Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, नोव्हेंबर २७, २०१७

विधिमंडळातील बहुतांश भाषणे दिशाहीन - नितीन गडकरी

नागपूर : संसद, विधिमंडळातील भाषणे ही अभ्यासपूर्ण व ऐकण्यासारखी असतात, असा माझा समज होता. मात्र प्रत्यक्ष या दोन्ही ठिकाणी काम केल्यानंतर येथील बहुतांश भाषणे दिशाहीनच असल्याचे दिसून आले आहे. अनेक सदस्य तर विषय सोडूनच बोलताना दिसून येतात. अनेक भाषणे तर अजिबात ऐकण्यासारखी नसतात, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. अरुणाचल प्रदेशचे माजी राज्यपाल राम प्रधान यांचे ‘माझी वाटचाल’ या आत्मचरित्राचे गडकरी यांच्या हस्ते रविवारी प्रकाशन झाले. यावेळी ते बोलत होते.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या विभागीय केंद्रातर्फे शंकरनगर येथील राष्ट्रभाषा संकुलातील बाबूराव धनवटे सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मंत्री दत्ता मेघे, साहित्यिक डॉ.वि.स.जोग, प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरीश गांधी, प्रेम लुनावत प्रामुख्याने उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षांपासून राजकारण अनुभवतो आहे. या क्षेत्रात अनेक लोक सत्तेशिवाय राहूच शकत नाहीत. समाजाशी त्यांना काहीही देणे घेणे नसते. केवळ आत्मकेंद्री मनोवृत्ती असते. आपल्या राज्यातील नेत्यांमध्ये राजकीय मतभेद असले तरी राजकारणापलीकडे जाऊन ते मैत्री जपतात. मात्र तामिळनाडू, उत्तर प्रदेशमध्ये तर सौहार्द शोधूनदेखील सापडत नाही. विरोधकांशी वागण्याची पद्धत हुकूमशाही नको, असे प्रतिपादन यावेळी नितीन गडकरी यांनी केले.

डॉ.वि.स.जोग यांनी यावेळी राम प्रधान यांच्या आत्मचरित्राचे संक्षिप्त विवेचन मांडले. देशातील महत्त्वाच्या नेत्यांसोबत काम करत असताना प्रधान यांनी स्वत्व जपले व ते समर्पकपणे शब्दबद्ध केले, असे जोग म्हणाले. राम प्रधान यांनीदेखील पुस्तकावर भाष्य केले. गिरीश गांधी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.