Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, मार्च ३०, २०१७

इमोजी : आधुनिक युगाची भाषा

देवनाथ गंडाटे
आपल्या भावना दुसऱ्याला सांगण्यासाठी संवाद महत्त्वाचा आहे. त्यासाठी बोलीभाषेचा वापर होतो. हाच संवाद लिखित स्वरूपात असेल तर लिपीची गरज भासते. मात्र, आनंद, दु:ख, उत्साह, प्रेम, क्रोध, घृणा यासारख्या भावना चेहऱ्यावरून मांडता येतात. या भावना प्रकट करण्यासाठी भाषेची गरज नाही. लिखित किंवा मौखिक भाषेऐवजी बॉडी लॅंग्वेज, इशारा, चित्र आणि चेहऱ्यावरून भावना व्यक्त करता येतात. स्मार्टफोनच्या दुनियेत हाच भाव इमोजीच्या रूपाने आला आहे. जी आजच्या तरुणाईला याड लावत असून, झिंगाट होऊन चॅटिंगमध्ये व्यस्त झाली आहे.
स्मार्टफोनमुळे थेट संवाद दुरावला असला तरी चॅटच्या माध्यमातून एकमेकांशी जुळून आहेत. अनोळखीशी मैत्रीसंबंध वाढून संवादाचा नवा मार्ग सुरू झालाय. आपल्या भावना पुढील व्यक्तीला व्यक्तही करू लागले. फोन कॉलपेक्षा मॅसेंजरवर बोलणं अधिक सोयीचे वाटत आहे. या माध्यमांचा वापर करून लिखित स्वरूपाचा संवाद सुरू झाला. फास्ट आणि साधे सोपे मॅसेंजर म्हणून व्हॉट्‌सऍप घराघरांत वापरला जातोय. यूजर्ससाठी नव्या इमोजी आल्यात. त्यामुळे चॅटिंग करताना मजा येते. शब्दांऐवजी चेहऱ्यावरील भावना व्यक्त करण्यासाठी इमोटीकॉन्स किंवा इमोजीचा वापर होत आहे. एखाद्याचा मॅसेज आला की त्यावर शब्दांनी प्रतिक्रिया द्यावी लागते. व्वा, किती छान! प्रतीम, सुरेख किंवा आवडला नसल्यास तशीही कमेंट केली जाते. त्याऐवजी आता चेहऱ्यावरील हावभाव सांगणाऱ्या इमोजीचा वापर होत आहे. यात हसणारा, रडणारा, रागाने लालपीला झालेला, विनोद करणारा, दात दाखविणारा, ताणतणाव सांगणाऱ्या इमोजी आहेत. इतकंच काय, तर ऑल दी बेस्ट, गुड जॉब, वेल डन, छान, मस्त, पटलंय हेदेखील इमोजीच सांगतो. यामुळे कंटाळवाणे वाटणारा चॅटिंग संवाद मजेशीर होत आहे. या इमोजीमुळे आधुनिक युगाची नवीन भाषाच जन्माला आली.
इमोजीचा इतिहास
जपानमधील मोबाईल फोन वापरणाऱ्यांनी 1999 मध्ये शब्दांतून संभाषण करताना काही चित्ररूप मेसेज पाठवण्यास सुरुवात केली. त्यातूनच चित्ररूप संभाषणाची पद्धत रूढ झाली. जपानमधील मोबाईल कंपनीतील अभियंत्यांनी त्यावर संशोधन सुरू केले. डोकोमो या कंपनीने सर्वप्रथम आयमोड नावाची सुविधा देऊन यूजर्सना भावना चित्रात व्यक्त करण्याची संधी उपलब्ध करून दिली. याचा उपयोग वेबसेवा, ई-मेल आणि मोबाईलवर उपलब्ध करून दिला.
इमोजीचे फायदे
व्यक्तिगत संभाषणात गुप्तता राहते. सुरक्षितपणे तुम्ही टाइप करू शकता. टाइप करताना शब्द नसल्याने चुका टळतात. तुमच्या भावना शब्दांऐवजी थेट इमोजीतून व्यक्त होतात. संवादातील इमोजी वापरामुळे पुढील व्यक्तीच्या चेहऱ्यावरच्या हावभावाची कल्पना येते आणि चॅटिंग अधिक रंजक होते.
फेसबुक
या सोशल मीडियावर एखाद्या मित्राच्या पोस्टवर लाइकसह अन्य भावना व्यक्त करण्यासाठी नव्या इमोजी आल्यात. त्याचा वापरही मोठ्या प्रमाणात होऊ लागला. लाइक बटणावर क्‍लिक करून होल्ड केल्यास “रिऍक्‍शन दाखविणाऱ्या इमोजी येतात. यात सहा प्रकारच्या नव्या इमोजी आहेत. लव्ह, हाहा, वाव, सॅड, आणि अँग्री अशी बटणे आहेत. याद्वारे एखाद्या पोस्टवर राग, प्रेम, आश्‍चर्य, दु:ख अशा भावना व्यक्त करता येतात.
व्हॉट्‌सऍप
थेट व्यक्तिगत आणि सांघिक संवादाचे माध्यम म्हणून व्हॉट्‌सऍपने क्रांती केली. यात अनेक मॅसेजच येतात. त्यातही इमोजीचा वापर करून संवादाला चित्रमय करता येते. अधिक शब्दात माहिती देण्याऐवजी इमोजीचा वापर करून सोप्या आणि सहज पद्धतीने व्यक्त होता येते. मित्रांना जर, मी गावाला जात आहे, हे सांगायचे असल्यास तो प्रवास साधनाच्या इमोजीतून व्यक्त होतो. किंवा एखादा मॅसेज वाचून खूप हसू आल्यास हसून हसून डोळ्यात पाणी आले, हे सांगणारंही इमोजी आहे. व्हॉट्‌सऍपमध्ये इमोजीचे आठ ऑप्शन दिले आहेत. यात एकूण दीड ते दोन हजारादरम्यान इमोजी आहेत. याच इमोजी फेसबुक मॅसेंजर ऍपवरही आहेत.
इमोजीचे प्रकार
1. हसणारे, रडणारे व्यक्तिचित्रे
2. प्राणी, पक्षी, वृक्ष, फुले, पर्यावरण
3. फळे, खाद्यपदार्थ, शीतपेय
4. क्रीडा, संगीत
5. वाहने, इमारती
6. चैनीच्या व शैक्षणिक वस्तू
7. हार्टस, सिम्बॉल, आकडे
8. विविध देशांतील राष्ट्रध्वज

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.