Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, ऑक्टोबर ३१, २०१७

एकतेची ज्योत अखंड तेवत राहो : महापौर नंदा जिचकार

‘रन फॉर युनिटी’ : नागपूरकरांनी दिला एकता आणि स्वच्छतेचा संदेश

नागपूर : जेव्हा जेव्हा या देशावर संकट आले त्याकाळात देशवासीयांनी ‘एकते’चे दर्शन घडविले. नागपूरकरांनी वेळोवेळी एकतेचा परिचय करून दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आज नागपूरकरांनी एकतेचे दर्शन घडविले. ‘रन फॉर युनिटी’च्या माध्यमातून नागपूरकरांनी दिलेला ‘स्वच्छ भारत’चा संदेश लाख मोलाचा असल्याचे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले.

दिवंगत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या वतीने ३१ ऑक्टोबर रोजी संविधान चौकातून ‘एकता दौड’चे आयोजन करण्यात आले होते. दौडच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर आ. सुधाकर कोहळे, आ. सुधाकर देशमुख, आ. मिलिंद माने, उपमहापौर दीपराज पार्डीकर, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, आयुक्त अश्विन मुदगल, माजी महापौर व ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके, प्रतोद दिव्या धुरडे, मनपाचे क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, स्थापत्य व प्रकल्प विशेष समिती सभापती संजय बंगाले, विधी समिती सभापती ॲड.मिनाक्षी तेलगोटे, दुर्बल घटक समितीचे सभापती महेंद्र धनविजय, धरमपेठ झोन सभापती रूपा रॉय, क्रीडा समितीचे उपसभापती प्रमोद तभाने, शिक्षण समितीचे सभापती प्रा. दिलीप दिवे, डॉ. उपेंद्र कोठेकर उपस्थित होते.

महापौर नंदा जिचकार पुढे म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. गरीबांच्या आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक योजना शासनाने केवळ घोषित केल्या नाहीत तर त्या अंमलात आणल्या. देशातील आणि राज्यातील शासनाचा कारभार गेल्या तीन वर्षात पारदर्शक राहिला आहे. पुढील काळात तो अधिक पारदर्शक राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशावर कुठलेही संकट आले तर या देशाचा नागरिक प्राणार्पण करायला तयार आहे. अशा या देशात नागरिकांच्या मनात एकतेची ज्योत सतत तेवत राहो, असे प्रतिपादन त्यांनी केले. गेल्या काही वर्षांत नागपूरकरांमध्ये त्यांच्या जबाबदारीविषयी जागृती झाली आहे. नागपूर स्वच्छ आणि सुंदर करण्यात नागपूरकरांचा वाटा मोठा आहे. त्यांच्याशिवाय ते शक्य नाही. ‘रन फॉर युनिटी’च्या माध्यमातून ‘एकते’सोबतच ‘स्वच्छते’चाही संदेश नागपूरकर देत असून भविष्यात या देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून नागपूरची ओळख होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तत्पूर्वी महापौर नंदा जिचकार यांनी घाटरोड चौकातील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. त्यानंतर संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले. कार्यक्रमस्थळी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. मार्गदर्शनानंतर दौडमध्ये सहभागी झालेल्यांना महापौर नंदा जिचकार यांनी ‘एकते’ची शपथ दिली. त्यानंतर ‘एकता दौड’ला त्यांनी हिरवी झेंडी दाखविली.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.