नवी दिल्ली - खनिजसंपदा, पर्यटन, कृषी, पायाभूत सुविधा याबाबत विदर्भाच्या क्षमतेकडे उद्योगविश्वाचे लक्ष वेधण्यासाठी ऍडव्हान्टेज विदर्भ-2013 परिषद होणार आहे. नागपूर येथे 25 आणि 26 फेब्रुवारीला होणाऱ्या या परिषदेत देशभरातील प्रमुख कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. त्यातून किमान 15 हजार कोटींची गुंतवणूक विदर्भात अपेक्षित आहे, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी आज येथे केले.
या परिषदेसाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री नारायण राणे, उद्योग राज्यमंत्री सचिन अहिर यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत. त्या शिवाय टाटा, महिंद्र, सिंघानिया, जिंदाल आदी उद्योगक्षेत्रातील बड्या कंपन्यांचे प्रतिनिधीही परिषदेला हजेरी लावणार आहेत, अशी माहिती मोघे यांनी दिली. तीन वर्षांपूर्वी नागपूर शहराच्या त्रिशताब्दी महोत्सवानिमित्त "ऍडव्हान्टेज विदर्भ' परिषद घेण्याची कल्पना राबविण्यास प्रारंभ झाला. चुनखडी, कोळसा, डोलामाईट यांसारख्या खनिज संपत्तीने समृद्ध असलेल्या विदर्भात उद्योगांसाठी पोषक वातावरण आहे. "मिहान' या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रकल्पासाठी भूमी अधिग्रहणाचे कामही 90 टक्के पूर्ण झाले आहे, असेही मोघे यांनी या वेळी सांगितले. विदर्भातील गोरेवाडा व्याघ्र प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. पांढरकवडा, भंडारा, गोंदिया या भागात आढळणाऱ्या पट्टेदार वाघांचे संरक्षण करण्यासाठी 1900 हेक्टर क्षेत्रातील प्रकल्पासाठी निविदा मागविण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.