चंद्रपूर/प्रतिनिधी:
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र संचारबंदी असली तरीही महावितरणचे कर्मचारी मात्र नेहमीप्रमाणे दिवसरात्र ग्राहकसेवेत सज्ज असून शनिवारी रात्रभर जागून कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा पूर्ववत सुरू केला.
शनिवारी रात्री जोरदार वाऱ्यामुळे चंद्रपूरच्या काही भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता.यावेळी या बिघडाचा शोध घेत असताना जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थाना जवळील आकाशवाणी चौकात 11 कि.व्हो वहिनीवर झाडाची फांदी कोसळल्याने वीज पुरवठा विस्कळित झाल्याचे महावितरण कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले.हा बिघाड दुरुस्त करण्यास विलंब लागणार असल्याने दुसऱ्या वाहिनीवरून तात्काळ वीज पुरवठा सुरू करण्यात आला.
त्यानंतर मध्यरात्री 1 वाजेपर्यंत काम करून वीज वाहिनी दुरुस्त करण्यात आली व वीज पुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला.रामनगर उपविभागाचे सहायक अभियंता सचिन कापसे आणि त्यांचे सहकारी गुरुबहादूर सिंग,सीताराम करकाडे,अमोल पारखी
व प्रमोद येरगुडे यांनी हे काम केले.सर्वत्र संचारबंदी असतानाही महावितरणचे कर्मचारी दिवस-रात्र सेवा बजावत असल्यामुळेच लोकांना घरी राहणे सुकर होत आहे.