Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, जुलै ०३, २०२३

आवळे जयंतीनिमित्त परिसंवादात वक्त्यांनी व्यक्त केल्या भावना

कर्मवीर हरिदास आवळे हे आंबेडकरी चळवळीचे खरे ध्वजवाहक




नागपूर:- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा सर्व उपेक्षित घटकांपर्यंत पोहचवून त्यांना आंबेडकरांनी उभारलेल्या राजकीय व सामाजिक लढ्यात सामील करण्यासाठी जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत झटणारे बाबू आवळे हे आंबेडकरी चळवळीचे खरे ध्वजवाहक होते, असा एकमुखी सूर बाबू आवळे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित परिसंवादात सर्व वक्त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला.


कर्मवीर हरिदास आवळे बाबू प्रतिष्ठान नागपूरच्या वतीने बाबू हरिदास आवळे यांच्या १०८ व्या जयंतीनिमित्त 'डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत कर्मवीर बाबू हरिदास आवळे यांचे योगदान' या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी कर्मवीर हरिदास आवळे बाबू प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनायकराव जामगडे होते .


प्रस्तुत परिसंवादात सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त डॉ प्रशांत नारनवरे, ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रा. रणजीत मेश्राम, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. पुरणचंद्र मेश्राम, प्रबोधनकार अनिरुद्ध शेवाळे यांनी आपले विचार व्यक्त केले.


प्रस्तुत कार्यक्रमात कर्मवीर बाबू हरिदास आवळे यांचे चिरंजीव ॲड. मानवेंद्र आवळे, कन्या जशीला आवळे, जावई इंजि. सुविचार मेश्राम यांचा डॉ. प्रशांत नारनवरे व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तसेच या प्रसंगी विनायकराव जामगडे लिखित 'दीक्षाभूमीचा अज्ञात इतिहास व कर्मवीर हरिदास आवळे यांचे योगदान' हया पुस्तकाचे तसेच डॉ.संविता चिवंडे संपादित 'भारतीय समाजसुधारणेच्या चळवळीत महिलांचे योगदान' या पुस्तकाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे व मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले.


कर्मवीर बाबू आवळे यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकताना डॉ प्रशांत नारनवरे पुढे म्हणाले, आवळे बाबू यांनी दलित, शोषित, पीडित ,बिडी कामगार, शेतमजूर भूमिहीन यांच्या उत्थानासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला राहिले. त्याचे कार्य व योगदान अतुलनीय आणि अनुकरणीय आहे. आंबेडकरी चळवळीतील अशा देदीप्यमान नायकांना नव्या पिढीसमोर उजागर करणे काळाची गरज आहे, असेही ते म्हणाले. प्रा. रणजीत मेश्राम म्हणाले की, आवळेसारखे निष्ठावंत व समर्पित सहकारी डॉ. आंबेडकरांच्या पाठीशी असल्याने मानवमुक्तीचा सर्वंकष लढा बाबासाहेब यशस्वीपणे लढू शकले.आंबेडकरी समाजापुढील नव्या आव्हानांना मुकाबला करण्यासाठी नव्या पिढीने आवळे बाबू यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून युद्धसज्ज होणे ही काळाची गरज आहे. या प्रसंगी डॉ. पुरणचंद्र मेश्राम म्हणाले, आवळे यांनी केवळ दलित उत्थानासाठी कार्य केले नसून बिडी कामगार, भूमिहीन शेतकरी व सतनामी समाजाच्या प्रश्नांसाठी त्यानी निर्णायक लढा दिला. तसेच स्वतंत्र विदर्भाच्या आंदोलनाचे ते अग्रणी नेते होते . त्यामुळे बाबू आवळे यांना विशिष्ट समाजात बंदिस्त न करता लोकनेते म्हणून त्यांचे नेतृत्व लोकांपुढे आणणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.


डॉ. सिद्धार्थ गायकवाड म्हणाले की, आवळे बाबू यांनी केलेले रचनात्मक कार्य  लोकांपुढे आणण्यासाठी उत्तर नागपुरात त्यांच्या नावाने शासनाद्वारे सांस्कृतिक केंद्र उभारण्यात आले असून  या केंद्राची जबाबदारी आवळे प्रतिष्ठानावर सोपविण्याची कार्यवाही शासनस्तरावर सुरू  असून शासन व आवळे प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने चळवळीतील महापुरुषांचा इतिहास लोकांपर्यंत पोहचवून नव्या पिढीमध्ये नवचैतन्य व उर्जा निर्माण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.अनिरुद्ध शेवाळे यांनी आवळे बाबू यांच्या कौटुंबिक व सामाजिक कार्याविषयी विचार व्यक्त केले.  अध्यक्षीय भाषणातून विनायकराव जामगडे यांनी कर्मवीर  बाबू आवळे यांच्या कार्य आणि कर्तृत्वाचा सविस्तर माहितीपट श्रोत्यांपुढे मांडला. आंबेडकरी चळवळीसाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या  बाबासाहेबांच्या सहकाऱ्याचे संघर्षमय चरित्र नव्या पिढीपुढे आणण्याचे  कार्य बाबू आवळे प्रतिष्ठानच्या माध्यमातून १९७२ पासून अविरतपणे कसे सुरू आहे याचा ऊहापोह त्यांनी केला. या ऐतिहासिक कार्यात सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आवळे प्रतिष्ठानचे सहसचिव दादा अंबादे यांनी केले, संचालन प्रा. डॉ.राष्ट्रपाल मेश्राम यांनी केले तर आभार प्रतिष्ठानचे सदस्य हरीश जानोरकर यांनी मानले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.