नागपूर/प्रतिनिधी:
मध्य प्रदेश राज्याच्या सीमेजवळ असलेल्या टेकाडी गावातील नादुरुस्त रोहित्र महावितरणच्या जनमित्रांनी जागच्या जागी दुरुस्त करून गावाचा पाणी पुरवठा योजनेचा आणि ८० वीज ग्राहकांचा वीज पुरवठा मंगळवारी दुपारी सुरळीत केला.
देशात सर्वत्र कोरोना विषाणूंमुळे बंद असताना महावितरणच्या जनमित्रांनी उपलब्ध संसाधनांचा वापर करून वीजपुरवठा सुरळीत केला.
सोमवार, दिनांक ३० रोजी रात्री वीज पुरवठा खंडित झाला अशी तक्रार महावितरणच्या बडेगाव शाखा कार्यालयास मिळाली.आज सकाळी शाखा कार्यालयातील कनिष्ठ अभियंता निलेश बांगडकर यांनी पाहणी केली असता रोहित्र नादुरुस्त असल्याचे आढळून आले.महावितरणच्या खापा उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता गजानन डाबरे यांनी रोहित्र दुरुस्त करण्यासाठी आवश्यक सामानाची जमवाजमव करून दिली.
दोन चाकी वाहनांनी हे सामान घेउन कनिष्ठ अभियंता निलेश बांगडकर, विनोद राठोड, विकास नरवरे हे घटनास्थळी पोहोचले.वीज खांबावर चढून रोहित्र दुरुस्त केला.दुपारी दोन वाजताच्या सुमारास टेकाडी येथील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.