Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, एप्रिल १७, २०२३

व्हॉईस ऑफ मीडिया म्हणजे देशभरातील पत्रकारांचा आवाज Voice OF Media Nagpur

नागपुरात आयोजित विदर्भ विभागीय अधिवेशनात मान्यवरांचे मनोगत

नागपूर  : पत्रकारांची देशभरातील संघटना म्हणून व्हॉईल ऑफ मीडिया काम करीत आहे. ही संघटना म्हणजे देशभरातील पत्रकारांचा बुलंद आवाज ठरेल असे विचार विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केले. निमित्त होते व्हॉईस ऑफ मीडियाच्या विदर्भ विभागीय अधिवेशनाचे.

व्हॉईस ऑफ मीडिया म्हणजे देशभरातील पत्रकारांचा आवाज Voice OF Media Nagpur


नागपुरातील किंग्जवे हॉस्पिटल परिसरात असलेल्या सभागृहात हे अधिवेशन पार पडले. उद‌घाटन सत्राला राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा माजी खासदार हंसराज अहीर, व्हॉईस ऑफ मीडियाचे केंद्रीय कार्याध्यक्ष संजय आवटे, शेतकरी नेते रविकांत तुपकर, संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, भीमेश मुतुल्ला, दिव्या भोसले-पाटील, विनोद बोरे, चेतन बंडेवार, प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, मंगेश खाटीक आदी मान्यवर उपस्थित होते.  (Voice OF Media Nagpur)


मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी पत्रकार हे राष्ट्रहिताचे कार्य करीत असल्याचे नमूद केले. कोणतेही सरकार असो आजही लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाचा त्याला धाक आहे असे ते म्हणाले. पत्रकारांनी नेहमीच देशाची प्रतिमा उंचावण्याचे कार्य केले आहे. त्यामुळे आपण त्यांच्या खांद्याला खादा लाऊन त्यांच्या कल्याणसाठी असलेल्या योजनांसाठी प्रयत्न करू असेही अहिर यांनी नमूद केले. Voice OF Media Nagpur


यावेळी आवटे म्हणाले की, संदीप काळे यांनी पाहिलेल्या स्वप्नाचा पाठपुरावा केला. ते स्वप्न साकार होत असल्याचा पुरावा म्हणजे विदर्भस्तरीय अधिवेशन आहे. पत्रकारांनी देखील परस्परांशी संवाद वाढविला पाहिजे. एकमेकांप्रती असलेली करुणा ही व्हॉईल ऑफ मीडियाची जमेची बाजू असल्याचे ते म्हणाले.


मंगेश खाटीक यांनी विदर्भासह २८ राज्यांमध्ये पोहोचलेल्या व्हॉईस ऑफ मीडियाच्या कार्याचा आढावा सादर केला. पत्रकारांच्या हितासाठी व्हॉईस ऑफ मीडिया पंचसूत्रीवर काम करीत असल्याचे त्यांनी नमूद केले. अनिल म्हस्के यांनी दीड वर्षांपूर्वी लावलेल्या रोपट्याचा आता वृक्ष बहरत असल्याचे नमूद केले. पत्रकारांसाठी कल्याणकारी महामंडळ लवकरच स्थापन होण्याच्या मार्गावर आहे. पत्रकारांना सर्वदृष्टीने सक्षम करण्यासाठी काम करायचे आहे असे त्यांनी सांगितले. सत्तेत वाटा मिळाल्याशिवाय पत्रकारांच्या समस्या सुटणार नाहीत. त्यामुळे विधान परिषदेत पत्रकारांचा प्रत्येक विभागातून एक प्रतिनिधी असावा अशी मागणीही म्हस्के यांनी केली.

भीमेश मुतुल्ला यांनी पत्रकारांसाठी राबविण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधा, आरोग्य विषयक उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. दिव्या भोसले यांनी व्हॉईस ऑफ मीडियाच्या राष्ट्रीय पातळीवरील कामाचा आढावा सादर केला. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पत्रकारांच्या हितासाठी जो लढा दिला जाईल त्यात आपण नेहमी सोबत असू , असे आश्वासन दिले.  Voice OF Media Nagpur


अध्यक्षीय भाषणात संदीप काळे यांनी अधिवेशन हे विचार संमेलन व्हावे, असे सांगितले. दहा वर्षाचे काम दीड वर्षात पूर्ण होताना दिसत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. पत्रकार आणि पत्रकारिता ही बदलत चालली आहे. त्यामुळे पत्रकारांनी त्यादृष्टीने स्वत:ला ‘अपडेट’ ठेवणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. पत्रकारांमध्ये सुरक्षेचे वातावरण निर्माण करण्याचे कार्य व्हॉईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून करायचे आहे, असा ठाम निर्धार संदीप काळे यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागपूर जिल्हाध्यक्ष आनंद आंबेकर यांनी केले. शहराध्यक्ष फहीम खान यांनी उपस्थितांचे आभार मानले. 



पत्रकारांचा गौरव

पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समर्पित संपादक, ज्येठ पत्रकारांचा यावेळी सत्कार करण्यात आला. श्रीकृष्ण चांडक, प्रकाश कथले, श्रीधर बलकी, अनिल पळसकर, वसंत खेडेकर, बाबुराव परसावार, रामभाऊ नागपुरे, श्यामराव बारई, विजय केंदरकर, सूजय पाटील, विश्वंभर वाघमारे, रमेश दुरुगकर, भाऊराव रामटेके यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने आयोजित अधिवेशनात विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यातून सदस्य सहभागी झाले होते. यावेळी सर्व जिल्हाध्यक्ष आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

गर्जा महाराष्ट्र माझाने वेधले लक्ष

100 हौशी कलावंत एकत्रित येऊन महाराष्ट्राभिमान जागविणाऱ्या 'गर्जा महाराष्ट्र माझा' या कार्यक्रमाची निर्मिती स्पार्क जनविकास फाऊंडेशनने केली होती. महाराष्ट्र संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या या कार्यक्रमाने उपस्थिताचे लक्ष वेधले.


सहभागीनी घेतली शपथ 

व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने नागपुरात आयोजित विभागीय अधिवेशनात विदर्भभरातून सहभागी झालेल्या पत्रकार, सदस्य, केंद्रीय पदाधिकाऱ्यांना शपथ देण्यात आली. ही शपथ देताना ज्येष्ठ संपादक श्रीकृष्ण चांडक, ख्यातनाम कवी लोकनाथ यशवंत, ज्येष्ठ पत्रकार रामभाऊजी नागपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आली. 


पत्रकारांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक  किट 

व्हॉईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून पत्रकारांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक मदत सेवा सुरू करण्यात आली आहे. कोरोणा काळात मृत्यू पावलेल्या पत्रकारांच्या पाल्यांना राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या हस्ते शैक्षणिक किट वितरित  करण्यात आली. 


ज्येष्ठ संपादक श्रीकृष्ण चांडक यांची केंद्रीय कार्यकारिणीत नियुक्ती 

व्हॉईस ऑफ मीडियाचे अध्यक्ष संदीप काळे यांनी यावेळी श्रीकृष्ण चांडक यांच्या नावाची घोषणा केंद्रीय सल्लागार संचालकपदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा केली. सुनिल कुहीकर राज्यसंघटकपदी नियुक्त करण्यात आलेत. नागपूरचे जिल्हाध्यक्ष आनंद आंबेकर यांच्यावर कार्यवाहक पदाची जबाबदारीही सोपविण्यात आली.


प्रत्येक माध्यमासमोरील आव्हाने वेगवेगळी

व्हॉईस ऑफ मीडियाच्या विदर्भस्तरीय अधिवेशनातील परिसंवादातील सूर

Voice OF Media Nagpur

नागपूर :  प्रत्येक माध्यमांच्या गरजा आणि समस्या वेगवेगळ्या आहेत. त्या गरजा, समस्या आणि आव्हाने ओळखत त्यावर मात करता आली पाहिजे, असा सूर व्हॉईस ऑफ मीडियाच्या विदर्भस्तरीय अधिवेशनातील परिसंवादात उमटला. 


"बदलती पत्रकारिता आणि आव्हाने" या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे होते. यावेळी लोकसत्ताचे संपादक देवेंद्र गावंडे, महासागरचे संचालक, संपादक श्रीकृष्ण चांडक, ज्येष्ठ संपादक सुनिल कुहीकर, लोकशाहीचे संपादक श्रीधर बलकी सहभागी झाले. 


यावेळी बोलताना गावंडे म्हणाले की, आज पत्रकारांजवळ उपलब्ध असलेल्या माध्यमांपेक्षा अनेक अनिर्बंध माध्यमे लोकांजवळ आहेत. पत्रकारांसाठी देखील आचारसंहिता असणे गरजेचे आहे. पत्रकारांबद्दल विश्वासार्हता अधिक दृढ झाली पाहिजे. ‘वेबपोर्टल’ पत्रकारितेच्या युगात ही विश्वासार्हता अधिक गरजेची आहे, कारण ‘वनमॅन शो’ पत्रकारितेत धैर्य आणि विश्वासार्हता गरजेची आहे.


श्रीकृष्ण चांडक म्हणाले, पत्रकारितेचा काळ बदलत आहे. अग्रलेखांचा आकारही आता कमी झाला आहे. लिखित माध्यमांपेक्षा व्हिडीओ माध्यमांचे चलन वाढले आहे. त्यामुळे पत्रकारितेचे स्वरूपही बदलत आहे. साखळी वृत्तपत्रांच्या समस्या अधिक गंभीर आहेत. त्यांच्यापुढे पत्रकारांचे वेतन, जाहिरातीचा महसूल, टिकाव आणि वाढत चाललेला खर्च अशा समस्या आहेत.  Voice OF Media Nagpur


सुनिल कुहीकर म्हणाले, लेखणीची ताकद जबरदस्त आहे. २४० वर्षांच्या पत्रकारितेच्या इतिहासात पाहता पत्रकारांची स्थिती आजही जेमतेम आहे. वर्तमानपत्र पूर्वी सामाजिक चळवळीची माध्यमे होती. आता हे क्षेत्र देखील व्यावसायिक झाले आहे. परकीय गुंतवणूक सुरू झाल्यापासून तर हा व्यवसाय अधिक जोमात झाला आहे. पत्रकारांची आधुनिक युगानुसार ‘टेक्नॉलॉजी आणि टेक्निक्स’ याबाबतीत स्वत:त बदल घडवावे, असे ते म्हणाले. Voice OF Media Nagpur


समारोपीय भाषणात पांडे म्हणाले, पत्रकारांना विशेषाधिकार असा नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येक नागरिकांना आहे. त्यामुळे सिटीजन जर्नालिझम ही बाब अधोरेखित होते. पत्रकाराच्या बातमीत दम असेल तर त्याने कुणालाही घाबरू नये. आजच्या नव्या पिढीला ‘बातमी’ पेक्षा ‘मनोरंजन’या क्षेत्रात जास्त रस आहे. त्यामुळे हा वर्ग टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान पत्रकारीतेपुढे आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.