22 मार्च जलदिनानिमित्त विशेष लेख
गोसीखुर्द प्रकल्पातील लाभधारकांच्या समृध्दीसाठी
गोसीखुर्द प्रकल्प हा पूर्व विदर्भातील सर्वात मोठा तसेच राज्यासाठी एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. नागपूर, भंडारा आणि चंद्रपूर जिल्हयातील 2 लक्ष 50 हजार हे. क्षेत्र सिंचनाखाली आणण्याची व्याप्ती असलेल्या या प्रकल्पाकडे धानाची शेती करणारा शेतकरी मोठया आशेने बघत आहे. अनेक वर्षापासून जोपासलेला आशावाद आता पूर्णत्वाकडे येण्याची चिन्ह दिसत आहेत. एक पिढी मागे पडली आणि त्यांनी आशा गमावल्या होत्या. मात्र 9 जानेवारी 2022 रोजी प्रकल्पात 100% जलसाठा निर्माण झाला आणि नव्या पिढीच्या नवीन आशा पल्लवित झाल्या आहेत; समृध्दीसाठी.
परंपरागत धानाची शेती करणारा चंद्रपूर जिल्हा. पावसाच्या पाण्यावर एक धान घेतला की बाकी वावर पडीत. त्यातही पाऊस आता बेभरवशाचा. मागच्या पिढीने नियमित पावसाच्या आणि दैवाच्या कृपेने आयुष्य काढलं. नवीन पिढीसाठी या बेभरवश्याच्या पावसाला गोसीखुर्दच्या पाण्याची जोड मिळणार आहे. त्यामुळे नुसत्या धानावर जगणा-या शेतक-याला वेळप्रसंगी तारून नेण्याचे काम या पाण्याने होईल आणि ज्या एका पिकावर वर्ष काढण्याची सवय असलेल्या पिढीला शास्वती मिळेल, त्याच्या धानाच्या उत्पन्नाची; समृध्दीची.
पण आता जग बदलत आहे. नवीन पिढीच्या समृध्दीच्या परिभाषाही बदलत आहेत. गोसीखुर्द प्रकल्पाची पायाभरणी झाली तेव्हा आणि जलपूर्ती झाली तेव्हा, समृध्दीचे संदर्भ वेगवेगळे आहेत. प्रकल्पाच्या कालव्यातून, पाईपमधून वावरा-वावरात प्रवाहित होणा-या पाण्याकडून आता अपेक्षा वाढलेल्या आहेत.
त्या वाढलेल्या, बदललेल्या अपेक्षांना साद द्यावयाची आहे. पाण्याच्या प्रत्येक थेंबाकडून जास्ती पीकाची नाही तर जास्ती समृध्दीची अपेक्षा आहे. आता “More Crop Per Drop” असं मानून चालणार नाही तर, “Better Crop Per Drop” याला मान्यता द्यावी लागेल.
धानाचं एक पीक घेवून आता समाधानी राहाणं शक्य नाही. खरीप च्या धानानंतर उन्हाळी धानही पुरेसा नाही. कारण धान एका मर्यादेपर्यंतच पैसे मिळवून देऊ शकतो. उन्हाळी धानाच्या जोडीने समृध्दी येईलही थोडी. गावखेड्यातील शेतकरी चंद्रपूर, नागपूरच्या बाजारपेठेत मजल मारू शकेल. पण समृध्द जग त्याच्या खूप पलीकडे आहे. त्या ठिकाणी असलेल्या बाजारपेठेत प्रवेश करायचा आहे. गोसेखुर्दच्या थेंबातून आणि कास्तकाराच्या घामातून आता समृद्धीची वैनगंगा घराघरात प्रवाहीत करायची आहे. तरूण पिढीने इंटनरेटच्या माध्यमातून जगाला जवळ केल आहे. ते फक्त काल्पनिक विश्व न रहाता त्याचे वास्तविक फायदे अनुभवायचे आहेत. त्याचे मार्ग शोधायचे आहेत. त्या मार्गावर चालायची जोखीम स्विकारायची आहे आणि जास्तीत-जास्त मिळवायचं आहे. गोसीखुर्द प्रकल्प त्यासाठी पाठीशी उभा आहे.
धानाच्या पीकामध्ये उच्च दर्जाचा, जास्त भाव देणारा धान घेणे आवश्यक आहे. चिन्नोर, आंबेमोहर, हातसडीचा, सेंद्रिय ई. अनेक धानाच्या जाती आपल्यासाठी उपलब्ध आहेत. कृषी विभाग मार्गदर्शन करायला तत्पर आहे. मोठया प्रमाणात उच्च प्रतिचा एकसारखा धान तालूकाभर घेतला तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मोबाईलवर उपलब्ध आहे. गोसेखुर्द प्रकल्पाच्या लाभधारकांचा धान हा अमेरिकेतल्या आपल्या बांधवांच्या ताटात पोहोचू शकतो. मूल, सावलीच्या चिन्नोरचा सुगंध लंडन, न्युयॉर्क मध्ये दरवळू शकतो. जगात पिकणा-या धानाशी स्पर्धा करू शकतो. आपले स्थान निर्माण करून शकतो आणि त्यामार्गे समृध्दी आणू शकतो.
नुसत्या धानाच्या उच्च प्रतीने वाढणा-या उत्पन्नापेक्षा इतर पिकांकडेही लक्ष द्यावं लागेल. अभ्यास करावा लागेल, जोखीम घ्यावी लागेल. आपल्या कृषी-हवामान विभागामध्ये कुठले नवीन पीक येऊ शकते आणि ते कुठे विकले जाईल, याचे मार्गदर्शन मिळू शकेल. काही प्रगतशील कास्तकारांनी पुढाकार घेतला तर इतरांचाही विश्वास वाढेल. त्यासाठी मनाची तयारी करावी लागेल. आवश्यकता भासली तर पीककर्ज घ्यावं लागेल. पण बदल करावा
लागेल. कास्तकार बदलला नाही तर नुकसान त्याचच होणार आहे. गोसीखुर्दच नाही. तो तर नम्रपणे सेवा द्यायला तयार आहे. आपण किती घेऊ शकू हा प्रश्न आहे.
पीक रचना व पीकपध्दती यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर काय-काय उपलब्ध आहे, आपल्या शेताला गोसीखुर्दच पाणी भिडलं तर त्याने काय समृध्दी घरी नांदू शकेल, यासाठी त्या दर्जाच्या अभ्यासकाचे मार्गदर्शन अपेक्षित आहे. या क्षेत्रातील तज्ञ आणि अभ्यासक, ज्यांनी “शेती इस्त्राईलची” हा ग्रंथ लिहिला आणि आता नवनवीन संशोधनावर आधारीत “शेती इस्त्राईलची भाग-2” हा ग्रंथ प्रकाशित केला असे डॉ. सुधीर भोंगळे आपल्या चंद्रपूर जिल्हयात येत आहेत.
जागतिक जलदिनाच्या निमित्ताने दिनांक 22 मार्च 2022 रोजी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर आणि मुंबई स्कूल ऑफ एकॉनॉमिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमास ते मार्गदर्शन करणार आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील चालू घडामोडींचा चंद्रपूर जिल्ह्यातील गोसीखुर्द व इतर प्रकल्पातील लाभधारकांसाठी निश्चित उपयोग होऊ शकतो. ती एक संधी आहे. त्यांना वेळोवेळी चर्चा करण्यासाठी आपण निमंत्रण देणार आहोत. त्यांनाही वाटायला हवं की चंद्रपूर जिल्हयात गोसीखुर्द प्रकल्प क्रांती घडवून आणत आहे. नुसत्या मानसिकतेत नव्हे तर वास्तवातही दिसणारी समृध्दी अनुभवण्यासाठी आपण तयार रहायला हवे. या निमित्ताने डॉ. सुधीर भोंगळे यांच स्वागत करून आणि गोसीखुर्द प्रकल्पातील लाभधारकांच्या समृद्धीसाठी काही संभाव्य शक्यतांना निश्चित वास्तवात उतरवू.
(आशिष तु. देवगडे)
मुख्य अभियंता,
गोसीखुर्द प्रकल्प,
जलसंपदा विभाग, नागपूर