Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, सप्टेंबर १६, २०१५

आनंदवन 160 कोटींची उलाढालीचे आदर्श "स्मार्ट खेडे'!

डॉ. विकास आमटे यांना  नागभूषण पुरस्कार प्रदान

नागपूर-   एकेकाळी माझ्या आईने काढलेले गाईचे दूधही तुच्छ मानले जायचे, अशा कुष्ठरोग्यांच्या आनंदवनात आज वर्षाला दीड कोटी रुपयांच्या दुधाची विक्री होते. देशातील सर्वांत मोठा बायोगॅस प्रकल्प येथे आहे. याच ठिकाणी 139 उद्योग चालतात आणि 160 कोटींची उलाढाल वर्षाला होते. आनंदवन आज आदर्श "स्मार्ट खेडे' म्हणून उदयास आले, अशा भावना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. विकास आमटे यांनी व्यक्त केल्या.
नागभूषण फाउंडेशनच्या वतीने डॉ. विकास आमटे यांना आज नागभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. शंकरनगर येथील श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला केंद्रीय रासायनिक खते मंत्री हंसराज अहीर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. माजी खासदार दत्ता मेघे अध्यक्षस्थानी होते. यावेळी माजी न्यायमूर्ती व्ही. एस. सिरपूरकर, प्रसिद्ध उद्योजक प्रभाकरराव मुंडले, फाउंडेशनचे प्रमुख गिरीश गांधी यांची उपस्थिती होती.
विकास आमटे म्हणाले, आनंदवन स्वेच्छा तुरुंग आहे आणि तुरुंगाच्या जेलरला कधीही पुरस्कार मिळत नसतो. बाबांनादेखील पुरस्कार आवडायचे नाहीत. त्यांनी पद्मश्री आणि पद्मभूषणही परत केले. हा पुरस्कार नाकारणे देशद्रोह मानला जातो, म्हणून बाबा गेल्यावर त्यांना सोमनाथ चटर्जी वगळता कुणीही श्रद्धांजली अर्पण केली नाही. ते सामान्य नागरिक होते. पण, सामान्यांतील असामान्य व्यक्तिमत्त्वही होते. "आमटे भामटे' अशी अवहेलना करणारेच नंतरच्या काळात बाबांपुढे नतमस्तक झाले. पण, कुष्ठरोग्यांना जगण्याचा अधिकार देणारे बाबा आनंदवन ही जगातील सर्वांत वाईट जागा मानायचे. गावसकर, कपिल देव, सचिन यांची ओळख क्रिकेट आहे, तशीच बाबा आमटे यांची ओळख महारोग अशी झाली, अशी खंत बोलून दाखवतानाच त्यांच्या इतर कामांकडे कधीही कुणीच लक्ष दिले नाही, असेही ते म्हणाले. यासोबतच हा पुरस्कार आनंदवनासाठी अहोरात्र झटणाऱ्यांच्या वतीने स्वीकारत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
हंसराज अहीर यांनी आनंदवनातील प्रकल्प देशात राबविण्यासारखे असल्याचे म्हटले. सिरपूरकर म्हणाले, विकास आमटे हे बाबा आमटे यांचे प्रतिरूप आहे. हिमालयाची उंची गाठणाऱ्या बाबा आमटेंचा मुलगा होण्याचे सामर्थ्य विकास यांनी योग्य पद्धतीने पेलले आहे. दत्ता मेघे यांनी विकास आमटेंमुळे पुरस्काराचे महत्त्व वाढल्याचे सांगितले. यावेळी सुरेश शर्मा, डी. आर. मल, किशोर अग्रवाल, सत्यनारायण नुवाल यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. संचालन शुभदा फडणवीस यांनी केले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.