत्र शिखर शिंगणापूर (महाराष्ट्राचे कुलदैवत), दहिवडी (श्री काशीपाते निलकंठ महाराज), जांभूळणी येथील श्री भोजलिंग व जोगेश्वरी मदिंर मोही (श्री महालक्ष्मी मंदिर), भवानी आई मंदिर (मार्डी), गोंदवले (श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज), वारुगड, म्हसवड (श्री सिद्धनाथ व जोगेश्वरी मंदिर ) मलवडी (खंडोबा, श्री महंत शांतिगिरीजी महाराज), पांगरी (बिरोबा, सतोबा),बिजवडी  , कुलकजाई (सीताबाई मंदिर), किरकसल (श्री नाथ मंदिर), कुकुडवाड (महादेव मंदिर), मंकलेश्वर (धुलोबा) मंदिर धुळदेव, नागोबा मंदिर विरकरवाडी इत्यादी. आसपास वारुळगड, महिमानगड व वर्धनगड हे काही किल्ले आहेत.
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
9890875498

प्राचिन माण


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.