Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, मार्च ३०, २०१७

चला वाचवूया चंद्रपूरचा किल्ला

इको प्रो संस्थेच्या नगरसंरक्षक दलामार्फत जतन मोहिम

चंद्रपूर शहरास ऐतिहासिक गोंडकालीन किल्ला- परकोटाने वेढलेले आहे. 550 वर्षांपूर्वी बांधलेला किल्ला आजही भक्कम असून, वैभवशाली गोंडकालीन इतिहासाची साक्ष देते. चंद्रपूर येथील पाच पिढ्यातील गोंडराजांनी हा किल्ला 100 वर्षांत बांधून घेतला. खांडक्‍या बल्लाळशाह या गोंडराजानी याचा पाया रचला, तर पाचव्या पिढीतील रामशाह गोंडराजांनी किल्ल्याच्या कामास पूर्णत्वास नेऊन चंद्रपूर शहर वसविले.
सात किमी लांबीचा किल्ला असून, यास 2 मुख्य प्रशस्त दरवाजे, दोन उप दरवाजे आणि पाच खिडक्‍या आणि अनेक बुरुज या किल्ल्यास आहेत. गेल्या कित्येक वर्षात या किल्ल्याच्या देखरेखीकडे दुर्लक्ष झाल्याने किल्ल्याच्या भिंतीस आणि बुरुजावर मोठ-मोठी वृक्ष वाढली होती. शिवाय किल्ल्यास तडेही गेलीत. बऱ्याच ठिकाणी किल्ला खचल्याने त्या भागातून किल्ल्याचे अवशेषसुद्धा नष्ट झालेले आहेत. किल्ल्याच्या भिंतीवर, मुख्य दरवाज्यावर आणि बुरुजावर अनेक वृक्ष-वेली वाढलेल्या आहेत. ही वृक्ष मोठी झाली कि, भिंतींना तडे जातात. भिंती ढासळतात, नष्ट होतात. अश्‍या नष्ट झालेल्या किल्ल्याच्या भिंती, ऐतिहासिक वास्तू अतिक्रमणाखाली येतात आणि मग, उरल्या- सुरल्या इतिहासाची ओळख करून देणारी अवशेषे सुद्धा काळाच्या पडद्याआड जातात. अश्‍या अवस्थेत आपला इतिहास जिवंत ठेवणे, वास्तूचे जतन करणे काळाची गरज आहे.
किल्ल्याची हीच दुर्दशा आणि होणारे दुर्लक्ष याकडे जिल्ह्यातील पर्यावरण तथा सामाजिक क्षेत्रातील अग्रगण्य असलेली इको-प्रो संस्थेच्या "इको-प्रो पुरातत्व संवर्धन विभाग' ने पुढाकार घेऊन मा. पंतप्रधान महोदयांनी सुरु केलेल्या "भारत स्वच्छता अभियान' अंतर्गत "चंद्रपूर किल्ला (परकोट) स्वच्छता अभियान' 1 मार्च 2017 पासून सुरू केले.

इको-प्रो संस्थेच्या "नगर संरक्षक दल'च्या स्वयंसेवकांच्या मदतीने रोज सकाळी 06:00 ते 10:00 वाजेपर्यंत श्रमदान करून "किल्ला स्वच्छता अभियान' राबविले जात आहे. यात रोज जवळपास 25-30 सदस्य नियमित श्रमदान करीत आहेत. आतापर्यंत पठाणपुरा गेट, बिनबा गेट व जटपूरा गेट व या गेटच्या आजूबाजूच्या किल्ल्याच्या भिंती आणि बुरुजावरील वाढलेली वृक्ष-वेली तोडण्यात आली. सोबतच यावरील कचरा साफ करून स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. किल्ल्याच्या उंच भिंती असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने संस्थेचे "अडव्हेंचर क्‍लब' च्या माध्यमाने रोप बांधून दोरीच्या साहाय्याने वृक्ष-वेली तोडली जात आहे. बऱ्याच वर्षांपासून किल्ल्याची काही बुरुजे निमर्नुष्य असल्याने यावर वाढलेली वृक्ष आणि झुडुपात मधमाश्‍याची पोळे सुद्धा आहेत. यामुळे हे अभियान अनेक पद्धतीने जिकरीचे आणि साहसिक झाले आहे. या अभियानास लागणारी साहित्ये लोकसहभागातून संस्थेस नागरिकांनी देऊ केली आहे.

केवळ चंद्रपूर शहर नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याला ऐतिहासिक-धार्मिक पार्श्वभूमी लाभली आहे. पुरातत्वीय दृष्ट्या हा जिल्हा महत्वाचा आहे. डोळस श्रद्धा आणि वैभवसंपन्न इतिहास याची ओळख आजच्या पिढीला करून देण्याचा गरजेतून इको-प्रो संस्थेने "पुरातत्व संवर्धन विभागाची' निर्मिती केली. वास्तविक वारसा जपण्याची त्याचे संवर्धन करण्याची व त्याचे सौंदर्य अबाधित राखण्यासाठीच पुरातत्व विभागाची निर्मिती आहे. पण जबाबदाऱ्या आणि कर्तव्यपालनात होणारी कुचराई या ऐतिहासिक, धार्मिक वारसाच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरत आहे. किल्ले, मंदिरे, समाधींच्या भोवती साचलेला कचरा, वाढलेली झुडपं, पुरपण्यामुळे ढासळणारे चिरे, तिथे वावरणारी असामाजिक तत्वे, या साऱ्यांची डोळस नोंद, डोळस सदस्यांच्या मदतीने घेऊन नागरिकांचे, शासनाचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न केला जातो. एवढेच नव्हे तर शक्‍य तेवढी स्वच्छता राखण्यासाठीही इको-प्रो झटत आहे

 - बंडू धोतरे

 इको-प्रो संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय युवा पुरस्कार्थी

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.