नागपुर:
सध्या स्थितीत राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असतांना राज्य शासनाने खाजगी क्षेत्रातील कंपन्या व व्यावसायिक आस्थापनांना घरूनच काम करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यामुळे या संक्रमणाच्या काळात महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अखंडित वीज पुरवठा होईल यासाठी तसेच कोव्हीड -१९ या विषाणूंचा संसर्ग टाळण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी आवश्यक ती पूर्ण खबरदारी घ्यावी .असे निर्देश नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता (प्रभारी )दिलीप दोडके यांनी दिले
आहे. कर्मचाऱ्यांनी वीजबिल वसुली मोहिमेत मास्क किंवा रुमालाचा वापर करावा, तसेच सर्व कार्यालयप्रमुखांनी कामाच्या ठिकाणी हँडवॉश तसेच सॅनिटायझर उपलब्ध करून द्यावे, असेही निर्देश मुख्य अभियंत्यांनी दिले आहेत.
कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने या काळात घाबरून न जाता महावितरण प्रशासन ,शासन तसेच आरोग्य विभागाने दिलेल्या निर्देशाचे महावितरण नागपूर परिमंडळातील प्रत्येक कर्मचाऱ्यांनी काटेकोर पालन करून आपले सामाजिक दायित्व पार पाडल्यास कोरोनाचा संभावित प्रादुर्भाव थांबविण्यास मोठी मदत मिळणार आहे.
या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूंचा संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी म्हणून महावितरणमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काळजी घ्यावी व प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, यामध्ये वीजबिल वसुली मोहिमेवर असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तोंडावर रुमाल अथवा मास्क लावावा. महावितरणच्या जनमित्रांनी देशांतर्गत तसेच परदेश प्रवास केलेल्या व्यक्तींशी संपर्कात येताना योग्य ती काळजी घ्यावी.
वेळोवेळी आपले हात साबण व पाणी वापरून स्वच्छ धुवावे व स्वतःस तसेच इतरांना सुरक्षित ठेवावे. शिंकताना वा खोकताना आपल्या नाकावर व तोंडावर रुमाल धरावा अथवा मास्कचा वापर करावा. श्वसनसंस्थेचे विकार असणाऱ्या व्यक्त्तींशी संपर्क ठेवताना संसर्ग न होण्याची काळजी घ्यावी. सोशल मीडियावर कोरोना संदर्भात अर्धवट माहिती असणारे, चुकीचे व भीती उत्पन्न करणारे संदेश प्रसारित करू नयेत. योग्य वेळीच प्रथमोपचारासाठी वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे निर्देश नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता (प्रभारी) दिलीप दोडके यांनी केले आहे.
विजेसंदर्भात ग्राहकांना काही तक्रार असल्यास महावितरणच्या १८००२३३३४३५, १८००१०२३४३५ या टोल फ्री क्रमांकावर आपली तक्रार करू शकतात. मोबाईल अँपच्या माध्यमातून देखील वीज ग्राहक आपली तक्रार नोंदवू शकतात