Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, मार्च २५, २०२१

शत्रुच्या नजरेतून: छत्रपती संभाजी महाराज

 शत्रुच्या नजरेतून: छत्रपती संभाजी महाराज 


दि. २५ मार्च २०२१

फेसबुक लिंक http://bit.ly/3cjxiGC
स्वतः छत्रपती संभाजी महाराजांनी केलेल्या लिखाणातून त्यांच्या व्यक्तिमत्वाचे असंख्य पैलू आपल्यासमोर जसे उलगडतात त्याचप्रमाणे त्याकाळात त्यांनी अंगावर घेतलेले पोर्तुगीज, इंग्रज, मुघल इत्यादि शत्रू देखील महाराजांबद्द्ल नेमके काय लिहितात हे पाहिल्यास शंभूराजांची किती भीती या शत्रूंना वाटत होती याचे प्रत्यक्ष पुरावेच मिळतात.

शत्रुच्या नजरेतून: छत्रपती संभाजी महाराज

बलाढ्य आरमार असलेल्या पोर्तुगीजांवर शंभूराजांनी गोव्यात शिरून आक्रमण केले. या मोहिमेत स्वतः महाराज आघाडीवर लढत होते.

त्यांनी पोर्तुगीजाना इतका चोप दिला की पोर्तुगीज विजरईफ्रान्सिस्को द ताव्होर कोंद दे अल्व्होर याने २४ नोव्हेंबर १९८३ रोजी खानदानी पोर्तुगीज, पाद्री आणि अधिकारी यांची सभा बोलवली. या सभेत तो म्हणतो;
“चौलचा वेढा शत्रूने आवळला आहे. आता तर तो गोव्यात शिरला आहे. त्याने सगळीकडे लुटालूट आणि जाळपोळ सुरु केली आहे. अगदी चर्चेसनादेखील त्याने यातून सोडलेले नाही….” (मराठ्यांच्या इतिहासाची साधने: खंड तिसरा; लेखक:ए.बी.डी.ब्रागांस परेरा; गोवा पुरातत्व विभाग प्रमुख १९४०)
अवघ्या महिन्याभरातच जवळपास ३/४ गोवा काबीज करत शंभूराजे आणि मराठा सैन्याने इतकी धामधूम केली होती की; पोर्तुगीजांना चर्चमधले पाद्री आणि आपल्या कैदेतले गुन्हेगार सोडून त्यांनाही लढायला पाठवावे लागले होते असे समकालीन संदर्भ सांगतात. विशेष म्हणजे या मोहिमेनंतर पोर्तुगीजांना इतकी जरब बसली की; त्यांनी ‘छत्रपती संभाजी महाराज’ असा संपूर्ण बिरुदांसह पत्रांत उल्लेख करायला सुरुवात केली. यापूर्वी ते ‘संभाजीराजे’ असा उल्लेख करीत. हा बदल म्हणजे शंभूछत्रपतींच्या जरबेची साक्षचनव्हे काय!अशीच जरब स्वतः औरंगजेबलादेखील बसली होती.
“संभाजीला ठार वा कैद केल्याशिवाय डोक्यावर किमांश धारण करणार नाही आणि तलवार हातात उचलणार नाहीं असा पण त्याने केला आहे.”  असे कारवारकर इंग्रजांनीआपल्या पत्रात नमूद केले होते. (हिस्ट्री ऑफ औरंगजेब; लेखक: जदुनाथ सरकार)
फार कशाला?‘तारीख-ए-खाफीखान’ या आपल्या ग्रंथात महमद हशीम खाफीखान हा शंभूराजेंना ‘आपल्या वडिलांपेक्षाही दस पटीने अधिक तापदायक’ असे म्हणतो.खाफीखानाने तर अनेक ठिकाणी महाराजांचा उल्लेख ‘नरकवासी’ या विशेषणाने केला आहे. हे विशेषण मुघलांच्या वैफल्यातून आलेले आहे हे अर्थातच सांगायला नको. थोड्क्यात; हे संदर्भदेखील शंभूराजांच्या समशेरीच्या धाकाचे पुरावेच आहेत.स्वाभिमानाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे हे सुपुत्र. अत्यंत क्रूरतेने त्यांची हत्या औरंगजेबने केली. त्याच्यासाठी अशा हत्यांत नाविन्यपूर्ण असे काहीच नव्हते म्हणा! आपला भाऊ दारा शिकोह व शीखांचे नववे गुरु तेगबहादूरजी यांना तसेच त्यांच्या तीन शिष्यांनाही औरंगजेबने असेच निर्घृणपणे मारले होते.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबच्या दरबारात उभे केल्यावरही ते मुळीच झुकले नाहीत.या घटनेचा औरंगजेबाच्या दरबारी असलेला आणि या प्रसंगाचा प्रत्यक्ष साक्षीदार असलेला ईश्वरदास नागर म्हणतो;‘…….पण संभाजी हा गर्विष्ठ होता. त्याची अशी अवस्था झाली तरी त्याने बादशहाला ताजीम देण्यासाठी म्हणून यत्किंचितही मान लवविली नाही. इखलास खान आणि हमिदुद्दिन खान यांनी त्याला पुष्कळ समजावले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. बादशाहने आज्ञा केली की सिकंदरखानाच्या तंबूजवळ एक जागा ठरवून संभाजीला अशाच स्थितीत ठेवण्यात यावे. कवी कलश आणि त्याचे साथीदार यांच्यावर कडक नजर ठेवण्यात यावी. त्यांच्यापायात बेड्या ठोकण्यात याव्या. यानंतर दोन दिवसांनी बादशहाने रुहुल्लाखन यास खालील प्रमाणे आज्ञा केली.
“तुम्ही जाउन संभाजीपाशी चौकशी करावी की तुझे खजिने, जडजवाहीर आणि इतर संपत्ती कुठे आहे?? तसेच बादशाही सरदारांपैकी कोण कोण तुझ्याशी पत्रव्यवहार करून संबंध ठेवीत होते.”
पण माणसाची जीविताची आशा सुटली कीतो मनात येईल ते बडबडत सुटतो. संभाजी हा गर्विष्ठ होता. त्याने बादशहा संबंधी घाणेरडे शब्द उच्चारले आणि त्यांची निंदानालस्ती केली. त्याने जे काही म्हटले ते रुहुल्लाखानाने बादशहाला सांगितले नाही. पण ते बोलणे कशाप्रकारचे होते याचा त्याने बादशाहाला इशारा दिला. यावर बादशाहने आज्ञा केली की, संभाजीच्या डोळ्यात सळई फिरवून त्याला ‘नवी दृष्टी’ द्यावी. (गरम लोखंडी सळईने डोळे फोडण्यात यावे.) त्याप्रमाणे करण्यात आले.
पण संभाजी गर्विष्ठ आणि स्वाभिमानी होता. त्याने त्या दिवसापासून जेवणखाण सोडले. त्याच्या पहारेक-यांनी त्याला अन्नसेवन करण्याबद्दल पुष्कळ सांगितले. पण त्याचा काही उपयोग झाला नाही.त्याला काही उपास घडले. शेवटी ही बातमी बादशाहाला कळवण्यात आली. संभाजीचे दिवस भरले होते. बादशाहाच्या आज्ञेनेत्याला वधस्तंभाकडे नेण्यात आले…….’
(फुतुहात-ए-आलमगिरी लेखक: ईश्वरदास नागर, अनुवाद: सेतुमाधवराव पगडी)

अन्य एक प्रत्यक्ष साक्षीदार असलेला साकी मुस्तैदखान यानेही ‘मासीर-ई-आलमगिरी’ या आपल्या ग्रंथात असेच वर्णन केले आहे. काझींनी काढलेला आणि उमरावांनी मंजूर केलेला मृत्यूच्या फतव्याची औरंगजेबने अंमलबजावणी केली असेही तो नमूद करतो. इतकेच नाही तर शंभूराजे आणि कवी कलश यांच्या शवांची जी विटंबना करण्यात आली त्याबद्दलही याच प्रत्यक्षदर्शींनी केलेले वर्णनवाचून अंगावर काटा येतो. फाल्गुन अमावस्येला हैन्दव स्वराज्याच्या (हा शब्दही शंभूराजांनीच नमूद केला आहे.)
गनिमांच्या देखता फ़ौजा। रणशूरांच्या फ़ुर्फ़ुरती भुजा।ऐसा पाहिजे की राजा । कैपक्षी परमार्थी ॥
राजा कसा असावा? याचे उत्तर देताना समर्थ रामदास स्वामी वरीलप्रमाणे वर्णन करतात. शत्रूला पाहताच ज्याचे बाहू स्फुरण पावतात असा राजा असावा. छत्रपती संभाजी महाराज हे असेच समरधुरंधर राजे होते.  उपलब्ध असलेले सर्व समकालीन कागदोपत्रीचे पुरावे सर्व बाजूंनी अभ्यासून मगच इतिहासाची मांडणी होवू शकते. त्यातही दोन्हीबाजूंचे असे पुरावे अभ्यासल्यास चित्र अधिक स्पष्ट होत जाते.
दुसऱ्या छत्रपतींची नृशंस हत्या केली गेली. मात्र यानंतरही शिवप्रभूंचे हे स्वराज्य झुंजत राहिले. छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर राखेतून भरारी घेणाऱ्या फिनिक्स पक्षाप्रमाणे महाराष्ट्र लढला. अखेरीस दक्खन मुठीत काबीज करण्याची स्वप्ने पाहणाऱ्या औरंगजेबला याच महाराष्ट्राच्या मातीत मूठमाती घ्यावी लागली. नियतीचे खेळ असेच असतात!!
____________________________
ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
🥇माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
______________________________


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.