Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, ऑगस्ट १२, २०२३

विजया बोरकर बनल्या महानिर्मितीच्या प्रथम महिला मुख्य अभियंता

नागपूर:  विदर्भातील यवतमाळ जिल्ह्याच्या रहिवाशी असलेल्या विजया रवींद्र बोरकर यांची महानिर्मितीच्या मुख्य अभियंता पदी निवड झाली असून महानिर्मितीमध्ये मुख्य अभियंता पदी महिला विराजमान होण्याची ही प्रथमच वेळ आहे. यापूर्वी उप मुख्य अभियंता या पदापर्यंत महिला अधिकाऱ्यानी काम केले आहे मात्र आता हा बहुमान प्रथमच विजया रवींद्र बोरकर यांनी पटकावला आहे. मुख्यालय मुंबई येथे मुख्य अभियंता(प्रकल्प व्यवस्थापन गट) येथे त्यांची पदस्थापना झाली आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

विजया बोरकर यांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती येथून बी.ई.(इलेक्ट्रिकल्स) परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर नागपूर विद्यापीठातून ऊर्जा व्यवस्थापन प्रणालीत एम.टेक. परीक्षेत गुणवत्ता यादीत द्वितीय क्रमांक पटकावला.

तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात सन १९९३ मध्ये कनिष्ठ अभियंता या पदी रुजू झाल्यानंतर कधी थेट भरतीद्वारे तर कधी पदोन्नतीवर महानिर्मिती कंपनीत विविध पदे भूषवित कोराडी आणि चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात त्यांनी विद्युत परिरक्षण, चाचणी, उपकरण व नियंत्रण विभागात विशेषतः वसाहत, २१० मेगावाट, ५०० मेगावाट येथे काम केले. वीज उत्पादन क्षेत्रातील संचलन व सुव्यवस्था विषयक तांत्रिक कामांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. मागील सुमारे दोन वर्षांपासून चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात उप मुख्य अभियंता २१० मेगावाट या पदाची धुरा त्यांनी यशस्वी सांभाळली आहे.

वीज क्षेत्रातील अग्रगण्य अश्या महानिर्मिती कंपनीमध्ये काम करीत असल्याचा त्यांना सार्थ अभिमान असून दररोज नवनवीन गोष्टी शिकायला मिळत असल्याने महानिर्मिती हे ज्ञानाचे विद्यापीठ असल्याचे विजया बोरकर यांनी सांगितले. त्यांना गायनाची आणि वाचनाची विलक्षण आवड आहे.

महिलांमध्ये काम करण्याची प्रचंड क्षमता आहे. सातत्य कधीही सोडू नका, कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा, सहकारी पुरुष कर्मचाऱ्यांपासून स्वत:ला वेगळे समजण्याची गरज नाही. जर तुम्ही कष्टाळू असाल, स्वप्रेरित असाल तर यश तुमचेच आहे असा व्यक्तिगत संदेश त्यांनी महानिर्मितीमध्ये कार्यरत महिला भगिनींना या निमित्ताने दिला आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.